एनसीईआरटी: स्पर्धा परीक्षांचा गंडादोरा!

44

[एनसीईआरटी स्थापना दिवस विशेष]

स्पर्धा परीक्षेत या पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुख्यत: संकल्पना समजून घेण्यासाठी या पुस्तकांना पर्याय नाहीच. स्पर्धा परीक्षेत विविध विद्याशाखेच्या विद्यार्थांचा समावेश असतो. त्यामुळे एखाद्या अभियंत्याला अर्थशास्त्रातील संकल्पना समजून घ्यायची असेल, तर ही पुस्तके वरदान ठरतात. तसेच एखाद्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला इतिहासातीलच एखादी घटना समजून घ्यायची असेल तरीसुद्धा नक्कीच कामास येतात. परीक्षांत अनेक प्रश्नदेखील त्यातूनच विचारलेले आढळतात. म्हणून या पुस्तकांचे खूप महत्त्व आहे. मात्र या पुस्तकांतूनच प्रश्न येतील, या भ्रमातही राहू नये. तेव्हा एकदा का स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले की, सगळ्यात आधी अभ्यासक्रम वाचावा आणि त्यानुसार आपण पुस्तकांची यादी तयार करवी.

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) अर्थात इंग्लिशमध्ये ‘नॅशनल कौंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग’ असे म्हणतात. ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे. याचे मुख्यालय नवी दिल्लीत श्री अरविंद मार्गावर आहे. शालेय शैक्षणिक मुद्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी दि.१ सप्टेंबर १९६१ रोजी या परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेची रचना अशी निश्चित करण्यात आली- केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर सदस्य म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, चार विभागांतील विद्यापीठांपैकी चार विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय मानव संसाधन खात्याचे सचिव आदिंना स्थान दिले जाते.

भारतीय शिक्षणाची राष्ट्रीय परीषद (एनसीआयई) व राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. एनसीआरटीची काही प्रमुख उद्दीष्टे पुढीलप्रमाणे- राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे, प्राथमिक शिक्षणाचे साधारणीकरण (युईई), व्यावसायीक शिक्षण, विशेष गरजा असलेल्या समुहांचे शिक्षण, शिशु शिक्षण, माहिती तंत्रज्ञान सुधारासाठी परीक्षा व गुणदान, स्पर्धात्मक गुणवेत्तेचे शिक्षण, बालिका शिक्षण, अध्ययन-अध्यापन अनुभव तयार करणे, अध्यापन शिक्षणात सुधार आदी आहेत. परिषदेच्या मूळकामाचे स्वरूप असे सांगितले जाते- १) शालेय शिक्षणातील सर्व शाळांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे, २) विविध शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांना शिक्षणविषयक कार्यामध्ये विस्तार सेवा पुरवणे,३) शिक्षणविषयक माहितीच्या ज्ञानाचा प्रसार करणे, ४) शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे, ५) शिक्षणासंदर्भात पुस्तके, नियतकालिके व साहित्य यांच्या प्रकाशनाचे कार्य करणे आदी. परिषदेच्या उपसंस्था व त्यांची कार्यपद्धती- पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था भोपाळ ही संस्था व्यावसायिक व कार्यानुभव शिक्षणामध्ये संशोधन, प्रशिक्षण विकास व विस्तार कार्यक्रम राबवते. राष्ट्रीय शिक्षण संस्था दिल्ली ही ‘एनसीइआरटी’ची सर्वात प्रमुख संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. उदा.शालान्तपूर्व व प्राथमिक शिक्षण विभाग, विज्ञान व गणित शिक्षण विभाग, शिक्षणविषयक मूल्यमापन विभाग, संगणक शिक्षण व तांत्रिक साधने विभाग इत्यादी.

केंद्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था दिल्लीद्वारे शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे उदा.रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट आदींचा वापर करणे. या संस्थेने पाच राज्यांमध्ये राज्य शिक्षण तंत्रज्ञान संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसा व उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे. या संस्थेमार्फत केंद्रीय चित्रपट ग्रंथालय चालवले जाते, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या साहाय्याने हा कार्यक्रम चालवला जातो.एनसीईआरटी आणि यूपीएससीची परीक्षा म्हणजे अगदी गहिरं नातं आहे. एनसीईआरटीचा गंडा बांधल्याशिवाय स्पर्धा परीक्षा देणे तसे कठीणच. ही संस्था म्हणजे भारताच्या शिक्षणक्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. केंद्र व राज्य शासनास शिक्षणविषयक धोरणे ठरविण्यासाठी सल्ला देणे व सहाय्य करणे, हे या संस्थेचे मुख्य कार्य होय.

या संस्थेतर्फे प्रकाशित होणारी पुस्तके केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकण्डरी एज्युकेशन (सीबीएसई) या संस्थेच्या शाळांमध्ये क्रमिक पुस्तके म्हणून वापरली जातात आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी त्याचा सगळ्यात जास्त वापर करतात. सोपी, सुलभ भाषा व प्रचंड संशोधन करून तयार केलेले अभ्यास साहित्य यामुळे ही पुस्तके ज्ञानाचा अमूल्य ठेवा ठरत आहेत. ही सर्व पुस्तके ncert.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करून वाचता येतात. तसेच एनसीईआरटी या अॅपवर देखील ती उपलब्ध आहेत. इतिहासाच्या जुन्या आवृत्या जास्त उत्तम आहेत. भूगोलासाठी शक्यतो नवीन आवृत्या वाचाव्यात. कारण त्यातील माहिती ही ताजी असते. अर्थशास्त्राला देखील तोच नियम लागू पडतो. विज्ञान, कला व साहित्य या विषयांची मात्र कुठलीही वाचली तरी काही हरकत नाही.

या पुस्तकांबद्दल अनेक समज व गैरसमज देखील आहेत. गेल्या काही वर्षात या पुस्तकांचे महत्त्व वाढले आहे. काही जण या पुस्तकांना अवास्तव महत्त्व देतात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ही पुस्तके फक्त पाया रचण्यासाठी असतात. मात्र क्रमिक किंवा मुख्य पुस्तकांनीच कळस गाठावा लागतो. ही पुस्तके परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी नक्कीच सहाय्यभूत ठरतात मात्र सर्वस्व नाहीत. हल्ली अनेक प्रकाशक गोषवारा स्वरूपात देखील पुस्तके छापतात. इंटरनेटवर देखील ही पुस्तके उपलब्ध आहेत, मात्र या मोहात पडू नये. कारण मुख्य साहित्य वाचले नसेल तर गोषवारा समजत नाही आणि त्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे सुटण्याची दाट शक्यता असते. राज्यसेवेचा अभ्यासक्रमसुद्धा यूपीएससीच्या समकक्ष झाला आहे. त्यामुळे आता फक्त महाराष्ट्र बोर्डाचे पुस्तक वाचून भागणार नाही. तेव्हा एकूणच स्पर्धा परीक्षेच्या यशापयशात या पुस्तकांचा मोठा वाटा आहे, हे नक्की!

त्यातील काही सर्वश्रूत प्रकाशने अशी- एनसीईआरटी बारावीपर्यंतचे सीबीएसईची पाठ्यपुस्तके प्रकाशीत करते. प्रकाशनासाठी ‘एनसीइआरटी’ची तीन प्रादेशिक प्रकाशन केंद्रे आहेत- अलाहाबाद, कोलकाता आणि बंगळुरू. हे प्रकाशन प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेतून प्रकाशित केले जाते. तसेच एनसीइआरटी ही परिषद दी सायन्स टीचर, दी प्रायमरी टीचर व जर्नल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन प्रकाशित करते.

!! परिषदेचे कार्य भारतीयांचे तेजोमय भवितव्य घडविण्यास लखलाभ ठरो, यास्तव पुरोगामी संदेश परिवारातर्फे अनेक शुभकामना !!

 ✒️संकलन :-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(भारताच्या गौरवशाली इतिहासाचे गाढे अभ्यासक.)
मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं. ९४२३७१४८८३.