जनजागृती हाच साथीच्या आजारावरील उपाय

26

साथीचे आजार राज्याची पाठ सोडायला तयार नाही. मागील दीड वर्षात कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांचे जगणे मुश्किल झाले होते. प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला आणि प्रशासनाला दिलासा मिळत आहे. मागील काही दिवसात राज्यातील कोरोनाचे रुग्ण घटत आहेत. राज्यातील कोरोनाचे रुग्ण घटत असतानाच राज्यात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याची बातमी आली. राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याच्या बातमीने आरोग्य प्रशासनाची आणि नागरिकांची झोप उडाली आहे. पावसाळा आणि साथीचे आजार हे जणू समीकरणच बनले आहे. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, चिकणगुणिया, मलेरिया यासारखे साथीचे आजार डोके वर काढतात. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अजून पूर्ण संपलेली नाही त्यातच ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज नीती आयोगाने वर्तवला असल्याने प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

कोरोना महामारीच्या दरम्यान डेंग्यूचा संसर्ग वाढल्यास लोकांच्या मनात भय निर्माण होऊ शकते. सध्य स्थितीत ताप आला म्हणजे कोरोना झाला असाच लोकांचा समज झाला आहे. त्यात कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे सारखीच असल्याने लोकांचा गोंधळ वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे डेंग्यू ची साथ वाढणार नाही याबाबत प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत. आवश्यक तेथे औषध फवारणी करायला हवी. शहरातील डबके, ड्रेनेज स्वच्छ करायला हवेत. शहरात कचरा साचू नये याची दक्षता घ्यायला हवी. आरोग्य विभागाने अलर्ट राहायला हवे त्यासोबतच प्रशासनाने डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यासारख्या आजारांबाबत जनजागृती करायला हवी. साथीचे आजार रोखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर ती लोकांचीही आहे. साथीचे आजार पसरू नयेत यासाठी लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया हे आजार डासांमुळे होतात. डेंग्यूचे डास होण्याचे मुख्य कारण अशुद्ध पाणी साचणे हे आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठ्याची समस्या असल्यामुळे लोक पाणी बॅरलमध्ये साठवून ठेवतात.

बॅरल मधील पाण्यात डास साचू नयेत यासाठी बॅरल स्वच्छ पाण्याने बांधून ठेवावे. शहरातील मोठ्या वसाहतीत लोक आपल्या फ्लॅटमध्ये कुंड्या ठेवतात. कुंड्यांच्या खाली प्लेट ठेवण्याची सवय लोकांना असते. त्या पाण्यातही डेंग्यूचे डास असतात त्यामुळे कुंड्यांमध्ये, प्लेटमध्ये, डब्यात, बॅरलमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता लोकांनी घ्यायला हवी. वसाहतीमधील पाण्याच्या टाक्या वेळेवर स्वच्छ कराव्यात. घरातील आणि सभोवतालच्या परिसरात खाली बाटल्या, बॉक्स, जुनी भांडी, टायर यात पाणी साचणार नाही याची काळजी लोकांनी घ्यावी. परिसरात कचरा, घाण साचू नये याची काळजी घ्यावी. परिसर स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. थंडी, ताप, खोकला अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. वेळीच चाचणी केली तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. वेळ वाया घालवल्यास प्राणावरही बेतू शकते. डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यांसारखे साथीचे आजार रोखण्याची जबाबदारी जितकी प्रशासनाची आहे तितकीच ती लोकांचीही आहे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५