✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….

294

हिंदी/मराठी पुरोगामी संदेश डीजीटल न्युज नेटवर्क आज (दिनांक 17जुन2020) पासुन वाचक व जनतेच्या सेवेत समर्पित करताना अत्यानंद होत आहे. साप्ताहिक पुरोगामी संदेशचा प्रारंभ दिनांक 13 मे 2013 पासुन झाला असून वाचकांचा प्रतिसाद उदंड मिळत आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे वाचकांची अभिरुची सुद्धा बदलली असल्यामुळे लिखित माध्यमासोबतच वेबसाईट सुरु करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. वाचकाची मागणी मान्य करणे हे आमचे कर्तव्य समजून आजपासून www.purogamisandesh.in ही डीजीटल न्युज नेटवर्क वेबसाईट जनतेला पर्यायाने वाचकांना समर्पित करीत आहोत.

स्वातंत्र चळवळीत महत्त्वपूर्ण भुमिका असणा-या चंद्रपूर जिल्यातील चिमूर या क्रांतीनगरीतुन साप्ताहिक पुरोगामी संदेशचा जन्म झाला. साप्ताहिक पुरोगामी संदेशचा RNI No : MAHBIL/2013/52974 हा आहे. सन 2013 पासुन सुरु झालेल्या पुरोगामी संदेशने आज बरीच मोठी गगन भरारी घेतली आहे. शासकीय नियमांचे काटेकोर पालन व वाचकांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय विभागाचे शासकीय जाहिरात यादीत पुरोगामी संदेश समाविष्ट आहेत आणि आम्ही (संपादक) महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृत पत्रकार म्हणून कार्यरत आहोत.

सन 1993 पासुन विविध वृत्तपत्रात काम केल्यामुळे पत्रकारिता क्षेत्रांतील चांगले-वाईट अनुभव आमचे पदरी आहेत. पत्रकारितेच्या अनुभवातून आपले स्वतःचे वृत्तपत्र चालविताना झालेल्या यातना शब्दात मांडणे कठीण आहे, ही भावना आमचे वाचक, हितचिंतक, वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार समजून घेणार असल्याची जाणीव असल्यामुळे आता वेबसाईट सुरु करणे आम्हाला कठीण वाटत नाही.

अभिनवतेची कास धरून इतकी वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहोत. याबाबत आम्हाला आनंद होत असतानाच भविष्यात आम्ही स्पर्धेत टिकू का ? हा संभ्रम कायम आहे. परंतु संभ्रमावस्थेत जगण्यापेक्षा स्पर्धा करायचीच नाही, “चालत राहायचे, मार्ग सापडेल,” या आशेवर आम्ही ठाम आहोत. स्पर्धा कश्यासाठी?, स्पर्धेमुळे प्रेरणा मिळण्याऐवजी ताणतणाव निर्माण होत असेल तर मूळ उद्धिष्ट आणि होणारे परिणाम यातील तारतम्य पुनःपुन्हा तपासून पाहायला हवे. स्पर्धेमुळे काही अंशी मूल्यमापन होते, हे खरे असले तरी मूल्यमापन सापेक्षच असते, हे मान्य करायला हवे. कोणत्याही स्पर्धेत सहभागी असलेल्या स्पर्धाकामध्ये एखाद्याने प्रथम क्रमांक मिळविला याचा अर्थ तो जगाल सर्वश्रेष्ठ ठरत नाही. त्याच्यापेक्षा अधिक क्षमता असलेली एक नवे अनेक व्यक्ती या स्पर्धेत उतरलीच नव्हती. या सत्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. रस्ता कधीच चालत नाहीत, रस्त्यावर आपल्यालाच चालायचे आहे. हा सर्वसाधारण नियम/ध्येय आम्ही स्वीकारले आहेत.

समताधीष्टीत समाजनिर्मितीचा ध्यास घेऊन पुरोगामी संदेश वाटचाल करीत आहे व यापुढे सुद्धा हिच वाट पादाक्रांत करायची आहे. सध्या प्रसारमाध्यमाची स्वायत्ता धोक्यात येईल का ? हाही चिंतेसोबतच चिंतनाचा विषय ठरू पाहत आहे. सध्याचे मिडियाचे चित्र फार विचित्र आहे. वाहिनी असो किंवा वृत्तपत्र, प्रत्येक माध्यमाने सध्याच्या काळात बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. कोणत्या बातमीला महत्व द्यावे हे ठरविण्याची पद्धत बदलली आहे. महत्वाच्या घटनाकडे दुर्लक्ष करून अनावश्यक बातम्यांना महत्व दिले जाते. ग्रामीण व शहरी क्षेत्रात काही बातमीदार राजकीय दबावात काम करीत असल्याचे बघून अतीव दुख होत असले तरी त्यावर उपाययोजना शोधून काम करावे लागेल.

पुरोगामी संदेश यापुढे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला-संस्कृती, साहित्य व अन्य रचनात्मक विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत. सोबतच पुरोगामी संदेशची आर्थिक परीस्थिती अत्यंत बेताचीच आहे. या समस्येकरिता आमचे सर्व वाचक, हितचिंतक, वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार उदार अंतकरणाने साथ देतील अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ ठरणार नाही याची जाणीव आम्हाला आहे. आजपर्यंतच्या आमच्या वाटचालीत जनतेचा सहभागाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानून मोकळे होण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहणे आम्हाला आवडेल. यापुढे जनतेच्या भरोश्यावर आम्ही वाटचाल करणार आहोत, तूर्त एवढेच…..

सुरेश डांगे

मुख्य संपादक

पुरोगामी संदेश

(साप्ताहिक / ई – पेपर / डीजीटल न्युज नेटवर्क)