दोनदा गोळीबार करण्याऱ्या बिहारी आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेडया

89

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१३ऑगस्ट):-स्थानिक नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी दि.११ रोजी रात्री पोलिस हवालदार कमलाकर धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच गुंडानी काल गुरुवारी रात्री नजीकच्या येणोरा शिवारात पुन्हा एकदा पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली, यावेळीसुद्धा गोळीबार करणारे दोन्ही गुंड फरार होण्यात यशस्वी झाले होते परंतु पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास यापैकी एक अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला तर दुसरा आरोपी जिशान शेख उर्फ जितेंद्र गुप्ता(२१) या आरोपीस शहरातील रेल्वेलाइन परिसरातून ताब्यात घेण्यात आले.हे दोन्ही आरोपी मुळचे बिहारी असून हल्ली अहेरी (गडचिरोली) येथील रहिवासी आहेत.

सुदैवाने या दोन्ही गोळीबाराचे घटनेत पोलिसांसह कुणीही जखमी झाले नाही.बुधवारी शहरातील नंदोरी चौकातील घटनेतील पोलिस कर्मचारी थोडक्यात बचावल्यानंतर हिंगणघाट पोलिसांद्वारे या गुंडांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू असताना काल गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट पासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावरील येनोरा शिवारात दोन अज्ञात तरुण संशयास्पद परीस्थितीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर गुंडांचा शोध घेत पोलिस पथक येणोरा शिवारात पोचले,येथे पोलिस उपनिरीक्षक लगड यांच्या पथकाला आरोपी फिरतांना आढळले,पोलिस पथकाचे त्यांचा पाठलाग करण्यात आला असता यावेळी या गुंडांनी पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने यावेळीसुद्धा यात कोणीही जखमी झालेले नाही.प्रत्यूत्तरादाखल गुंडांनी पोलिस पथकाचे उपनिरीक्षक लगड यांनीसुद्धा आरोपिच्या दिशेने गोळी झाडली. गुंडानी दुचाकी तसेच मोबाइल तेथेच सोडून शेत शिवारातून पळ काढण्यात आरोपी यशस्वी ठरले होते.सदर शोधमोहिम सुरु असतांना येनोरा येथील गावकऱ्यांनीसुद्धा पोलिसांना सहकार्य केले. परवा तसेच काल गुरूवारी घडलेल्या गोळीबाराचे घटनेने संपूर्ण तालुक्यातच दहशत पसरली असून पोलिसांना या गुंडाना पकड़णे आव्हानच ठरले होते.

पोलिसांनी या परिसरात काल जोरदार शोधमोहिम चालविल्यानंतर रात्रभर ही शोधमोहिम चालूच होती,सदर घटनेनंतर हा संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला,आज शुक्रवारी पहाटेच्यावेळी या दोन आरोपीपैकी एक आपले दुचाकी वाहन घेण्यासाठी घटनास्थळी पुन्हा परत येताच अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला,दुसऱ्या आरोपीलासुद्धा हिंगणघाट येथील रेल्वेस्टेशन परिसरात पकडण्यात आले.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड , दिपेश ठाकरे,अभिषेक बागड़े,गिरधर पेंदोर,परमेश्वर आगाशे,पोहवा सादिक शेख,शेखर डोंगरे,कैलाश दाते,विवेक बंसोड़,प्रशांत भाईमारे,रवि वानखेड़े,सचिन भांलशंकर , निलेश तेलरांधे,विशाल बंगाले,सचिन घेवंदे इत्यादिसह पोलिस चमुने केली आहे.