जागतिक टपाल दिन : मात्र काळाच्या ओघात पोस्टमनदादा हरवले…!!!

24

जगभरात ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.तर ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत टपाल सप्ताहाचे आयोजन केले जाते.२५ ते ३० वर्षापूर्वी टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते.पत्रास कारण की… या वाक्याने सुरुवात व्हायची अन् संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळायची.नातेवाईकांच्या खुशालीची वाट पाहायची.पोस्टमन काका आल्यास त्यांच्यामागे धावत धावत काका आमच्या मामाचं पत्र आलं का?असा प्रश्न विचारायचो,१५ पैशांच्या त्या पत्रातून खूप आनंद मिळायचा.मात्र,काळाच्या ओघात ही पत्रे आता इतिहास जमा झाली आहेत.प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे.कधी हे पत्र चिठ्ठी म्हणून कबुतरामार्फत पाठविले जाई,तर काही वेळा हे काम दुतांमार्फत केले जाई.अगदी प्रिय व्यक्ती एकमेकांशी संपर्क साधण्यापासून तर एका राज्याच्या राजाने दुसऱ्या राज्यातील राजाशी संपर्क साधण्यापर्यंत हाच पर्याय उपलब्ध होता.सन १८७४ साली आजच्याच दिवशी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना करण्यात आली.

हि घटना दळण-वळणाची जागतिक क्रांती मानली जाते.या माध्यमातून लोकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पत्राद्वारे संपर्क साधण्याचा अधिकार प्राप्त झाला.१९६९ साली टोकियो (जपान) येथे भरलेल्या यूपीयू काँग्रेसमध्ये ९ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.तेंव्हापासून हा दिवस टपाल खात्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.”
——————————–
जागतिक टपाल दिन किंवा ‘वल्ड पोस्ट डे’ हा जगभरातून साजरा केला जात आहे.दरवर्षी ९ ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो.इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे.एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा.फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो.जगात दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच ९ ऑक्टोबरला टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू एवढाच कि,टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना जागरुक करणे होय.जागतिक टपाल दिनाचा इतिहास युनिवर्सल पोस्टल युनियन (युपीयु) ची उभारणी करण्यासाठी १८७४ मध्ये स्विर्झलंडची राजधानी ‘बर्न’ येथे २२ देशांनी मिळून करारावर सही केली होती.टोकियोत १९६९ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती.१ जुलै १८७६ ला भारत ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला.

तंत्रज्ञानासोबत टपाल सेवेत होतोय बदल ! बदलत्या काळासोबत जगातील सर्व टपाल सेवांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक बदल केले आहेत.नवीन तंत्रज्ञानासह टपाल सेवांनी स्वत: ला अधिक जलद केले आहे.डाक,पार्सल,पत्र हे एक्सप्रेसने जाण्याची सेवा सुरु झाली.जवळपास २० वर्षांपूर्वी या बदलावांना सुरुवात झाली आणि सर्वच स्थरावर तांत्रिक बदल करण्यात आले.आता ऑनलाईन पोस्टल देवाण- घेवाणीवरही लोकांचा विश्वास वाढला आहे.युपीयु ने केलेल्या एका सर्वेमध्ये अशी माहिती समोर आली की जगभरातून आजच्या घडीला ५५ पेक्षा जास्त प्रकारच्या ई-पोस्टल सेवा उपलब्ध आहेत.बदलता काळ आणि बदललेली टपाल तिकीटं! भारत स्वतंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकीटांच्या स्वरुपात,आकारत,रचनेत विविध बदल झाले आहेत.त्यांच्यातील या बदलांमुळे त्या त्या काळाविषयी माहिती मिळते.

टपाल खाते नेत्यांवर,फुलांवर,प्राणी पक्षांवर एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य,सुवर्ण,अमृतमहोत्सवी,शतक,
द्विशतक किंवा त्रिशतक निमित्त तिकीटं काढते.१९४७ ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पोस्ट तिकीटात बदल करण्यात आला होता.त्या तिकीटावर तिरंग्याचे चित्र दिले होते.तर कधी इंदिरा गांधी,महात्मा गांधी,राजीव गांधी,सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या व्यक्तींच्या प्रतिमा टपाल तिकीटांवर विशिष्य काळात होत्या.यावरुन आपल्यास त्या काळात त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती मिळते.तसाच तो कालखंड देखील तिकीटांद्वारे समजायला सोपा जातो.त्याचमुळे टपाल तिकीटे हा इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे.१९७७ मध्ये भारताने जाल कूपर यांचं टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं.याचं कारणंही तसंच होतं.जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते.मुंबईत पारशी कुटुंबात यांचा जन्म झाला.इंडियाझ स्टॅम्प जर्नलचे संपादन केले होते.भारतातील पहिल्या तिकीट संपादक ब्यूरोचे ते संपादक होते.त्यांनी इम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली होती.याच विषयावर त्यांनी पुढे पुस्तकही लिहीलं.त्यांच्या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरुप दिले होते.

भारतीय टपाल तिकीटांच्या अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांच्या मोठा वाटा आहे.टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करुन जागतिक पातली गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान प्रचंड महत्वाचे आहे हे त्यांच्यावर काढलेल्या तिकीटांवरुन लक्षात येते.टपाल तिकीट संग्रह म्हणजे नवीन तिकीट प्रकाशित झालं की ते विकत घेत त्यांचा संग्रह करणे.काही टपाल तिकीटे ही विशिष्ठ वेळेसाठीच प्रकाशित करतात.भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटाची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये १८५२ मध्ये झाली.तर १८५४ पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचं प्रचलन सुरू झाले.भारतातलं पहिलं रंगीत तिकीट छापण्यासाठी १९३१ साल उजाडावं लागलं.पहिलं स्वातंत्र्योत्तर तिकीट १९४७ मध्ये निघालं आणि त्यावर भारतीय झेंडा होता.त्यानंतर भारतामध्ये टपाल तिकिटांची रेलचेल झाली.नुकतंच काही वर्षांपूर्वी,तुमच्या निवडीनुसार तिकिटं छापण्याची सुरुवात टपाल खात्यानं प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली आहे.आज फेसबुक,मेसेंजर,व्हॉट्सअँप आणि डिजीटल अँपच्या माध्यमातून क्षणार्धात संदेशाची देवाण-घेवाण होते.मात्र,पोस्टमन काकाच्या पाठिमागे फिरुन आपल्या मामाचं पत्र मिळविण्यात,आपल्या आत्याची खुशाली ऐकण्यात जो आनंद होतो,तो आनंदही टपालासोबतच नाहीसा झाला आहे.
काळाच्या ओघात पोस्टमन दादा हरवले…!

नव्या इंटरनेटच्या युगात जलद दळणवळणाच्या मोबाईल,व्हॉट्‌सऍप,ईमेल आदींचा वापर सर्रास होत आहे.त्यामुळे अनेक लोकांना अनेक वर्षे घरपोच सेवा देणाऱ्या आणि केवळ अवघ्या पन्नास पैशांत देशाच्या कानाकोपऱ्यात जाणारे पोस्टकार्ड सध्या दुर्मिळ झाले आहे.तसेच लोकांना पत्र देऊन त्यांच्या सुख-दुःखात समरस होणारा व आपुलकीच्या सेवेतून घरोघरी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारा व अतूट नाती जपणारा पोस्टमनही काळाच्या ओघात हरवत चालला आहे,ही खंत आहे.नऊ ऑक्‍टोबर हा जागतिक टपाल दिन आहे.बदलत्या काळात दळणवळणाच्या मोबाईल व व्हॉट्‌सऍप,इलेक्‍ट्रॉनिक मेल साधनांचा लोकांच्यात वापर वाढू लागला आहे.नव्या पिढीवर त्यांचा प्रभाव व आकर्षण वाढले आहे.जग सर्वांच्या जवळ येऊ लागले आहे.कमी वेळेत व अल्प खर्चात दूरवर जगभरात लोकांशी त्वरित संपर्क साधला जात आहे.तसेच व्हिडिओमुळे प्रियजन भेटल्याचा आनंदही मिळू लागला आहे.पूर्वी पत्रलेखनाच्या सवयीने हस्ताक्षर सुधारले जात असे,लेखनात वेगळा आनंदही मिळत असे.पत्राच्या सुरुवातीचा ” सप्रेम नमस्कार,विनंती विशेष ” पत्राच्या शेवटी असलेला ” तब्येत सांभाळावी,खुशाली कळवावी ” आदी मजकूर आता लोप पावले आहेत.युद्धभूमीवर अहोरात्र लढणाऱ्या लष्करातील शूरवीर जवानांना त्यांच्या गावाकडे घरच्या लोकांनी पत्राद्वारे मनोधैर्य वाढवून साथ दिलेली आहे.पोस्टातील आर्थिक गुंतवणूक सुरक्षित व विश्वासार्ह आजही मानली जाते.

कोरोना संसर्गामुळे बचत व्यवहार करणे जिकिरीचे झाले आहे.त्यावर उपाय म्हणून भारतीय डाक विभागाने बचत खात्यामार्फत इंटरनेट बॅंकिंग,मोबाईल बॅंकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बॅंकिंग व्यवहार करणे शक्‍य झाले आहे.कोरोनाच्या अडचणीच्या काळात डाक खात्याने औषधे पोचवण्याची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.मात्र,आता इंटरनेटच्या काळातही पोस्टल सेवा स्वस्त साधन म्हणून राहिलेले आहे.लॉकडाउनमध्ये पोस्टमनचे पुनरागमन झालेले आपणांस पहावयास मिळाले आहे.जो सुख दुःखाचा साथीदार असायचा त्या पोस्टमनने लॉकडाउनच्या काळात पुनरागमन केले आहे.संकटाच्या या काळात आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तर तो देवदूत ठरला आहे.आजघडीला कुरिअर अन् डिलीव्हरी बॉय यांची चातकासारखी प्रतीक्षा केली जाते,पण त्यांच्याआधी जो सुख दुःखाचा साथीदार असायचा त्या पोस्टमनने लॉकडाउनच्या काळात पुनरागमन केले आहे.संकटाच्या या काळात आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तर तो देवदूत ठरला आहे.त्यासंदर्भात एक घटना अशी आहे की,हिमाचल प्रदेशातील उना येथील आठ वर्षांच्या मुलीचे कॅन्सरवरील औषधे संपायला आली होती,अशावेळी पोस्टमनमुळे ही महत्त्वाची औषधे त्यांना वेळेत मिळाली आहेत.

भारतीय टपाल खात्याच्या पंजाब विभागाने खास व्यवस्था करून दुसऱ्या राज्यातून हे औषध मागविले.प्रवासाची साधने बंद असल्यामुळे पोस्टाची व्हॅन घेऊन पोस्टमन उना येथे गेला आणि त्याने मुलीच्या आईला औषधाचा बॉक्स दिला.केंद्रीय दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे या मुलीच्या कुटुंबीयांनी मदत मागितली होती.त्यानंतर त्यांनी आदेश दिला होता,मात्र नेहमीचे काम समजून अशी मदत अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.म्हणून संकटकाळात जो मदतीला येत असतो तोच आपला असतो.म्हणूनच आजपर्यंत संकटकाळात पोस्टनमन दादा आपल्या नेहमीच मदतीला धावले आहेत.अशा या आदर्श पोस्टमन दादाच्या कार्याला सलाम व जागतिक टपाल दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!!

✒️लेखक:-राजेंद्र लाड (शिक्षक)(आष्टी,जि.बीड )मो.९४२३१७०८८५