कामगार प्रश्नांची जाणीव असलेले धर्मानंद कोसंबी!

26

(पं.धर्मानंद कोसंबी जयंती विशेष)

जे बौद्ध धर्माचे जगद्‍‍‌विख्यात पंडित होते. पाली भाषा, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि प्रचारक या दृष्टीने ज्यांचे भारतीय विद्याभ्यासाच्या इतिहासात फार महत्त्वाचे आणि उच्च दर्जाचे स्थान आहे. ज्यांच्या चरित्रसह पाली भाषा व बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अध्ययनासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही फार रंजक आणि बोधक आहेत, त्या आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी यांची आज जयंती. कृष्णकुमार निकोडे गुरुजी यांच्या लेखाद्वारे त्यांना नमन! – संपादक.

बुद्ध तत्वज्ञान या विषयातील बरीचशी माहिती आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी यांनी लिहिलेल्या निवेदन या पुस्तकात मिळते. त्यांचा जन्म दि.९ ऑक्टोबर १८७६ रोजी गोव्यातील साखवळ या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावात झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी सन १८९१मध्ये त्यांचा विवाह झाला. तत्पूर्वी गोव्यात त्यांचे काही संस्कृताध्ययन झाले होते. याच वर्षी ते पुण्याला आले. रा.गो.भांडारकर यांच्या मदतीने पुण्यातही काही संस्कृताध्ययन केले. त्याचवेळी त्यांचे लक्ष बौद्धसाहित्याच्या अध्ययनाकडे वळले. उज्जैन, ग्वाल्हेर आदी ठिकाणी जाता जाता नंतर ते काशीला पोहोचले. तेथून नेपाळ व मग बौद्धगया असा प्रवास त्यांनी केला. शेवटी ते बौद्ध अध्ययनासाठी सिलोन- श्रीलंका येथे गेले. हा प्रवास करताना पैशाच्या अभावी त्यांना बरेच हाल सोसावे लागले. जेवणाचीही आबाळ झाली. पण योगायोगाने हे प्रश्न सुटून ते तेथे पोहोचले. तेथे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर ते ब्रह्मदेश, पुनः भारतात कोलकाता, नागपूर, अमरावती, मुंबई, उज्जयनी, देवास, इंदौर, काशी, सारनाथ असा प्रवास करत होते. या प्रवासात त्यांना अतिसाराचा त्रास झाला. त्यांच्या मनात अगदी आत्महत्येचा विचारही आला. मात्र बौद्ध अध्ययन त्यांनी सोडले नाही. पुढे त्यांनी बौद्ध भिक्षुत्वाचा त्याग केला. सन १९०५ साली कोलकात्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये आणि पुढे कलकत्ता विद्यापीठात पाली आणि बौद्ध तत्त्वज्ञान यांचे अध्यापन सुरू केले. बडोद्याच्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना काही विद्याव्यासंगाचे काम व पैसे देऊ केले. ते स्वीकारून प्रथम मुंबई आणि नंतर बडोदा येथे त्यांनी वास्तव्य केले.

मीरा कोसंबी या त्यांच्या नातीने लिहिलेल्या ‘धर्मानंद कोसंबी: दी इसेंशियल रायटिंग’ या पुस्तकात त्यांचे संपूर्ण आयुष्य तसेच त्यांच्या लेखनाची पूर्ण सूची दिलेली आहे. त्यांचे लेखन मुख्यतः मराठी आणि इंग्रजी या भाषांत आहे. त्यांचा संस्कृत, पाली, इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, रशियन या भाषांशी परिचय होता. धर्मानंद कोसंबी यांचे प्रकाशित झालेले ग्रंथ- बुद्ध, धर्म आणि संघ, बुद्धलीला सारसंगह, समाधिमार्ग, बौद्धसंघाचा परिचय, हिन्दी संस्कृती आणि अहिंसा, सुत्तनिपात, भगवान बुद्ध- पूर्वार्ध व उत्तरार्ध, जातककथा संग्रह, बोधिसत्त्व (नाटक), पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, भगवान बुद्ध, लघुपाठ, बुद्ध व बुद्धधर्म हे आहेत. त्याशिवाय त्यांनी बोधिसत्त्व या नाटकात सिद्धार्थाला वार्धक्य, मृत्यू इत्यादी गोष्टींचे दर्शन होऊन तो विरक्त बनला आणि पुढे गौतम बुद्ध झाला ही कथा न स्वीकारता, सिद्धार्थाच्या मनात संन्यासविषयक विचार आधीपासूनच होते, वैयक्तिक दुःखापेक्षा समाजिक दुःखामुळे तो विरक्त झाला, तसेच त्या विरक्तीमागे काही राजकीय आणि सामाजिकही कारणे होती. अशाप्रकारची मांडणी केली आहे. निवेदन हे त्यांचे आत्मचरित्रपर लेखन साहित्यदृष्टीने मराठीतील महत्त्वाचे लेखन आहे. कुशाग्र बुद्धी, संस्कृताचे उत्तम ज्ञान, नंतर बौद्धधर्म प्रचलित असलेल्या सिलोन, ब्रह्मदेश वगैरे देशांत जाऊन तेथील विहारांत बौद्ध भिक्षूच्या वृत्तीने राहिले. तेथे नाणावलेल्या बौद्ध गुरूंच्या हाताखाली मूळ पाली भाषेत बौद्ध धर्मग्रंथांचे यथासांग अध्ययन केले. बौद्धधर्मावर जिवापाड श्रद्धा म्हणून अनेक दु:सह संकटे सोसून केलेले अध्ययन, विसाव्या शतकात शोभेल अशी सारासार व ऐतिहासिकदृष्ट्या विचार करण्याची पद्धती या सर्व गुणांमुळे त्यांचे बौद्ध धर्मासंबंधीचे लेखन आदरास पात्र आहे.

धर्मानंद कोसंबींच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची समाजवादी विचारसरणी. त्यांना कार्ल मार्क्स् आणि त्याचे विचार या गोष्टी माहीत होत्या. कामगारांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना होती. त्यांच्या विचारसरणीचा हा भाग तुलनेने अज्ञात राहिला आहे. मीरा कोसंबी यांनी मात्र त्यांच्या या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण, पदव्या नसतांनाही त्यांनी केलेले शैक्षणिक आणि विशेषतः पाली, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अध्ययन, अध्यापन, प्रसारण या क्षेत्रातील त्यांचे कार्य अपवादात्मक म्हणावे लागेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि विद्याव्यासंगाच्या इतिहासात त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी पाली भाषेतील विसुद्धिमग्ग या ग्रंथाची चिकित्सित आवृत्ती तसेच बोधिचर्यावतार आणि बुद्ध, धर्म आणि संघ (मराठी) या ग्रंथांचे लेखन केले. सन १९१० साली वूडस यांच्या सूचनेनुसार वारेन यांना विसुद्धिमग्गाच्या कामात सहकार्य करण्यासाठी ते हार्वर्ड् विद्यापीठ- केंब्रिज, अमेरिका येथे गेले. मधल्या काळात रा.गो.भांडारकरांच्या सहकार्याने त्यांनी मुंबई विद्यापीठात पाली भाषेचा अभ्यासक्रम सुरू केला. अमेरिकेतून परत आल्यावर त्यांनी भारतातील आपले पाली भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचे कार्य चालूच ठेवले. तसेच मराठीमध्ये या विषयांवरील लेखनही चालू ठेवले. काही काळ पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातही ते पाली भाषेचे अध्यापन करीत होते.

पंडित धर्मानंद कोसंबी या विद्वानाने स्वयंस्फूर्तीने मृत्यूचा जाणीवपूर्वक स्वीकार केला. त्यांचे दि.२४ जुलै १९४७ रोजी महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे निर्वाण झाले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जयंतीच्या पावन पर्वावर त्यांना व त्यांच्या अतुलनीय लेखनास मानाचा मुजरा !!

✒️संकलक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(रा.डि.शै.दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी,मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,ता. आरमोरी, जि.गडचिरोली.फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.