समाजात नम्रतेने सेवाकार्य करीत राहणे हेच स्वयंसेवकांचे खरे युद्ध- श्री अरविंदजी कुकडे

32

🔸राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्रम्हपुरी नगराचा विजयादशमी उत्सव संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18ऑक्टोबर):-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्रम्हपुरी नगर तर्फे अलिकडेच विजयादशमी उत्सवाचे आयोजन लोकमान्य टिळक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्रमुख वक्ते श्री अरविंद कुकडे विदर्भ प्रांत सहसंपर्क प्रमुख , नागपूर , तद्वतच प्रमुख अतिथी म्हणून श्री चैतन्य मातुरकर कार्यकारी व्यवस्थापक एच.डी.एफ.सी. बँक ब्रम्हपुरी हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे मंचावर श्री जयंतराव खरवडे चंद्रपूर विभागसंघचालक , श्री हरीदास दोनाडकर ब्रम्हपुरी तालुका कार्यवाह , श्री स्वप्निल माकोडे ब्रम्हपुरी नगर कार्यवाह प्रामुख्याने उपस्थित होते.

विजयादशमी उत्सव प्रसंगी नगरातील तरूण व व्यावसायिक स्वयंसेवकांनी योगासन , सामुहिक समता , नियुद्ध , व्यायामयोग इत्यादी शारीरीक प्रात्याक्षिक सादरीकरण केले. घोषदलाचे प्रात्याक्षिकासह बौद्धिक विभागाच्या सांघिक गीत , वैयक्तिक गीत , सुभाषित , अमृतवचन यांचे देखिल सादरीकरण करण्यात आले.प्रमुख वक्ते अरविंद कुकडे यांनी आपल्या उद्बोधनातून विजयादशमी उत्सवाचे महत्व , कोविड काळातील संपूर्ण देशातील स्वयंसेवकांचे सेवाकार्य , अयोध्येतील राम मंदीर निर्माण अभियानाची यशस्विता इत्यादी विषयाचे समयोचित विवेचन केले.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्ष २०२५ पर्यंत समाजात जाऊन अतिशय नम्रतेने सेवाकार्य करण्याचे व सज्जन शक्तिंची मने जिंकून संतप्रवृत्तीच्या मंडळीचा आशिर्वाद प्राप्त करून आपल्या कार्याची गती वाढविण्याचे आवाहन केले.प्रशासकीय दिशानिर्देशांचे पालन करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ब्रम्हपुरी नगर कार्यवाह स्वप्निल माकोडे यांनी केले. उत्सवाच्या यशस्वितेसाठी नगरातील , जिल्ह्यातील पदाधिकारी तथा सर्व स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.