135 गोवंशासह 59 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त म्हणून तस्करांचे धाबे दणाणले

32

🔸पेंढरी पोलिसांची धाडसी कारवाई तरीही ही तस्करी सुरू राहील का

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि. 22नोव्हेंबर):-गडचिरोली जिल्ह्यातून गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना काही गोरक्षकांच्या मदतीने जिल्ह्यातील पेंढरी पोलिस विभागाने पर्दाफाश केला आहे. यात गडचिरोली जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पेंढरी पोलिसांनी 6 वाहनांसह 59 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई आज, 21 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास पेंढरी येथे केली. याप्रकरणी एकूण 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर तीन जण फरार झाले आहेत. मात्रं वृत लिहीपर्यत फरार झालेले आरोपी पोलीसांना गवसले नाही.

प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातून जवळपास 145 गोवंश वाहनांमध्ये डांबून तेलंगणा राज्यातील कत्तलखान्यात नेण्यात येत होते. यासंदर्भात गोरक्षकांकडून गुप्त माहिती मिळताच पेंढरी पोलिसांनी सापळा रचून गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनांना पकडले. या कारवाईत 7 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 90 गायी व 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 45 बैल असे एकूण 135 गोवंश व 49 लाख रुपये किंमतीचे 6 वाहने असा एकूण 59 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पेंढरी पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, पोलिसांना बघताच ट्रक मधील तस्करांनी वाहने सोडून जंगल परिसरात पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून 5 तस्करांना अटक केली. परंतु 3 तस्कर जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनतर पोलिसांनी गोवंशाने भरलेले 6 वाहन पोलिस ठाण्यात जमा केले.

अवैध गोवंश तस्करीची मोठी कारवाई केल्याने गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहे. सदर कारवाई पेंढरी उपपोस्टेचे प्रभारी अधिकारी पोउपनि सागर पेंढारकर, पोउपनि मनोज बरूरे, पोहवा मडकाम, पोशी विनय, भीमराव, पेंदाम यांनी केली. अधिक तपास पोउपनि धम्मदीप काकडे करीत आहेत.

सविस्तर …अटक व फरार आरोपींची नावे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींमध्ये अब्दुल समीर जहीर शेख (26) रा. राजुरा जि. चंद्रपूर, पुनित अनिल चतुर (26) रा. आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली, रमेश पेंटू रेकलवार (36) रा. वाकडी जि. आसिफाबाद (तेलंगाणा), जमीर शेख दस्तगीर (32) रा. गोयेगाव ता. वाकडी जि. आसिफाबाद (तेलंगाणा), सखा सल्ला खॉन (42) रा. अेरगावन ता. राजूरा जि. चंद्रपूर यांचा समावेश आहे. तर फरार 3 आरोपींमध्ये रवी नैताम रा. चंद्रपूर, दरुण शेख रा. आरीफाबाद व तरुण हलदर रा. छत्तीसगड यांचा समावेश आहे. सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष घटनाक्रम…ग्रामीण भागात सर्रास तस्करी काही महिन्यांपूर्वी एलसीबीने जिल्ह्यात गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई करीत लाखो रुपयांचे वाहन जप्त केले होते. तसेच लाखो रुपये किंमतीच्या गोवंशाला जीवनदान देण्यात यश आले होते. सोबतच जिल्ह्यातील विविध ठिकाणी गोवंश तस्करांवर कारवाई केली जात आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोवंश तस्करीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात गोवंशाची संख्या अधिक असल्यामुळे तेलंगणासह इतर राज्यातील तस्कर याच जिल्ह्यातून गोवंश तस्करी करतात. यामुळे जिल्ह्यात गोवंश तस्करीचा सिलसिला सुरूच आहे.