शेख साहील ची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

62

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.18ऑक्टोबर):-कड़ा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचा एम.एस्सी.या वर्गातील विद्यार्थी साहिल राज शेख याने औरंगाबाद येथे झालेल्या पावर लिफ्टींग स्पर्धेत यश संपादन केले आहे.त्यामुळे लवकरच गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.साहिलच्या यशाबद्दल महाविद्यालयात प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील धानोरा येथील डॉ.राज शेख यांचा मुलगा साहिल हा वेट लिफ्टींग मध्ये करिअर करीत आहे.महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टींग असोसिएशनने औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत साहिल शेख याने १०५ किलो वजन गटातुन खेळताना २०५ किलो वजन उचलुन यश संपादन करीत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

महाविद्यालयात झालेल्या साहिलच्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व प्राचार्य डॉ.हरिदास विधाते हे होते.यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य बापु खैरे,उपप्राचार्य एस.एन.वाघुले,प्रा.बाळासाहेब धोंडे,प्रा.भाऊसाहेब काळे,प्रा.सांडु भगत,प्रा.मुश्ताक पानसरे हे उपस्थित होते.यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी सांगितले की,साहिलचे पावर लिफ्टींगमधील यश हे कौतुकास्पद आहे.संस्थाध्यक्ष माजी आमदार भिमराव धोंडे हे स्वतः खेळाडू आहेत,संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातील खेळाडूंना ते नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम करतात.

धानोरा गावासारख्या छोट्या गावातील साहील राज शेख यांच्या उत्कृष्ट खेळामुळे भविष्यात आपल्या महाविद्यालयाचे,गांवाचे,जिल्ह्याचे आणि राज्याचे नांव निश्चित उज्वल होईल असा विश्वास प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.बाळासाहेब धोंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.मुश्ताक पानसरे यांनी मानले.आनंदराव धोंडे महाविद्यालयाने साहिलचा सत्कार करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकुन मनोधैर्य वाढविण्याचे काम केले त्याबद्दल त्याचे वडील डॉ.राज शेख यांनी महाविद्यालयास धन्यवाद दिले.