झाडीबोली साहित्य मंडळ वर्धापनदिन आणि लोककला दिन लाखनीत उत्साहात संपन्न …

27

🔹गावोगावच्या तरूणांचा बोलीसंवर्धनाच्या संबंधित वाढता सहभाग कौतुकास्पद – संशोधन महर्षी डाॕ. हरिश्चंद्र बोरकर

✒️लाखनी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लाखनी(जि.भंडारा)(दि.11ऑक्टोबर):-झाडीबोली साहित्य चळवळीचा ३१ वा वर्धापनदिन, मराठी बोली साहित्य संघाचा १८ वा वर्धापनदिन आणि संशोधन महर्षी डाॕ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी होणारा लोककला दिन अश्या त्रिवेणी कार्यक्रमाचे आयोजन काल समर्थ महाविद्यालय लाखनी (जि.भंडारा ) येथे करण्यात आले होते. उदघाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिगंबर कापसे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डाॕ. हरिश्चंद्र बोरकर होते. झाडीपट्टीची बहिणाबाई सौ. अंजनाबाई खूणे ,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , शाहीर सुबोध कान्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमात माजी आ.डाॕ. हेमकृष्ण कापगते यांचा अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्ताने, हिरामनजी लांजे यांचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने चारोळीकार डाॕ.राजन जयस्वाल यांचा म. काळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर दुसऱ्या अ.भा.पोवारी बोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड. लखनसिंह कटरे (बोरकन्हार) यांचाही भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

प्रास्तविकपर मनोगत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले.तर लोककलावंताची भूमिका सुबोध कान्हेकर यांनी मांडली. याप्रसंगी डाॕ. हरिश्चंद्र बोरकर म्हणाले, झाडीबोली चळवळीचे भवितव्य उज्जवल असून अलिकडे तरूणांचा वाढता सहभाग ही समाधानाची बाब आहे.म्हणून आपण केवळ कार्यक्रमलोलुप न होता उपक्रमशील बनले पाहिजे .ते पुढे म्हणाले, मराठी भाषा येत्या वीस वर्षात संपणार आहे हा आम्ही ऐकलेला नागरी व्यासपीठावरचा आक्रोश आता बोलीचळवळीमुळे थांबला असून आता ज्ञानदेवांची मराठी , संत तुकारामांची ,राष्ट्रसंताची मराठी कदापिही संपणार नाही .आतातर गावातला कष्टकरी माणूसच आपली बोली टिकवून ठेवण्यासाठी पुढे येत आहे,असे गौरवोद्गार झाडीबोली चळवळीचे प्रणेते डाॕ. बोरकर यांनी काढून बोली साहित्यिकांचे मनोबल वाढवले.

याच कार्यक्रमात डाॕ. संजय निंबेकर लिखित डाॕ. हरिश्चंद्र बोरकर सृजनसूची आणि नाट्य तपस्वी डाॕ. हरिश्चंद्र बोरकर यांची नाट्यसृष्टी या दोन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले तर गडचिरोलीचे डाॕ.चंद्रकांत लेनगुरे यांच्या चंद्राशी चक्कलस ह्या चारोळीसंग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. सुरूवातीला वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्ताने “मनी नाही भाव देवा मला भाव” या गीतांचे गायन ज्येष्ठ श्रीगुरूदेव सेवक प्रभू भूरे आणि सुप्रसिद्ध लोकगायक नंदू मसराम (वैरागड)यांनी केले. झाडीबोली गौरव गीतांचे गायन कवी लोकराम शेंडे (बुटीबोरी )यांनी केले तर कवी नारायण निखाते (तळेगाव शा.पं)यांनी मराठी बोली गीतांचे गायन केले.लोकगीतांचे गायन सुप्रसिद्ध शाहीर अरूण बन्सोड आणि चमू यांनी सादर केले.

या चळवळीतील दिवंगत साहित्यिकांचे स्मरण कवी पंडीत लोंढे (वरोरा- शाखाध्यक्ष ) यांनी “दूकोडा “च्या अंतर्गत करून दिले.सूत्रसंचालन कवी मिलिंद रंगारी यांनी केले तर
आभार प्रा.डाॕ. संजय निंबेकर यांनी मानले. झाडीबोली साहित्य मंडळाच्या लाखनी शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा प्राचार्य डाॕ. कापसे यांनी केली, त्यात डाॕ. संजय निंबेकर यांची लाखनी शाखाध्यक्ष म्हणून सर्वांनुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमास झाडीबोली साहित्य मंडळाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख कवी अरूण झगडकर , लक्ष्मणराव खोब्रागडे ,संतोषकुमार उईके, रामकृष्ण चनकापुरे , मुल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले , सौ. प्रभाताई चौथाले , युवा पत्रकार तथा चारोळीकार पवन पाथोडे, वरोरा शाखेचे सचिव श्री. कानकाटे, कवी पालिकचंद बिसने ,कुंजीराम गोंधळे आदी साहित्यिक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.
————————