राज्यात बैठका आणि जागर रथयात्रा काढून समाजाचा कल आजमावणार – नवनाथ पडळकर

56

🔸धनगर आणि ओबीसी जाती आता एकत्र लढा उभा करणार

✒️जेजुरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

जेजुरी(दि.26ऑक्टोबर):- दरवर्षीप्रमाणे जेजुरीगड दसरा मेळाव्याचे आयोजन या वर्षी रविवार दिनांक 24 रोजी जय मल्हार सांस्कृतिक सभाग्रह जेजुरी येथे करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सहकाररत्न दादाभाऊ चितळकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व ओबीसी चळवळीचे प्रणेते श्रावण देवरे सर होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या मध्ये राजाराम पाटील,सुधाकर राव आव्हाड,अशोकराव कोळेकर,आप्पासाहेब आखाडे,डॉक्टर विष्णुपंत गावडे आदी मान्यवर होते.

प्रमुख उपस्थितीमध्ये विजय बोडेकर भगवानराव जराड जगन्नाथ पैकेकरी धोंडीराम मलगुंडे,रामदास महानवर,राजु गोडे, दत्तात्रय गवते, अरविंद एलपले, सुनील गोटखिंडे, विक्रम माळवदकर,अनिकेत भालेराव,रवींद्र सोलंकर आदी मान्यवरांचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे आयोजन दसरा मेळावा संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा भाऊ चितळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ओबीसींच्या जातनिहाय जनगणना, ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण, प्रमोशन मधील आरक्षण प्रश्नामुळे अडचणीत आलेला भटक्या-विमुक्तांचा कर्मचारीवर्ग आदी मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. धनगर आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न यावर देखील त्यांनी सर्व प्रस्थापित पक्ष्यांच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवले.

येत्या काळात महाराष्ट्र मध्ये ओबीसी भटका,विमुक्त,धनगर साळी माळी कोळी तेली रामोशी अशा अठरापगड जातींना एकत्र येऊन स्वतःच्या हक्काचा लढा स्वतः उभा करावा लागेल. यासाठी संघर्ष करण्याची तयारी आजच्या युवकांनी ठेवावी. प्रस्थापितांच्या वळचणीला न जाता आता ओबीसींनी स्वतःची राजकीय वाट तयार करावी. यासाठी राज्यभर फिरून जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली. तळागाळातल्या खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्याला या चळवळी बरोबर जोडल्या शिवाय ओबीसी चळवळ यशस्वी होणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.दसरा मेळावा संयोजन समितीच्या वतीने आयोजक नवनाथ पडळकर यांनी सर्वच प्रस्थापित पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी ओबीसी ची केलेली कोंडी फोडायची असेल तर ओबीसीचा स्वतःचा हक्काचा पर्याय पर्याय निर्माण करण्याच्या भूमिकेवर विचार करण्याची वेळ आलेली आहे असे विचार मांडले. ओबीसी VJ NT मध्ये 85 हून अधिक संघटना कार्यरत आहेत त्या सर्व सामाजिक क्षेत्रात कार्य काम करतात.काही राजकीय पक्षाशी संबंधित असतील.परंतु ओबीसी समूहाला प्राधान्य देऊन काम करणारा हक्काचा कोणताच पक्ष नाही.

त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे.प्रस्थापित पक्षां मध्ये वळचणीला राहून कार्यकर्त्यांची घुसमट होते. अशा कार्यकर्त्यांना पर्याय नसतो.एकदा पर्याय निर्माण झाला की असा कार्यकर्ता देखील नवीन वाट धरल्याशिवाय राहणार नाही. भाषणाच्या शेवटी त्यांनी सहा ठराव मांडले.

१) ओबीसी व्हिजे,एन टी,एसबीसी समाजाला एकत्र करून व मागासवर्गीय,अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेऊन राज्यात आता स्वतंत्र राजकीय शक्ती उभी करावी.त्याचे स्वरूप ठरविण्यासाठी राज्यातील जिल्हानिहाय बैठका घेऊन शेवटी मुंबईत निर्णयाची घोषणा करण्यात येईल.
२) महाराष्ट्रात ओ बी सी भटके-विमुक्त एसबीसी जोडो अभियान राबविणार. त्यासाठी राज्यभर जनजागर रथयात्रा काढून राज्यातील विविध जाती जमातीच्या संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल.
३) महाज्योतीचा निधी, मागसवर्गीय आयोगाचा निधी, धनगर समाजाच्या 13 विकास योजनांसाठीचा एक हजार कोटीचा निधी या बाबी मिळवण्यासाठी ओबीसी भटके-विमुक्त धनगर समाज आता एकत्रितपणे लढा लढणार. ४) धनगर आरक्षण प्रश्नासाठी समस्त ओबीसी, भटके-विमुक्त समाज समर्थन करीत आहेत आणि ओबीसीच्या जातीनिहाय जनगणना, राजकीय आरक्षण अशा लढायांमध्ये आता धनगर समाज हा ओबीसी समाजाच्या खांद्याला खांदा लावून ताकतीने मैदानात उतरण्याचा संकल्प करीत आहे.
५) जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे असा संकल्प आम्ही करीत आहोत त्यासाठी “वाट्टेल ते” अशा स्वरूपाचे नियोजन करण्याचा ठराव करीत आहोत.
६) नवी मुंबई, मुंबई तसेच राज्यातील विस्थापितांच्या जल, जंगल, जमीन व घरांच्या पुनर्वसन लढ्यात राज्यातील तमाम ओबीसी VjNT सोबत, एकत्रितपणे लढाईत उचलणार व या लढ्याला पाठिंबा देणार आहोत.उपस्थित सर्वांनी हात वर करून सर्व ठराव मंजूर केले.

ज्येष्ठ विचारवंत श्रावण देवरे यांनी महाराष्ट्रातल्या सद्य राजकीय,सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला आणि या परिस्थितीत हद्दपार करण्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि त्याचे राजकीय विश्लेषण मांडले. सर्वच ४ प्रस्थापित पक्ष ओबीसी च्या राजकीय आरक्षण विरोधी आहेत. हे या प्रस्थापित पक्षांच्या भूमिकेतून दिसत आहे म्हणून येत्या काळात ओबीसीला तामिळनाडूच्या धर्तीवर ओबीसी केंद्री पर्यायी व्यासपीठ उभे करण्याची गरज व्यक्त केली. सर्व प्रस्थापित पक्षांनी तसेच विस्थापित, वंचित पक्षांनी देखील ओ बी सी चा वापर करून ओबीसीला वाऱ्यावर सोडले. म्हणून आता ओबीसी केंद्री राजकारण उभे करावे लागेल अशी भूमिका त्यांनी मांडली.राजाराम पाटील यांनी भूमिका मांडतांना स्पष्ट केले आज पर्यंत ओबीसी दुसऱ्याच्या मांडवाखाली गेला म्हणून 70 वर्ष प्रश्न जसेच्या तसे आहेत. आता वेळ आलेली आहे ओबीसी ने आता स्वतःलाच मांडव घातला पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीतील युवकांना राजकीय स्वप्न साकार करण्याची संधी यातून प्राप्त होईल.

मुंबई नवी मुंबई आणि राज्यातील विविध प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडताना त्यांनी ओबीसी हा साधन संपत्तीच्या दृष्टीने आवश्यक असणारी शक्ती जोपासणारा समूहा आहे परंतु या साधन संपत्तीवर ताबा आणि नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सरकार च्या मदतीने प्रस्थापित समाज करू पाहते आहे यावर बोट ठेवले आणि म्हणून अशा प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसना चा लढा ओबीसी समाजाने आता हातात घेतला पाहिजे. कारण प्रकल्पग्रस्त मध्ये पुनर्वसनग्रस्थांमध्ये सर्वाधिक भरडला जातोय तो ओबीसी समूह आणि म्हणून त्यांची बाजू आता लढण्यासाठी स्वतंत्र मांडवाची गरज आहे अशी भूमिका मांडली.सुधाकरराव आव्हाड यांनी राज्यात आता ओबीसी जनजागरण यात्रा काढण्याची गरज व्यक्त केली. ओबीसीची श्रद्धास्थाने. प्रेरणा स्थळे यांना जोडणारी ही रथयात्रा नक्कीच महाराष्ट्रातल्या ओबीसीची स्वतंत्र राजकीय शक्ती उभी करण्यास मदत करेल अशी भावना व्यक्त केली.

डॉ.विष्णुपंत गावडे यांनी आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांची मानसिकता ही ओबीसींना गुलामाची कनिष्ठ वागणूक देण्याचीच असल्याचे सांगितले ओबीसींना जर सन्मान निर्माण करायचा असेल व आपले प्रश्न सोडवायचे असतील तर वेगळा राजकीय विचार करण्याची हीच वेळ आहे अशी भावना व्यक्त केली.भगवान जऱ्हाड यांनी गेली ५ वर्षे जेजुरी गड दसरा मेळावा का आयोजित केला जातो याबद्दलची संकल्पना स्पष्ट केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार आंधळे यांनी केले. तर आभार नवनाथ पडळकर यांनी मानले.