धर्मास बाधक ‘मी’: साधक फक्त तू!

36

येथे ‘मी’ म्हणजे मीपणा अर्थात गर्व, वृथाभिमान किंवा अहंकार होय. तर धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजवर जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांती व समाधान दिले. त्यासोबतच मानवाच्या मीपणाच्या पगड्यात सापडून अधर्माने आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्त्य भाषेत समानार्थी शब्द नाही. ‘बेसिक इंस्टिंक्ट’ हा धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा इंग्रजी शब्द आहे. तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णू शकत नाही. ‘रिलिजन’ हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द सांगतात, मात्र तो असूच शकत नाही. सर्व धर्म समान असतात, ही एक खुळचट समजूत आहे. जीवन संजीवनी मनुष्यधर्मास कारक फक्त ‘मी’ आहे, असा उहापोह श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी हे करत आहेत… – संपादक.

जगद्गुरू संत तुकारामजींनी गुह्य उघड केले ते आधी अभ्यासू-
“एका बीजा केला नास। मग भोगले कणीस।।
लाभ नाही फुकासाठी। केल्याविणा जीवाआठी।।
तुका म्हणे रणी। जीव देता लाभ दुणी।।”
(पवित्र अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची-१३१)

धर्म या शब्दाचा मूळ अर्थ की वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित असण्याचा दावा असतो. पवित्र ग्रंथ महाभारत अनुसार- “ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||” अर्थात- ‘समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म होय.’ वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे, म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. ‘धृ’ म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला, तर ज्या गुणवैशिष्ट्यामुळे एखाद्या वस्तूला वा सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झालेले असते, त्या गुणवैशिष्ट्यास धर्म म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मूळार्थ ‘धारण करावा तो धर्म’ हाच आहे. मानव ‘मी’ने बाधित वा अहंकारी होऊन त्याचे रूप अभद्र करतो, तेव्हा तो अधर्म म्हणून तिरस्कारला जातो. त्यामुळे स्वतःसह जगाचीही अपरिमित हानी होत असते. भगवान श्रीकृष्णजीने म्हटले-

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानम धर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम्।।७।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।८।।”
(पवित्र श्रीमद्भगवद्गीता: ज्ञान कर्म संन्यास योग: अध्याय ४था)

अर्थ- ‘हे अर्जुना, जेव्हा जेव्हा अधर्म बोकाळून धर्मास ग्लानी येते, तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेतो. संतांचे सत्व रक्षून दुष्कृत्यांना नष्ट करण्यास आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यास मी युगी युगी जन्म घेतो.’

धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती किंवा अंगभूत गुणविशेष होय. हे बाहेरून कसे काय आणता येतील? ते मुळचेच असतात. उदाहरणार्थ- १) निर्जीव वस्तू: पाणी या वस्तूचा अंगभूत गुण शीतलता, हवेचा चंचलता, अग्निचा दाहकता, पाषाणाचा जडता होय. २) सजीव- वाघ: भूक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यांपासून संभाव्य धोका टाळण्यासाठी (अस्तित्व टिकविण्यासाठी) हिंसा करणे. त्यास कितीही भूक लागली असेल, शिकार मिळाली नसेल वा मिळणार नाही असे समजले असेल तरीही तो गवत खात नाही, अर्थात अखाद्य न खाणे होय. वंद.राष्ट्रसंत तुकडोजी स्पष्ट करतात-

“परस्परांशी वागणूक। ज्यात न्याय-नीति सम्यक।
प्रत्येकाचे कर्तव्य चोख। धर्म असे तया नाव।।”
(पवित्र ग्रामगीता: सद्धर्म मंथन पंचक: अध्याय २रा: ओवी क्र.६)

मनुष्याशी निगडित उदाहरण- माता: ममत्व वा वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारिकेमध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थेत असू शकेल, पण एकदा का ती आई झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. ममत्व व मातृत्व ही स्त्रीमधील उपजत सहज अंगभूत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्‍न करेल, तरीही ती नष्ट होणार नाही. मात्र तिने ती जोपासली पाहिजे. गोस्वामी तुलसीदासजींनी लिहिले-

“एहिं कर फल पुनि बिषय बिरागा|
तब मम धर्म उपज अनुरागा||
श्रवनादिक नव भगति दृढ़ाहीं|
मम लीला रति अति मनमाहीं||”
(पवित्र रामचरित मानस: ३:१६:४)

साधक धर्मपालनाच्या हेतुने नवविधा भक्ती- श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, पुजन, सख्य, दास्य, वंदन, समर्पण यापैकी एक वा अनेक करून बघतात. तशीच ती माताही बाळासाठी निकराने स्वतःच्या जीवाशी देखील खेळते. स्वतःचा जीव संकटात टाकून बाळाला वाचवणाऱ्या माता आपल्याला ज्ञात आहेत. यास मातृधर्म असे म्हणतात. थोडक्यात, स्वतःच्या बाळासाठी जे जे योग्य आहे, ते ते करण्याची उत्‍स्फूर्त प्रेरणा, ज्यात मीपणाचा लवलेशही नसतो. त्या अनुषंगाने त्याच्या पालनपोषण व संस्कारांसाठी ती स्वतःच्या दिनचर्येत तसेच सामाजिक वर्तणुकीत बदल करते. ही मूलभूत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या मातेस अपत्यासाठी होणारी उत्स्फूर्त प्रेरणा व त्याद्वारे तीला होणारा कर्तव्यबोध. यास मातृधर्म असे म्हणतात. तद्वतच पिता: पितृधर्म, पुत्र: पुत्रधर्म, मित्र: मित्रधर्म, राजा वा राज्य: राजधर्म आदी आहेत. धर्माचे पालन करताना मीपणास ठार करावे लागते. महात्मा तथागत गौतम बुद्ध म्हणतात-

“न तेन होतिधम्मट्ठो येनत्थं सहसा नये। यो च अत्थं अनत्थञ्च उभो निच्छेय्य पण्डितो।।१९.१।।
असाहसेन धम्मेन समेन नयती परे। धम्मस्स गुत्तो मेधावी धम्मट्ठो’ति पवुच्चति।।१९.२।।”
(पवित्र धम्मपद: गाथा २५६-५७: धम्मट्ठवग्गो)

अर्थ- ‘झटपट न्याय न्यायदान करणारा धर्मस्थ होत नाही. जो पंडित अर्थ व अनर्थ दोन्हींचा निश्चय करून शांतपणे विचारपूर्वक निःपक्षपणे धर्माने न्यायदान करतो तोच धर्मरक्षक असून खरा न्यायाधीश म्हटला जातो.’
वरील उदाहरणे मनुष्याशी निगडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्मांचे आचरण करू शकतो. तो मनुष्य कोणत्या भूमिकेत आहे, त्यावरून त्याचा धर्म ठरतो. अहंकारीवृत्ती- मीपणा अधर्माचे बीज ठरते, म्हणून ‘तू’ला महत्त्व देऊन वागावे. युगदृष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी म्हटले-

“मैं में हैं अभिमान साधो तू में ये भगवान हैं।
मैं से होती जीवन हानी और तू से कल्याण हैं।
मैं मेरी न कर मन मेरे तू ही तू ही करता जा।
कहे ‘हरदेव’ सदा दुनिया में आनंद से विचरता जा।।”
(सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.१९१)

मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरून आहे, ते करणे म्हणजे त्या त्या परिस्थितीतील धर्म होय. अर्थातच धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म व रिलिजन, अगदीच काय तर संप्रदाय यांचा दूरदूरचाही संबंध नाही. शेवटी धर्म म्हणजे उपजत वृत्ती, सहज प्रवृत्ती, अंगभूत गुण, योग्य, सत्य, सदोदित सत्य, नित्य, अंतःप्रेरणा, नीती, न्याय इत्यादी इत्यादी होय. म्हणून ‘मी-माझे’ हा स्वार्थ त्यागून ‘तू-तुझे’ हा समर्पण भाव अंगीकारावा. तेव्हाच कुठे मिरविता येईल की आपण धर्मी आहोत. अन्यथा जग सिद्ध करेल की, तो अधर्मी!

✒️संतचरणधूळ:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी(मानवता धर्म व अध्यात्म ज्ञान-विज्ञानाचे विश्लेषक)द्वारा- प.पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास.मु. एकता चौक, रामनगर- गडचिरोली.पो.ता.जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com