संत सावता सागर,प्रेमाचा आगर:-समजून घ्यावे लागेल

106

संत सावता महाराज यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. संत सावता महाराज यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या आरण गावी झाला.परसोबा व नागीताबाई हे त्यांचे आईवडील.जन्मवर्षं इसवीसन  १२५० हे आहे, तारखेबाबत तज्ञात मतभेद आहेत. लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान व चौकसवृत्ती असणारे सावता यांच्यावरती योग्य संस्कार घराच्या वातावरणात झालेले होते. वारकरी विचारांची परंपरा त्यांच्या घराण्यात होती. संत सावता यांचं मूळ घराणं हे औसे तालुका मिरज जिल्हा सांगली येथील होते.सावता महाराज यांच्या पत्नीचे नाव जनाबाई होते,त्या भेंडी गावचे भानवसे यांच्या कन्या होत्या. संत सावता यांना मुलगा विठ्ठल जो अल्पायुषी ठरला तर मुलगी नागुबाई होती.जी वसेकर घराण्यात दिली होती.त्यांचेच वारस आज आरण येथील विश्वस्त आहेत! आरण हे पंढरपूर पासून अवघ्या तीस किलोमीटरवर असणारे गाव.पंढरपूरला सर्व संताच्या दिंड्या जातात मात्र आरण येथून जात नाही तर पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी ही आरणला संत सावता महाराज यांच्या भेटीला येते. यावरून संत सावता यांचे महत्व व कर्तृत्व आपल्या सहजपणे लक्षात येते! म्हणून तर वारकरी धर्माचा पाया रचणारे संत नामदेव महाराज म्हणतात, 

धन्य ते आरण नररत्नांची खाणं। जन्मला निधान सावता तो।। सावता सागर प्रेमाचा आगर। धरिला अवतार माळ्याघरी।। धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता। साठविला दाता त्र्येलोक्याचा। नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला।वंश उद्धारिला माळीयाचा।। 

    रत्नांची खाण हे विशेषण फार मौलिक आहे.आपल्याला सोने,मोती हे मौल्यवान वाटते, तेच आपण पाहतो,जपतो. सागर आणि आगर हे विशेषण आपण जाणून घेणे गरजेचे आहे! विशालता,विपुलता ज्यांच्याकडे असते तसे प्रेमाची विपुलता संत सावता यांच्याकडे होती. संत नामदेव महाराज त्यांच्या आई-वडिलांना धन्यता देतात. मनुष्य जीवनाची सफलता ही त्याचं कर्म यावर अवलंबून असते.अनेकदा हयातीत त्याने केलेले कर्म जर हे चांगले असतील तर त्याच्यानंतरचे त्या व्यक्तीचा गौरव करीत असतात संत सावता महाराज यांच्या बाबतीतही हेच घडले आहे,आज आपण सातशे वर्षानंतर त्यांचा स्मृतिदिन साजरा करत असताना त्यांच्या कार्याची कर्तृत्वाची आठवण काढत आहोत.त्यांच्या कृतीविचारातून बोध आपण घेत आहोत. 

       संत सावता यांच्या जडणघडणीत त्यांनी संत नामदेव महाराज यांना आपल्या मार्गदर्शक मानले आहे.संत नामदेव यांचे अनेक अभंग त्यांनी मुखदगत केले होते.नामदेवांनी सांगितल्याप्रमाणे ते स्वतः ही अभंगरचना करत असत.दिवसभर शेतात राबताना चित्त विठ्ठलाच्याकडे असे,आपण करत असलेले काम प्रत्यक्ष विठ्ठल पाहत आहे,सोबत आहे त्यामुळे ते पूर्ण समर्पित होऊन ते काम करत.त्यांच्या अभंगाला शब्दबद्ध करण्याचे काम काशीबा गुरव यांनी केले.ते सतत संत सावता यांच्या सोबत राहत.त्यांना ते आपले वडीलबंधु समजत. नामदेवाच्या संघटनमधील संत सावता, संत ज्ञानेश्वर,संत नरहरी, संत सेना,संत गोरोबा,संत चोखोबा,संत बंका, संत जनाबाई व काशीबा गुरव होते. या सर्वांना संत नामदेव मार्गदर्शक होते. या सर्वांच्या सुखदुःखासह त्यांना अभंगरचना व कीर्तन प्रवचन प्रबोधन यासाठी संत नामदेव महाराज सर्वोत्तपरी मदत करत!

       संत सावता महाराजांनी फक्त भक्ती करत न बसता त्यास कृतीची  जोड दिली आहे.आपण आपले काम प्रामाणिकपणे, समर्पित व उत्तमपणे करावे.त्यातच विठ्ठलाची सेवा आहे. 

   अभंगामध्ये ते म्हणतात,

 कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी। लसूण मिरची कोथिंबिरी।अवघा झाला माझा हरी। ऊस गाजर रताळू।अवघा झालासे गोपाळू। मोट नाडा विहीर दोरी।अवघी व्यापीली पंढरी।सावता म्हणे केला मळा। विठ्ठल पायी गोविला गळा।।

     आपल्या कर्मांमध्ये म्हणजेच शेतीतून पिके घेणे,भाजीपाला  पिकवत आहोत यासाठी शेताची नांगरणी,वखरणी,पेरणी,निंदणी,खत व वेळेवर पाणी देणे, रोपांची भाजीपाल्याची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली तरच पीक उत्तम येईल.नसता नुकसान होते.मी काम करत असतांना विठ्ठल विठ्ठल हे चिंतन सुरू असते,ते चिंतन पिके,फळे भाजीपाला ऐकतात व आनंदी होतात.तसाच प्रतिसाद दे देतात. माझा पांडुरंग विठ्ठल कांदा,मुळा भाजी, लसूण मिरची कोथिंबीरी, ऊस,गाजर,रताळु यात आहे. तर पंढरी म्हणजे पंढरपूर माझ्या मोट नाडा विहीर दोरी यामध्ये सामावलेली आहे. माझं सर्वस्व हे विठ्ठलाला अर्पण केले आहे. म्हणजेच हर घडी काम करत असताना पंढरीचा पांडुरंग विठ्ठल हे सर्व बघतोय म्हणून ते काम मी पूर्ण निष्ठेने केले पाहिजेच. 

     संत सावता महाराज म्हणतात,

प्रपंच असुनी परमार्थ साधावा।वाचे आठवावा पांडुरंग।उचनीच काही न पहावे सर्वथा। पुराणीच्या कथा पुराणीच।। घटका आणि पळ साधी उतावीळ। वाउगा तो काळ जायू नेदी। सावता म्हणे कांते,जप नामावळी। हृदयकमळी पांडुरंग।।

प्रपंच म्हणजे संसार व्यवहार करत रहावे. प्रपंचात सतत चिंतन हे पांडुरंगाचे असावे.

पुराणे,पोथ्या,श्रुती,स्मृती ही थोतांड आहेत,

जी विषमतेचे समर्थन करतात म्हणून उच्च-निचता,भेदाभेद मानू नयेत.कर्मकांड, 

शुभा-अशुभ असं काही नसते,काम करण्यासाठी सर्वकाळ हा योग्य आहे! आपल्या अंतःकरणात सर्वांसाठी स्नेह माया असावी त्याच्या ठिकाणी निश्चितच पांडुरंग असतो!

याला दुजोरा देतांना अभंग 

सत्कर्मात व्हावे रत, मोक्ष मिळो हातोहात।सावत्याने केला मळा।विठ्ठल देखीयला डोळा।
किंवा 
योग याग तप धर्म।सोपे वर्म नाम घेता।
तीर्थव्रत दान अष्टांग।याचा पांग आम्हा नको।।

    या अभंगामधून संत सावता महाराजांनी प्रत्येक बंधू बहिणी यांनी उद्योगी असलं पाहिजे, कष्ट,मेहनत केले पाहिजे. त्याने कोणते का होत नाही परंतु काम केलं पाहिजे,सन्मार्गाने,सचोटीने पैसा कमावला पाहिजे. म्हणजेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भाषेत 

चाकरी वाचून खाणे।
अनुचित वेतन।
 धनी काढूनी निजा। करील कामाची पूजा।उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे। सांगे तरी तूका पहा लाज नाही लोका।। 

   राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अखंडात म्हणतात 
जळो जळो तुमचे जिने।
उद्योगा आधी ताजे खाणे। 
हे कृत्य लाजिरवाणे। समजोत कपटी शहाणे। घ्यावी घ्यावी माझी भाक। जरी का सांगे अनेक। स्वकष्टाने पोटे भरा। ज्योती शिकवी फजित खोरा।।

 हा संतानी दिलेला आदेश आपण सर्व बहुजन बांधवांना शिरोधार्य मानून तसं वागणं असावं. असे जर  वागलो तर खऱ्या अर्थाने आम्ही या संताचे महापुरुषांचे वारसदार आसू.नाहीतर आमच्यात विचार व कृतीत भेसळ आहे असं समजायला हरकत नाही! 

  कर्मकांडावर प्रहार करताना प्राणिहत्या जी नवसाच्या नावाने होत असे ते कसे थोतांड आहे, हे लोकांना पटवून दिले.बोकडे, कोंबड्या या देवीच्या नावावर कापणे, त्यातुन होणारी कलागत भांडण यातून लोकांनी बाहेर पडावं.यासाठी त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. होम-हवन यज्ञयाग,दोरे-गंडे,अंगारे-धुपारे, तंत्र-मंत्र यातून बहुजन समाजाने बाहेर पडावं यासाठी संत सावता महाराजांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधनातून संदेश दिला.
 वेद श्रुती शास्त्रे पुराणे श्रमली। परी तया विठ्ठल गम्य नाही।

 ते या पुंडलिका सुलभ पै जाहले। उद्दाराया आले भीमातटी। सावता म्हणे विठ्ठल दयाळा। लागो नेदी मळ भाविकांशी।।
 वेद पुराण श्रुती स्मृती या सर्वांपेक्षा विठ्ठल प्रचंड आहे. त्यामुळे यात गुरफटून न राहता फक्त विठ्ठलाची भक्ती करावी. भक्त पुंडलिक यांनी जो मार्ग दाखवला आहे, तो विठ्ठला पर्यंत जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तोच अनुसरावा,असे संत सावता महाराज म्हणतात.

    अंधश्रद्धाळू रूढी परंपरा याचे समर्थन करून आज त्यावर बहुजन समाजाला दावणीला बांधणारे बाबा बापू कापू अम्मा स्वामी माँ आणि त्यांचे पुजारी या सर्वांवर यावर त्यांनी कठोर शब्दात प्रहार केले होते,हे आम्ही विसरलो आहोत! 
 संत सावता महाराज सर्व बहुजन समाजातील बांधवांना सोबत घेऊन भजन,कीर्तन, प्रवचन प्रबोधन करायचे.ज्यात महार,मांग,कुंभार,चांभार, माळी,साळी,कुणबी सर्व होते. 
भेदाभेद भ्रम अमंगळ।
वा 
आमची एकचीच वीण।
तेथे कैचे भिन्नभिन्न।
 या न्यायाने ते समतेचे वारकरी मार्गदर्शक होते.

       ओंकार स्वामी व चांडाळ चौकडी संत सावता महाराज यांना त्रास देतांना हा पोथीपुराण मानत नाही. होम- हवन याला किंमत देत नाही.पूजाअर्चा करत नाही.दर्शनाला जात नाही. विठ्ठलाला मानतो परंतु पंढरपुराला जात नाही. संस्कृत भाषेचा अपमान करतो. खालच्या जातीच्या लोकांना सोबत घेऊन जेवतो,भजन कीर्तन करतो.परंतु संत सावता महाराज आपले कर्म करीत राहतात. हे जो भेदाभेद करतात तो चुकीचा आहे, हे संत सावता महाराजांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.

   भली केली हीन याती।नाही वाढली महती। जरी असता ब्राह्मण जन्म। तरी हे अंगी लागते कर्म।।

 स्नान नाही संध्या नाही।यातिकुळ संबंध नाही। सावता म्हणे हीन याती।कृपा करावी श्रीपती।

     संत सावता महाराज यांना एकूण 45 वर्षाचे आयुष्य लाभले.त्या आयुष्यात त्यांनी प्रबोधनाचे जे कार्य केले ते निश्चितच आमच्या सर्वांसाठी  मार्गदर्शक आहे. त्यासाठी आम्ही आमचा वेळ,बुद्धी,श्रम आणि पैसा यावर देवूया!

✒️हभप रामेश्वर तिरमुखे(राज्यप्रभारी,सत्यशोधक वारकरी महासंघ, महाराष्ट्र राज्य. 9420705653.