डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार धोरण समजून घेतांना…..

87

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट बुद्धिमतेचे जगात खूप कौतुक होते.त्यांच्या पासष्ट वर्षाच्या जीवनातील संघर्ष हा प्रत्येक माणसा करीता प्रेरणादायी आहे.त्यांनी सोसलेला त्रास, अपमान आणि त्यातुन त्यांनी केलेला त्याग,कष्ट यांची गोळाबेरीज होऊच शकत नाही.पण त्यांनी सर्वावर मात करून मिळविलेल्या पदव्या आम्ही गर्वाने सांगतो.पण त्यांच्या आदर्श घेत नाही.त्यांनी अनेक समस्या वर लिहलेले निबंध प्रबंध आम्ही कधी वाचत नाही.मग आजच्या समस्या उद्या कसा सोडवणार हा प्रश्नच आम्हाला पडत नाही.आम्ही कोण आहोत हेच जर आम्ही विसरत असु तर संविधाना ने दिलेले सर्व अधिकार लवकरच गमावून बसु हे मात्र निश्चित आहे. म्हणुन आम्ही व्यक्तिगत विकास व कल्याण करून घेण्यावर भर दिला तर क्रांतिकारी चळवळ संपल्या शिवाय राहणार नाही.आंबेडकरी विचाराच्या समाजाचे सर्व लक्ष फक्त राजकारणावरच केंद्रित आहे.त्यामुळे इतर महत्वाच्या कामगार क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं दिसते.म्हणुन जाहीर पणे आजच्या कार्यकर्त्यानां विचारावेसे वाटते डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार नेते होते की नाही?.त्यांची कामगार चळवळ माहिती आहे काय?.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार धोरण समजून घेतांना गांभियाने विचार करा.

कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खूप ऐतिहासीक कार्य करून ठेवले पण आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर,गौतम नगर,भीमनगर,रमाबाई नगर,फुले नगर, पाहिले तर तिथे निवडणूका मध्ये सर्वात जास्त कामगार मजूर सर्व पक्षांना मिळतात.किंवा हेच कामगार,मजूर मुंबईतील प्रत्येक नाक्यावर मोठ्या संख्येने मिळतात.अनेक कार्यकर्त्याचे यांच्यावर पोट चालते. का?. कोणी करून ठेवली ही व्यवस्था?. ती मंडळी आंबेडकरी विचारांच्या कामगारा संघटना युनियन मध्ये काम करीत नाही.पण त्यांना लाल बावटा, भगवा, तिरंगा घडीवाला कोणता ही झेंडा खांद्यावर चालतो फक्त रोजगार मिळाला पाहिजे.हीच कायम लाचारी असल्यामुळे संघटीत आणि असंघटीत कामगार मजुरांच्या आंबेडकरी विचारांची स्वतंत्र मजदूर युनियन (इंडिपेंडन्ट लेबर युनियन) उभी राहली नाही. महात्मा फुले रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे यांची सत्यशोधक कामगार चळवळ उभी राहलीच नाही.म्हणजे फुले,लोखंडे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या साठी केलेले कार्य आम्ही विसरतो.म्हणुन आम्हाला बाबासाहेब कामगार नेते वाटत नाही की काय?. हा मोठा प्रश्न या समाजाकडे पाहिल्यावर पडतो.

कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य सामाजिक,राजकीय घटना निर्मिती इत्यादी संबधीचे कार्य हे असामान्य आहेच,पण ह्या कार्या बरोबरच कामगारांच्या उत्कर्षासाठी केलेले कायदे व कामगार वर्गाच्या संबधीचे इतरही कार्य उल्लेखनिय व महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांच्या या अफाट कार्यासंबंधी बहुजन मागासवर्गीय समाजाच्या कामगार,कर्मचारी यांना व त्यांच्या कामगार संघटनांना अजुनही पुरेशी जाणीव झालेली नाही. ही अत्यंत खेदाची बाब म्हणावी लागेल.कामगारांसाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना १५ ऑगस्ट १९३४ ला केली त्यांची बांधणी त्यांनी १९३६ पर्यँत केली.त्याला अपेक्षित यश मिळाले नसेल.पण सफाई कामगारांच्या बळावर मुंबई पालिका निवडणूक लढविली आणि इतिहास घडवून लिहून ठेवला. मनमाड येथे १२/१३ फेब्रुवारी १९३८ रोजी रेल्वे ज्यांच्या जीवावर धावते त्या गॅंगमन लोकांची दोन दिवस परिषद घेऊन देशातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःची ट्रेड युनियन लवकरात लवकर तयार करण्याचे सांगितले होते.त्यांचे ऐकले असते तर आज असंघटीत कामगार दिसलेच नसते.ग्रामसेवक ते सचिवालय पर्यंत आपली मागासवर्गीय कामगार कर्मचारी आहेत.पण ते प्रामाणिक पणे संविधानाची अंमलबजावणी करू शकत नाही.कारण त्यांना कायम राजकीय, आणि जातीय दबावा खाली काम करावे लागते.त्यांचे स्वरक्षण आणि बचाव करण्यासाठी लढणारी युनियन त्यांच्या मागे नाही.त्यामुळेच मागासवर्गीय समाजातील बहुसंख्य असंघटीत कामगार, मजुरांना ते न्याय देऊच शकले नाही.

बाबासाहेबांनी बनविलेले बिल कायद्यात रूपानतरीत होऊन सुद्धा अंमलबजावणी नाही. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी किमान वेतन दर असावेत अशी मागणी विधिमंडळात केली होती. आज भी शेतकरी,शेतमजूरांची नोंद होत नाही आणि किमान वेतन मिळत नाही.१९३७ साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबविण्यासंबंधी खोती पध्दत नष्ट करण्यासंबंधी बिल मांडले.१९३८ साली कोकणातील ‘औद्योगिक कलह विधेयकानुसार’ कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावुन घेतला गेला. पण बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करतांना संप हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे असे मत दिले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशिर अधिकार मिळवून दिला.आता संप होतात आणि तडजोडी घडविल्या जातात. बिलावर भाष्य करतांना मालकांनी आपले अंदाजपत्रक कामगारांसाठी जाहीर करण्याची मागणी बाबासाहेबांनी केली होती.हे अंदाजपत्रक आजही दोन तीन प्रकारे बनविली जातात. त्यातुन अनेक प्रकारे सरकारला आणि कामगारांना मूर्ख बनविल्या जाते.

बाबासाहेबांनी १९३८ मध्ये सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले.त्यांची अंमलबजावणी आज भी किती प्रामाणिक पणे होते हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहुन आर आर पाटील यांनी कोपरा पासुन ढोपरा प्रयन्त सोलुन काढण्यासाठी आदेश काढला होता.त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागात आजही होतांना दिसत नाही.शेतकरी आणि शेतमजूर हे असंघटीत आहेत.आणि ते एकमेकांवर अवलंबून आहेत.त्यांचे शोषण करणारा सावकार व भटजी हे पण एकमेकांना यांना आर्थिक दृष्ट्या लुबाडण्या करीता आणि गुलाम बनविण्या करीता योग्य मदत करीत राहतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर २ जुलै १९४२ ला ते व्हॉईसरॉय मंत्रीमंडळात कामगार मंत्री झाले. हया कारकिर्दीत त्यांनी कामगारांसाठी बरेच कायदे निर्माण केले होते पण त्यांची अंमलबजावणी काँग्रेसच्या सरकारने केली नाही.आणि आताचे आर एस एस प्रणित भाजप सरकार सर्वच कायदे मोडीत काढण्यास निघाली आहे.त्याविरोधात राष्ट्रीय ट्रेड युनियन योग्य आणि निर्णायक भूमिका घेतांना दिसत नाही. कारण मनुवादी,हिंदुत्ववादी त्यांचे शेत्रू नाहीच.म्हणुन ते प्रामाणिक पणे कामगारात जाऊन सरकार विरोधात प्रबोधन करण्याचे टाळतात.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २ सप्टेंबर १९४५ ला कामगार कल्याण योजना सादर केली. ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिध्द आहे.आंबेडकरी चळवळी किती नेत्यांना यांची माहिती आहे.युध्द साहित्य निर्माण करणाऱ्या कारखान्यात एक ‘सयुक्त कामगार नियामक समिती’ स्थापन केली. सेवा योजन कार्यालय ( Employment Exchange ) ची स्थापना केली.कामगारांना अगोदर भरपगारी रजा मिळत नव्हती. १४ एप्रिल १९४४ ला बाबासाहेबांनी भरपगारी रजेचे विधेयक मंजूर केले. कामगारांना कमीत कमी वेतन ठरविण्याची तरतूद असलेले बिल मांडले. ह्यातूनच “किमान वेतन कायदा १९४८” ची निर्मिती झाली.औद्योगिक कलह मिटविण्यासाठी समेट घडवून आणणारी यंत्रणा (लवाद यंत्रणा) उभारण्याची तरतूद केली. सप्टेंबर १९४३ रोजी भरलेल्या त्रिपक्षीय कामगार परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते.त्यात त्यानी कामगारांच्या अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण,सांस्कृतिक गरजा व आरोग्याचे उपाय तसेच कामगारांच्या सामाजिक सुरक्षितते साठी उपाय यावरील ठराव संमत केले.३१ जानेवारी १९४४ रोजी खाण कामगारांसाठी ‘कोळसा खाण कामगार फंडाची’ स्थापना करणारे विधेयक मांडले होते. आज कोळसा खान कामगारात आंबेडकरी विचारांची संघटना का नाही?. ऑगष्ट १९४५ मध्ये औद्योगिक वसाहतीचे नियम व मालकाच्या जबाबदाऱ्या यावर विचारविनिमय करणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यात त्यांनी उद्योगासाठी मौलिक सूचना केल्या. ८ एप्रिल १९४६ ला ‘मिका माईन्स लेबर वेल्फेअर फंडाची’ स्थापना करण्यासंबंधीचे बिल संमत केले. ‘इंडियन्स माईन्स (अमेंडमेंड) ऑर्डिनन्स १९४५’ नुसार स्त्री कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापनावर बंधन घातले.`भारतिय खाण कायदा १९४६’ तयार करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंतमध्ये काम करण्यास व रात्रपाळीस बंदी केली.

‘दि.माईन्स मॅटरनिटी बेनिफिट ऍक्ट’ नुसार खाणीतील स्त्रीयांना बाळंतपणाची (प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर) रजा देण्याची शिफारस केली.‘दि.फॅक्टरी अमेंडमेंट बिल’ संमत करुन कामगारांना १० दिवसाची पगारी रजा आणि बाल कामगारांना १४ दिवसाची पगारी रजा देण्यासंबंधी कायद्यात दुरुस्ती केली.१९४६ च्या बजेट सेशन मध्ये आठवड्याचे कामाचे तास ५४ वरुन ४८ व दिवसाला १० तासांऎवजी ८ तास करण्याचे बिल मांडले.अपघातग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून ‘कामगार भरपाई कायद्याची’ निर्मिती केली. २१ फेब्रुवारी १९४६ साली मध्यवर्ती कायदे मंडळात ‘दि इंडियन्स ट्रेड युनियन्स (अमेंडमेंड) ऍक्ट आणून ट्रेड युनियनला मान्यता देणे व्य्वस्थापनाला सक्तिचे करण्यासंबंधीचे विधेयक मांडले. १९ एप्रील १९४६ ला मध्यवर्ती कायदे मंडळात कमीत कमी मजुरी आणि कामगारांची संख्या किती असावी या संबंधी बिल मांडले व त्याचेच १९ फेब्रुवारी १९४८ ला कायद्यात रुपांतर झाले.बाबासाहेबांनी भारतीय घटनेची निर्मिती केली.त्यातील ‘मार्गदर्शक तत्व’ आर्टिकल ३९ (ड) नुसार पगारदार पुरुषा इतकाच पगार त्याच पदावर काम करणाऱ्या स्त्रियांनाही मिळावा अशी घटनात्मक तरतूद केली.घटनेच्या कलम ४३ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य व सुरक्षित व्यवस्था ठेवण्याची तरतूद केली.या सर्व क्षेत्रात असंघटीत कामगार मजुर बहुसंख्येने मागासवर्गीय होते.आणि आजही आहेत. बाबासाहेबांनी त्यांचा कामाच्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला आणि कायदेशीर मांडणी करून कायम स्वरूपी असंघटीत कामगार मजुरांचा प्रश्न सोडविला होता.पण याच कामगारांच्या संघटना, युनियन भांडवलदार,सावकार,आणि ब्राम्हणी वर्णव्यवस्था,जातीव्यवस्था मानणाऱ्या नेतृत्वाखाली गेल्यामुळे कामगारांना न्याय मिळण्या ऐवजी अन्याय अत्याचाराला दररोज सामोरे जावे लागते. त्याला कोण जबाबदार आहे?.कारण आज ही संघटीत असंघटीत कामगार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कामगार नेते होते हेच मान्य करीत नाही.व बाबासाहेब यांचा वैचारीक वारसा सांगणारे निष्टवंत शिष्य,सैनिक आणि अनुयायी या कामगारांच्या संघटना, युनियन बांधणीचे काम करीत नाही. म्हणुन इंटक,आयटक,सिटू,बीएमएस,एचएमपी सारखी स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) नव्हती.आज ती आदरणीय जे एस पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली सतरा क्षेत्रात व बावीस राज्यात संघटीत असंघटित कामगार,मजुरांचे कुशल नेतृत्व करीत आहे, या सर्व परिस्थीला आपणच म्हणजे आंबेडकरी म्हणुन घेणारे संघटीत असंघटीत कामगार जबाबदार आहोत.यांचा सर्वांनी गांभीर्याने विचार केलाच पाहिजे.

बाबासाहेबांनी कामगारांसाठी केलेल्या तरतुदी कडे संपूर्ण दुर्लक्ष केले.कलम ४३ (अ) नुसार शासनाने कामगारांना व्यवस्थापनात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी तरतूद केली होती.कलम ४३ नुसार शासनाने कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याची तरतूद केली होती. ‘स्टेट्स ऍण्ड मायनॉरिटीज’ या ग्रंथामध्ये वेठबिगार कामगारांच्या प्रश्नाला हात घालतांना बाबासाहेब ‘वेठबिगार हा गुन्हा आहे’ असे मत मांडले होते. कामगारांचे आथिक जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात आर्थिक धोरण स्पष्ट केले होते.आर्टीकल २ सेक्षन २ (४) मध्ये आर्थिक शोषणाच्या विरोधात स्पष्टीकरण केले. त्यात कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संपत्तीची जास्तीत जास्त समान वाटणी करण्याबद्दल राज्याने प्रयत्न करावेत अशी सुचना केली होती. शेतीच्या प्रगतीसाठी व शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी लॅंड मॉर्गेज बँक कामगारांची पतपेढी, खरेदी विक्री संघ इत्यादी स्थापण करण्याविषयी धोरण व्यक्त केले होते.आज हे सर्व आहे.पण त्यात आपला बहुसंख्य मागासवर्गीय कामगार,मजुर, शेतमजूर,शेतकरी कुठे आहे.हे सर्व केंद्र धर्माचे आणि राजकारणाचे व्यापारी, दलाल,अडते (कार्यकर्ते) यांनी काबीज करून ठेवले.कारण आपण बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने न जाता वेगवेगळ्या मार्गाने शॉटकट मारून मोठे होण्याचे स्वप्न पाहतो.व स्वतःला आणि समाजाला चळवळीला घेऊन गटाळ्या खाऊन खाऊन डुबतो.जगात कामगारांनीच सामाजिक,आर्थिक आणि राजकीय क्रांत्या केल्या हा इतिहास आपण बहुसंख्य मागासवर्गीय समाजाचे लोक विसरतो.ज्यांची संख्या भारी त्यात त्यांची भागे दारी असेल तर ज्याची मतदार संख्या जास्त त्यांचाच उमेदवार निवडून आला पाहिजे.मग आता असे का होत नाही.ज्यांच्या कडे पैसा जास्त तो निवडून येणार आणि पाच वर्ष तुमचे शोषण करणार कोणाचे?.कामगार,मजुर,शेतमजूर,शेतकरी यांचेच नां?.मग आता विचार करा बाबासाहेब फक्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार नव्हते तर बहुसंख्य मागासवर्गीय कामगार,मजुर यांना कुशल कारागीर बनविणारे कामगार नेते होते.हेच आपण विसरलो.म्हणुन सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी शेतमजूर,शेतकरी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांच्या कामगार संघटना, युनियनचे स्वतंत्र मजदूर युनियन (इंडिपेंडेंट लेबर युनियन ILU) समजून घेतली पाहिजे.करीता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कामगार चळवळ समजून घ्यावी.

✒️सागर रामभाऊ तायडे (भांडूप, मुंबई)अध्यक्ष- स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य(मो.9920403859)