पुस्तक परिचय- संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व (जीवनकला)

24

✒️प्रा.रघुनाथ कडवे,नागपूर व बोढेकर { चंद्रपूर } लिखित निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचे आणि विचारांचे सुंदर असे विवेचन

 

आपल्या देशामध्ये अनेक थोर महापुरुष,समाजसुधारक,देशभक्त,क्रांतीकारक होऊन गेले.
त्यांनी आपलं अवघे आयुष्य समाजासाठी वेचलं.प्रसंगी आपल्याच माणसांशी त्यांनी विरोध पत्करला.समाजातल्या अनिष्ट प्रथा आणि परंपराना त्यांनी कडाडून विरोध केला. या थोर महापुरुषांच्या मांदीयाळी मधील एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणजे वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा.

संत गाडगेबाबा हे कोण आहेत हे सांगायची आज गरज पडणार नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात केलेलं कार्य पाहता असा संत महापुरुष पुन्हा होणार नाही असेच म्हणावे लागेल.वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांच्यावर आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
नुकतेच ” संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व { जीवनकला } हे प्रा.रघुनाथ कडवे आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचण्यात आलं.

त्यांच्या लेखनातून संत गाडगेबाबांचे जीवन आणि कार्य अगदी सुंदरतेने त्यांनी मांडलेले आहेत. संत गाडगेबाबांविषयी वाचकांनी अनेक पुस्तके वाचलेली असतील तरी पण हे पुस्तक वाचकांना संत गाडगेबाबा विषयींचा आदरभाव आणि त्यांचे विविधांगी सेवेचे कार्य पाहून वाचक नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.

लेखकांचा परिचय :-

🍁 लेखक प्रा.रघुनाथ कडवे यांचा परिचय :-

🍁 लेखक प्रा.रघुनाथ कडवे ह्यांनी आजपर्यंत ११२ पुस्तकाचे लेखन व प्रकाशन केलेले आहे.
त्यापैकी ९० पुस्तके राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर लिहिलेली आहे.

🍁 ” ग्रामगीता ” या ग्रंथाचा हिंदी व इंग्रजी भाषेत त्यांनी अनुवाद केलेला आहे.

🍁 डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये त्यांनी २७ वर्ष सेवा दिलेली आहे.

🍁 अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ,गुरुकुंज आश्रमाचे मुखपत्र ‘ श्रीगुरुदेव ‘ मासिकाचे २१ वर्ष त्यांनी संपादक म्हणून काम केलेले आहे.

🍁 महाराष्ट्र राज्य साहित्य ते पुरस्काराने सन्मानित

🍁 आद्य ग्रामगीताचार्य पूज्य रामकृष्ण दादा संत साहित्य सेवा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.

🍁 लेखनकार्याबद्दल दोन रौप्य पदक व एक सुवर्णपदक त्यांना मिळाले आहेत.

🍁 अमेरिकन विश्वचरित्र कोषामध्ये स्थान प्राप्त झालेले आहे.

🍁 नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत विचारधारा समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले.

🍁 साहित्य अकादमीचे प्रशिक्षित अनुवादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.

🌸 लेखक ग्रामगीताचार्य श्री.बंडोपंत बोढेकर यांचा परिचय :-

🌸 लेखक श्री . बोढेकर यांची बारा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
१} संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व { जीवनकला }
२} ” आनंदभान ” हा अभंगसंग्रह
३} झाडीबोली कवितासंग्रह ” खंजिरी ” हा प्रकाशित.
४} परमपूज्य कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य यांच्या जीवनकार्यावरील लेखसंग्रह ग्रामगुरू
५} हरिश्चंद्राची फॅक्टरी
६ } अंतर – मंतर { चारोळी संग्रह }
७) झाडीबोली चळवळीचे सिंहावलोकन
८) डिव्हाईन थाॅटस ऑफ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ( इंग्रजी भाषांतर)
९) ४ काव्य संग्रहाचे संपादन

🌸 राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे मुख्य प्रेरक

🌸 केंद्रीय सदस्य झाडीबोली साहित्य मंडळ साकोली आणि मराठी बोली साहित्य संघ नागपूर

🌸 राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक आणि प्रचारक

🌸 रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

🌸 झाडीबोली आणि राष्ट्रसंत साहित्य संबंधाने झालेली अनेक संमेलने /परिषदा मध्ये मार्गदर्शन, अध्यक्षाचे पद भूषविले.
————————
संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी एका गरीब परिटाच्या घरी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव झिंगरुजी आणि आईचे नाव सखुबाई होते. लहानपणीचे वडिल मरण पावल्यानंतर लहानशया डेबूला घेऊन त्यांची आई माहेरी आली.आपल्या मामाच्या घरी डेबूने कष्टाची कामे केली.पुढे डेबूचे लग्न झाले.मामावर सावकाराचे कर्ज होते म्हणून सावकार डेबूच्या मामाचे शेत आपल्या अंमलाखाली आणण्याचा प्रयन्न करु लागला.डेबूजीने त्याला शेताबाहेर काढले.
यानंतर त्याने संसाराचा त्याग केला.समाजसेवेचे व्रत अंगिकारले.
समाजामधील दुःखी,कष्टी आणि वंचिताचे दुःख पाहुन ते गहिवरल़े.
समाजही अंधश्रद्धा आणि कर्मकांडामध्ये वेढल्या गेलेला होता.अशा समाजाला तारण्याचे काम करावे असा विचार त्यांच्या मनात आला.म्हणूनच कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचे कार्य ते करु लागले.एकंदरीत संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व { जीवनकला } या पुस्तकांमधून त्यांच्या समग्र आयुष्याचा,विचारसरणीचा आणि समाजाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाचा सुंदरपणे वेध घेतलेला आहे.या पुस्तकांमध्ये एकून ३१ प्रकरणे आहेत.या ३१ प्रकरणांमधून दोन्ही लेखकांनी संत गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर सुंदरपणे प्रकाश टाकलेला आहे.
वाचकांनाही हे पुस्तक वाचताना लेखकांनी घेतलेल्या कष्टाचे, बाबांविषयीची माहीती मिळविण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे निश्चितच कौतुक वाटल्यावाचून राहणार नाही.

संत गाडगेबाबांचे लहानपणीचे नाव ‘डेबूजी ‘होते. त्यांना लहानपणापासूनच भजनाची आवड होती. गावामध्ये कुणी कीर्तनकार आले की,डेबूजी ते ऐकण्यासाठी आवर्जून जात असत. मामाच्या गावी दापुर्‍याला असताना ते नदीच्या काठी मामाची गुरे चारायला नेत.तिथेच आपल्या संवगड्यासोबत भजन करीत असत. त्यांना भजन करण्यासाठी टाळ असलेच पाहीजे असे नाही.
टिनपञ्याच्या झांजा आणि राॅकेलच्या रिकाम्या डब्याचे ढोल असले की,त्यांचे काम व्हायचे.या मध्ये त्यांचे मिञ त्यांची सोबत करीत असत.भजन रात्री उशीरापर्यंत चालत असत.त्यामुळे त्यांचे मिञ उशीरापर्यंत उठत असे. गुराढोराची गैरसोय होत असल्यामुळे मुलांचे आई बाप डेबूजीच्या आईकडे तक्रार करीत असे.एवढे सारे होऊनही लहान डेबूजीचे भजनवेड काही कमी होत नसे.

डेबूजी ला वाचता येत नव्हते.ते शाळेत कधी गेलेच नाही. त्याकाळी खेड्यापाड्यात शाळाच नव्हत्या. डेबूजींना वाचता येत नव्हते तरी पण कुणी अभंग म्हटला की, ते मन लावून ऐकत असे .काही वेळातच त्यांना तो अभंग पाठ होऊन जाई.डेबुजींची बुद्धी मेधावी आणि कुशाग्र होती हे या घटनेवरुन लक्षात येते.

डेबूजीचा लहानपणापासूनच आध्यामिक मार्गाकडे ओढा होता.त्यांच मन भजन,कीर्तन याकडेच जास्त लागलेलं असायच.घर संसारामध्ये त्यांच मन कधी रमलं नाही.

डेबूजीनी १ फेब्रुवारी १९०५ रोजी घराचा त्याग केला. आपल्या जीवनात काय करायचे आहे हे त्यांनी ओळखले असावे. संत गाडगेबाबा कुण्या गावी गेले की, त्यांचा मुक्काम हा देवळात किंवा चावडीत असत. तिथे ते भजन म्हणत. सोबत गावकरीही असायचे. सुरुवातीला काही भजने म्हणत. संताचे अभंगही म्हणवून दाखवित. रोजच्या व्यवहारातले ते दाखले देऊन लोकांना समजावून सांगत. त्यामुळे लोकांना हळूहळू त्यांचे बोल आवडायला लागले.
रात्री भजन झाले की, पहाटेस ते उठून दुसर्‍या गावी निघून जात.गावामध्येच एक दोन घरची भाकरी मागत.

आपल्या देशामध्ये कीर्तनाची फार मोठी पंरपरा आहे. याच कीर्तनातून संत तुकारामानी,संत नामदेवानी, संत कबीरांनी सामाजिक प्रबोधन केले. समाजातील अनिष्ट प्रथा आणि रुढीवर त्यांनी प्रहार केले. आणि हाच मार्ग संत गाडगेबाबांनी अवलंबिला. एखाद्या गावात गेले ते मंदिरात उतरत आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करीत. गावामध्ये जाऊन भाकर मागत आणि आज मंदिरात भजन आहे , ऐकायला या असे सांगत.गावकर्‍याना गाडगेबाबांचा चिंध्याचिंध्याचा पोषाख, हातात काठी आणि मडके पाहून हा कुणी भिकारी किंवा वेडा आहे असे वाटत.पण, जेव्हा लोक त्यांचे कीर्तन ऐकत तेव्हा ते त्यांना आवडत असे. सगळीकडे त्यांचे नाव होऊ लागले. संत गाडगेबाबा मानवी जीवनातील प्रत्येक विषयांवर आणि समाजामधल्या अंधश्रद्धेवर, व्यसनावर, कर्मकांडावर आपले विचार व्यक्त करीत. त्यांचा विचारांचा प्रभाव जनसामान्यावर पडत गेला.शिवाय अनेक धनिक, जमीनदारही त्यांचे कीर्तन ऐकायला येत. याच श्रीमंताकडून ते विविध समाजापयोगी कामे करून घेत. त्यांच्याकडून देणगी घेऊन त्यांनी अनेक नदीवर घाट बांधले. शाळा, धर्मशाळा, दवाखाने उभे केले.

आपल्या कीर्तनातुन ते लोकांना मार्गदर्शन करीत असत. व्यसनं करु नका, सावकारांकडून कर्ज काढून मुलींची लग्ने करु नका, मरिआईच्या नावाने कोंबडे, बकरे कापू नका, आपली बुद्धी गहाण ठेवू नका, भ्रमात राहू नका आणि नेहमीच सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा असे ते लोकांना आपल्या कीर्तनातून सांगत.शिवाय त्यांनी लोकांना चांगले कर्म करण्याचा सल्ला दिला.कर्म तसे फळ मिळते,वृद्धांची सेवा करा,बालविवाह करु नका असे ते लोकांना तळमळीने सांगत. आणि कीर्तनाच्या शेवटी ” गोपाला गोपाला – देवकी नंदन गोपाला ” असा गजर करत आणि उपस्थित प्रेक्षकांना म्हणायला लावत.

सर्व माणसे ही एकाच ईश्वराची लेकरे आहोत असे ते लोकांना सांगत. हा उच्च आणि हा नीच असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही.जातीभेद कधी त्यांनी मानला नाही. जातीभेदाच्या भिंती त्यांनी आयुष्यभर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनामध्ये नेहमीच दयाभाव असायचा.प्राणीमात्राविषयी,कष्टकर्‍यांवियी आणि अनाथ बालकांविषयी त्यांच्या मनात दयाभाव होता.अनेक अनाथ वृद्भांना, बालकांना आणि अनाथ स्त्रियांना त्यांनी आधार दिला.असे होते संत गाडगेबाबा. नेहमीच अनाथ, दुर्बल,वंचित यांना आपल्या छत्रछायेखाली घेतले.

संत गाडगेबाबांमध्ये कमालीची सहनशीलता होती. गृहत्याग केल्यानंतर ते इकडे तिकडे फिरत असताना एका गावांमधील मारुतीच्या देवळात गेले.तेथील लोकांनी त्यांची विचारपुस केली. पण बाबांनी त्याना उत्तर दिले नाही. नंतर पाटील आले. अंगावर फाटक्या चिंध्या, एका हातात काठी आणि दुस-या हातात मडके असा हा विचित्र पोषाख केलेला हा कुणी नक्कीच वेडा असे समजून पाटलाने त्यांना ‘ गावाच्या शिवेच्या बाहेर पोहोचवून द्या’ असा हुकूम सोडला.
एकदा तर त्यांना मथुरेला जावेसे वाटले. ते रेल्वे गाडीत बसले आणि भुसावळ आले. नंतर ते एक दोन दिवसात खांडवा जक्शन येथे आले. तिथे त्यांना तिकीट कलेक्टरने तिकीट नाही म्हणून खाली उतरवले तसेच बाबांच्या दोन चार थोबाडीतही दिले. असे अनेक अपमान त्यांच्या वाट्याला आले तरी त्यांनी आपली सहनशीलता सोडली नाही.

संत गाडगेबाबा म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं असं म्हटल्यास वावगं होणार नाही. त्यांनी आपलं अवघे आयुष्य समाजासाठी खर्ची घातलं.त्यांचं लग्न झालेल असलं तरी ते संसाराच्या मोहात कधी पडले नाही. गृहत्यागानंतर ते अनेक गावामध्ये जाऊन कीर्तन करीत.
लोकांच्या डोक्यातला कचरा ते आपल्या कीर्तनातून स्वच्छ करीत. स्वतः मंदिरा सभोवतालचा परिसर स्वच्छ करुन लोकांना स्वच्छतेचा मंत्र देत असत.अंधश्रद्धा, कर्मकांड याविषयी लोकांच्या मनातले ग्रह दूर करीत.हे सर्व करीत असताना त्यांच्या कार्याची कीर्ती सर्वदुर पसरत गेली.त्यामुळे अनेक थोर महापुरुषांशी आणि राजकीय नेत्यांशी त्यांचा जवळून संबध आला.शिक्षणमहर्षी भाऊराव पाटील, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आबेडकर, प.मदनमोहन मालवीय, शिक्षणमहर्षी डाॅ. पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सेनापती बापट, प्र.के.अत्रे यासारख्या अनेक महापुरुषांशी त्यांचा प्रत्यक्ष संबध आला.

संत गाडगेबाबा शाळेत कधी गेले नाही. त्यांना ना वाचता येत होते ना लिहिता येत. तरीपण त्यांचा जगाचा अभ्यास इतर शिकलेल्या पेक्षा खुप मोठा होता.ते प्रखर बुद्भीवादी व्यक्तीमत्वाचे धनी होते. लोकांना विचार करण्यास ते सांगत असे. सत्य काय आणि असत्य काय यांची शहानिशा आपल्या बुद्धीनुसार करावी असे ते लोकांना सांगत.
समाजामधल्या पोटभरु वृत्तीबद्दल ते नेहमीच कडाडून टिका करीत. लोकांवर त्यांच्या कीर्तनाचा प्रभाव पडत असत. कारण त्यांची ओघवती आणि रसाळ भाषा. थेट अंतकरणाला भिडायची. त्यामुळे लोकांना ती आवडायची.तशीच कृतीही लोकांकडून घडायची.

हे ग्रंथवजा पुस्तक वाचनीय आणि दिशादर्शक आहे.
प्रा.रघुनाथ कडवे आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे कौतुक करावे तितके कमीच!पुस्तकामध्ये घटनेविषयी संदर्भ दिलेले आहेत. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संत गाडगेबाबांचे सुविचार दिलेले आहेत. शिवाय पुस्तकामध्ये संत गाडगेबाबांची थोर महापुरुषांच्या सहवासात आलेली छायाचिञे आणि बाबांनी बांधलेल्या धर्मशाळा यांसंबंधीची निवडक छायाचित्रे पुस्तकात दिल्याने पुस्तकाची उंची वाढलेली आहे.

तसेच ह्या पुस्तकाला डेबू सावली वृद्धाश्रम, चंद्रपूर चे कर्तेधर्ते समाजसेवी सुभाषभाऊ शिंदे यांच्या शुभकामना लाभलेल्या आहेत. सुभाषभाऊनी गाडगेबाबांच्या नावाने चंद्रपूरात डेबू सावली वृद्धाश्रम सुरु केलेले आहे. आज या वृद्धाश्रमामध्ये ३० वृद्ध वास्तव्याला आहेत तसेच ह्या पुस्तकाचे विमोचन गाडगेबाबांचे तत्कालीन वाहनचालक तथा निकटवर्तीय ९३ वर्षीय भाऊरावजी काळे ( मुंबई) यांच्या हस्ते, शेतकरी नेते माजी आ.वामनराव चटप, आदर्श राजगडचे शिल्पकार चंदू पाटील यांच्या उपस्थितीत डेबू सावलीत झाले.

आज समाजाला संत गाडगेबाबांच्या विचारांची खरी गरज आहे. हीच गरज लक्षात घेता झालेली पुस्तक निर्मिती अभिनंदनीय ठरते. दोन्हीही लेखकाच्या कार्यास शुभेच्छा देतो.
।। गोपाळा गोपाळा
देवकीनंदन गोपाळा ।!

पुस्तकाचे नांव :- संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व { जीवनकला }
लेखक- प्रा.रघुनाथ कडवे आणि बंडोपंत बोढेकर
प्रकाशक – साईराजे पब्लिकेशन,पुणे
मुखपृष्ठ- सुदर्शन बारापात्रे,चंद्रपूर.
प्रकाशन वर्ष,आवृत्ती :- २३ फेब्रुवारी २०२१, पहिली.
एकूण पृष्ठ संख्या :- १२१
मूल्य -₹ १५०/-

(संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व { जीवनकला } हे पुस्तक आपणास हवे असल्यास खालील भ्रमणध्वनीवर संपर्क करावा. (9975321682/9422186765 )

 

राजू गरमडे,उर्जानगर,चंद्रपूर.