रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड तर्फे महिला नव उद्योजिकांसाठी विशेष व्यासपीठ

24

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.25ऑक्टोबर):-स्त्री पुरुष समानतेच्या प्रवाहात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात समर्थपणे उभी आहे तसेच भविष्यात आर्थिक व सामाजिक विकासाच्या जागतिक वाटचालीमध्ये महिला उद्योजकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे तथापी अनेक कारणांमुळे महिलांना त्यांच्या उद्योजकीय कार्यक्षमतेला पुरेसा वाव मिळत नाहीए. सद्यस्थितीत महिला उद्योजकांपुढे व्यवसाय सुरू करण्या साठी अथवा व्यवसाय वृद्धी साठी अनेक आव्हाने आहेत आणि याच जाणिवेने रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड च्या वतीने नवनी ( नर्चरींग आत्मनिर्भर वूमेन विथ नॉवेल इनिशिएटिव्स) हे व्यासपीठ सुरू करण्यात आले असून त्या द्वारे सर्व स्तरातील महिला नवउद्योजिकांसाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शनपर उपक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा नुकतीच प्रसिद्ध बायकर आणि रोटेरियन जय भारती आणि रोटरी इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट 3131 च्या नवनिर्वाचित प्रांतपाल मंजु फडके यांनी केली.

शहरातील आणि ग्रामीण भागातील महिलांना वाहन चालवायला शिकवून आत्मनिर्भर बनवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या जय भारती यांनी अनेक राज्यांतून एक लाख किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास दुचाकी वरून करण्याचा विक्रम केला असून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात त्या म्हणाल्या वाहन चालवता येणं ही काळाची गरज आहे. भिती आणि न्यूनगंड याच्या पलीकडे ज्या सुवर्णसंधी आहेत त्या महिलांनी पाहिल्या पाहिजेत. दक्षिण भारतात महिला रिक्षा चालकांची संख्या कित्येक हजारावर असून कोविड च्या काळात रिक्षा वाहतूक बंद झाल्यावर या महिलांनी कोविड अम्ब्युलंस चालवून आपला चरितार्थ चालवला. मंजू फडके म्हणाल्या, मुळात महिला एक उत्तम व्यवस्थापक असते घरातील जमाखर्च, कामाची आखणी, नियोजन उत्तम प्रकारे करण्याचं कौशल्य तिच्यात नैसर्गिक रित्या असतं. महिलांना मार्गदर्शन, योग्य दिशा मिळाली तर बाहेरच्या जगात ही त्या उत्तम कामगिरी करू शकतात आणि ही गोष्ट वेळोवेळी सिद्ध झाली आहे.

नवनी व्यासपीठा बाबत बोलताना रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या अध्यक्षा अश्विनी गणपुले म्हणाल्या, प्रगत शिक्षण, मार्गदर्शन आणि सर्वस्पर्शी व्यवस्थापना द्वारे महिला उद्योजिकांना आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र देणे हे या व्यासपीठाचे प्रमुख ध्येय आहे. क्लब च्या व्यावसायिक सेवा संचालिका अनुजा कोल्हटकर म्हणाल्या, या व्यासपीठामुळे महिला उद्योजिकांना त्यांच्यातील गुण आणि कौशल्याची जाणीव होईल आणि त्या व्यवसायवृध्दीची नवनवीन क्षेत्रे काबीज करतील.

नवनी उपक्रमा अंतर्गत विविध क्षेत्रातील विविध पार्श्वभूमी असलेल्या दहा महिला उद्योजिका निवड समिती द्वारे निवडण्यात आल्या. या दहा महिलांना त्यांच्या व्यवसाय वृद्धी साठी आवश्यक सर्व मार्गदर्शन क्लब तर्फे नियुक्त केलेल्या मार्गदर्शकांकडून केले जाणार आहे. कार्यक्रमास क्लब चे सचिव सुधीर बापट, संचालिका मेधा राजपाठक ढोरजे, पराग मुळे उपस्थित होते.