उढाण कमर्शियल कॉम्प्लेक्स व गृहप्रवेश सत्यशोधक पद्धतीने संपन्न

29

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)

जालना(दि.26ऑगस्ट):- शिवश्री ज्ञानेश्वर उढाण
जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ,जालना यांच्या मेन रोड घनसावंगी येथे बांधलेले नवीन कमर्शियल कॉम्प्लेक्स व गृहप्रवेश दि.23ऑगस्ट 2021 सोमवार रोजी सत्यशोधक पद्धतीने कुटुंबीय नातेवाईक व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महान सम्राट बळीराजा,संत तुकाराम महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर जिजाऊवंदना घेण्यात आली.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगाचे वाचन,निरूपण आणि सत्यशोधकविधी सत्यशोधक वारकरी महासंघाचे राज्यप्रभारी रामेश्वर त्रिमुखे यांनी केले. *कृतज्ञता संदेशाचे* ज्ञानेश्वर उढाण यांच्या *आई वडील* व कुटुंबीय यांनी वाचन केले. सत्यशोधक विधी हा अतिशय सोपा व सुटसुटीत आहे. त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो.ज्यास आमच्या संताचा आणि महापुरुष यांचा आधार आहे.जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात,*धर्माचे पालन।करणे पाखंड खंडन।हेचि आम्हां करणे काम बीज वाढवावे नाम।।*
या न्यायाने बुरसटलेल्या, चुकीच्या रूढी,परंपरा यांचा त्याग करून विवेकी,तर्कशुद्ध बाबीचे आचरण ज्ञानेश्वरजी करतात. छत्रपती शिवराय यांनी दुसरा राज्याभिषेक शाक्तपद्धतीने केलेला आहे. छत्रपती शाहू महाराज यांचे सत्यशोधक पद्धतीने वर्तन, राज्यकारभार याचा इतिहास त्यांना ज्ञात असल्याने तो वारसा पुढे नेत आहेत.

वर्तमानात प्राच्चविद्यापंडित,इतिहास संशोधक डॉ.आ ह साळुंखे, आदरणीय पुरूषोत्तम खेडेकर यांच्या कृतीविचारांचा प्रभाव त्यांच्या वर्तनात आहे.त्यांनी शिवधर्म पद्धतीने काही विवाह लावले आहेत. कुटुंबीय, नातेवाईकांना मित्रपरिवार यांना त्यांनी चिकित्सक आचरणाचे महत्व पटवले आहे.यावेळी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक बी ए हर्षे बप्पा,पंचायत समिती सदस्य पंडितजी धांडगे, ऋषी मुके सर,कैलास आरगडे सर, ऋषी यादव सह अनेक मान्यवर यांची उपस्थिती होती.आपणही विवेकी वैज्ञानिक चिकित्सक सत्यशोधकीय व बुद्धीला पटणाऱ्या विचारांना जास्तीतजास्त कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया,
असे आवाहन संयोजक व रामेश्वर त्रिमुखे यांनी केले आहे.