सशस्त्र क्रांतिकारक फळी निर्मितीत खटपट

26

(डॉ.विनायक विश्वनाथ जयंती-पुण्यतिथी विशेष)

डॉ.विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पासाहेब पेंडसे यांचा जन्म दि.१७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएचडी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते. स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरूने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची, असे अप्पासाहेब पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले. ब्रिटिशांनी भारतात पाठविलेले सर्व ब्रिटिश सभासद असलेले सायमन कमिशन जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्याचे काळ्या झेंड्यांनी स्वागत करणाऱ्यांमध्ये १२ वर्षांचे अप्पा पेंडसे होते. त्यावेळी जुन्या आणि नव्या हजारो कार्यकर्त्यांनी भर उन्हात सायमन कमिशनचा धिक्कार करणारा लांबलचक मोर्चा काढला होता. भारताचे भवितव्य ठरवणाऱ्या या कमिशनमध्ये एकही भारतीय का नसावा हा त्यांचा सवाल होता. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.

अप्पासाहेब पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते; भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात इ.स. १९३०मधे ते सामील झाले. दोन वर्षांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिल्या सात सभासदांमधील ते एक होते. दलाच्या बँड पथकात ते बँड वाजवीत. तरुण जवाहरलाल नेहरूंचे स्वागत करणार्‍या भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता. अनेक वैचारिक मतभेद असणाऱ्या समाजगटांमध्ये व संस्थांच्या माध्यमातून काम करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, या एकाच विचाराने ते भारले गेले होते. भारताला स्वातंत्र्य मिळताक्षणीच त्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानाला वाहून घेतले. हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेल्या अप्पासाहेबांनी प्रभावी संघटन व प्रेरणादायी विचार मांडून बुद्धिवान स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फौज जमवली आणि पुणे शहरात ज्ञान प्रबोधिनी नावाच्या शिक्षणसंस्थेची इ.स.१९६२मध्ये स्थापना केली.

६७ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या अप्पासाहेबांच्या जीवनाचा पूर्वार्ध पारतंत्र्याच्या काळात गेला. नूतन मराठी विद्यालयात शिकत असताना पु. ग.सहस्रबुद्धे व श्री.म.माटे यांच्यासारखे विचारवंत शिक्षक लाभल्याने त्यांची वैचारिक पायाभरणी सुरू झाली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि नेपोलिअन बोनापार्ट यांनी त्या काळात झपाटले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारी आणि शांततामय अशा दोन्ही मार्गांनी सुरू असलेले प्रयत्न शिगेला पोचत होते. चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या आचार-विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी तो मार्ग काही काळ चोखाळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असताना देशभरातल्या सशस्त्र क्रांतिकारकांची विस्तृत फळी निर्माण करण्याच्या खटपटीत ते गुंतले. या खटपटी सुरू असतानाच दि.१५ ऑगस्ट १९४७ला भारत स्वतंत्र झाला.

राष्ट्रभक्तीची धग कायम होती; मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशप्रेमाचा आविष्कार बदलायला पाहिजे, हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःचा रोख बदलला. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच अवांतर वाचन, चिंतन ‌आणि भेटीगाठींचा परिपाठ अखंड सुरू होता. या काळात स्वामी विवेकानंदांच्या जीवन व शिक्षण विषयक विचारांशी त्यांची जवळीक वाढली आणि त्यांना पुढच्या आयुष्याची दिशा गवसली. नव-स्वतंत्र भारताला सामर्थ्यशाली करण्यासाठी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान पायाभूत ठरू शकेल, याबद्दल त्यांची खात्री पटली. ते घडवून आणण्यासाठी विविध क्षेत्रांत सक्षम नेतृत्व निर्माण करण्याचा ध्यास घेतला होता. याच विषयावर त्यांनी सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना १९६१मध्ये पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसशास्त्रज्ञांच्या अनेक परिषदांमध्येही हा विषय चर्चेला आला. ऑगस्ट १९६२मध्ये पुण्यातल्या अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या सहकार्याने जन्माला आलेली ज्ञान प्रबोधिनी हे त्यांनी घेतलेल्या त्या ध्यासाचे मूर्त रूप होय. ज्ञान प्रबोधिनीचे स्वरूप संस्थेचे असले तरी तिची कार्यशैली मात्र राष्ट्र उभारणीच्या कार्यात गुंतलेल्या चळवळीसारखी राहावी, यासाठी अप्पा ठाम होते. म्हणूनच त्यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या लिखित घटनेत काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली. त्यातलीच ही काही- १. ज्ञान प्रबोधीनीमध्ये केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष देण्यात येईल. २. निष्कलंक चारित्र्य आणि देशप्रेमाचे बाळकडू या मुलांना दिले जाईल. ३. व्यक्तिगत आयुष्यातल्या उच्च मूल्यांची नाळ देशहित व समाजहिताशी कधी बांधावी? याचे प्रशिक्षण देण्यात येईल. ४. प्रबो‌धिनीतून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतरही या मुलांशी कायम संपर्क ठेवून ज्ञान प्रबोधिनी त्यांना आपल्या व्यापक कार्यात सहभागी करत राहील. ५. हे राष्ट्रकार्य पुढे जावे, यासाठी देशभरच्या विविध संस्थांबरोबर ज्ञान प्रबोधिनी सतत संपर्क ठेवेल.

ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर तब्बल २१ वर्षे एखाद्या तपस्वीप्रमाणे ते जगले. दि.१९ ऑगस्ट १९८३ रोजी अप्पासाहेब पेंडसे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यातला प्रत्येक क्षण विद्यार्थी-कार्यकर्ते घडवण्यासाठी त्यांनी वेचला. त्याचीच फळे आज दिसत आहेत. यापुढेही दिसत राहतीलच अशी आशा बाळगुया!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या अविस्मरणीे कार्यांना व स्मृतींना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री. एन. के. कुमार गुरूजी(संत व थोर पुरुषांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक)मु. पो. ता. जि. गडचिरोली. व्हा. ॲ. नं. ७४१४९८३३३९.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com