साहेब,आज तुम्ही हवे होतात…!!!

33

भारतीय जनता पार्टी म्हणजे विशेष समाजाची पार्टी.मध्यमवर्गीयांची पार्टी.शहरापुरतीच मर्यादित पार्टी असे अनेकांचे समज – गैरसमज महाराष्ट्रामध्ये दूर करण्यात गोपीनाथरावजी मुंडे यांचे योगदान मोठे आहे.महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचा इतिहास ज्यांच्यावर भरभरून लिहिल्याविना पूर्णच होऊ शकणार नाही,असं भारदस्त व्यक्तिमत्त्व.दिल्लीच्या राजकारणात पाठविण्यात आलेलं असलं तरीही त्यांचं सर्व लक्ष महाराष्ट्राकडेच असायचं. ‘घार फिरते आकाशी,लक्ष तिचे पिल्लांपाशी…’ अशी मराठीत एक म्हण आहे.गोपीनाथरावजी मुंडे यांचंही तसंच होतं.ते कुठंही असले तरी त्यांचे सारे लक्ष महाराष्ट्रावरच असायचे.‘महाराष्ट्रात परतेन तर मुख्यमंत्री होण्यासाठीच,’ असं त्यांचं गाजलेलं वक्तव्य.तेच स्वप्न उराशी बाळगून त्यांची वाटचाल सुरू होती.देशभरात नरेंद्र मोदी यांची तुफान लाट होती.केंद्रात २८२ जागा जिंकून भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली देखील होती.केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी शपथही घेतली होती.काहीच महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लागणार होती.तोपर्यंत मोदी लाट ओसरण्याची सूतराम शक्यता नव्हती.म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न साकरणार,हे हमखास होतं.मात्र,नियती किती क्रूर असू शकते,याचा प्रत्यय ३ जून २०१४ रोजी आला.

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराष्ट्रात परतलेच नाहीत.आलं ते त्यांचं पार्थिव.अनपेक्षितपणे एका लढवय्या नेत्याची अखेर झाली.दुर्दैव असं,की त्या लढवय्या नेत्याला लढण्याची कोणतीही संधीही मिळाली नाही.गोपीनाथरावजी मुंडेंच्या जाण्यानं महाराष्ट्राला धक्का बसला.भारतीय जनता पार्टी मुळापासून हादरली.३ मे २००६ रोजी प्रमोदजी महाजन यांनी जगाचा निरोप घेतला आणि ३ जून २०१४ ला गोपीनाथरावजी मुंडे परलोकाच्या प्रवासासाठी निघून गेले.दोघांचाही मृत्यू अनपेक्षित.त्यामुळेच चटका लावून जाणारी.कधीकाळी प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथरावजी मुंडे ही जोडी म्हणजेच भाजपा असे गणित महाराष्ट्रात होते.महाजनांचे राजकीय चातुर्य आणि मुंडे यांचे संघटन कौशल्य यांच्या जोरावर भारतीय जनता पार्टी राज्यभर पाय पसरत होती.

भाजपामध्ये नेते होतेही अनेक.मात्र चेहरे दोनच.महाजन,मुंडे.भाजपाची सर्व मदार या दोनच नेत्यांवर होती.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी देशभरात जे केले,तेच मुंडे यांनी महाराष्ट्रात केले.त्यांनी निरनिराळ्या पक्षांमधून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इन्कमिंग’ सुरू ठेवले.भाजपाचा चेहरा,मोहरा बदलण्याचा जोरदार प्रयत्न केला.धनगर समाजातील प्रकाश शेंडगे,मुस्लिम समाजाचे पाशा पटेल,काँग्रेसचे प्रतापसिंह मोहिते – पाटील,जनता दलातून संभाजी पवार,संभाजी पाटील – निलंगेकर आणि असे अनेक नेते भाजपात आणले.त्यांच्यामुळे पक्षाला फायदा किती झाला आणि त्यांचा स्वतःचा फायदा किता झाला,यावर चर्चा होऊ शकते.मात्र,भाजपा हा सर्वसमावेशक आहे,हे जनमानसावर ठसविण्याचा प्रयत्न म्हणून त्याकडे नक्की पाहता येऊ शकेल.

अगदी महादेव जानकर,राजू शेट्टी आणि विनायक मेटे यांना एकत्र आणून त्या सर्वांना सांभाळण्याची कसरत गोपीनाथरावजी मुंडे हेच करू जाणे.रामदास आठवले यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जवळ केले असले तरीही त्यांना अखेरपर्यंत सांभाळले आणि झेलले ते गोपीनाथरावजी मुंडे यांनीच.मुंडे हे एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेणारे किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून बैठका जिंकणारे नेते नव्हते.तर गावागावांमध्ये जाऊन खेड्यापाड्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा सामना करणारे नेते होते.सर्वप्रथम मोठी गारपीट झाली तेव्हा आख्खा मराठवाडा आणि नुकसानग्रस्त भाग मुंडे यांनीच पिंजून काढला होता.तेव्हा भाजपचे इतर नेते कुठे होते आणि काय करत होते,हे शोधावं लागत होतं.अर्थात,या सर्व गोष्टी त्यांच्या रक्तातच होत्या. १९९४ साली भाजप सत्तेवर येण्यात मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचा मोलाचा वाटा होता.मुंडे यांनी विरोधी पक्षाच्या विरोधात जे रान उठविले होते,त्याचा युतीला सत्तेवर येण्यात फायदाच झाला होता.नंतरही मुंडे यांनी गोदा परिक्रमा यात्रा काढली.गोदावरी नदीच्या काठावरच्या गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणं हा त्या मागचा हेतू होता.सांगायचा हेतू हा की मुंडे हे लोकांमध्ये जाऊन मिसळणारे,त्यांना थेट भिडणारे नेते होते.

गोपीनाथ मुंडे यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ.मुंडे कोठेही जावोत,असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासाठी थांबलेले असायचे.कोणी काम घेऊन,अडी – अडचणी सोडविण्यासाठी.प्रश्न सोडविले म्हणून आभार मानण्यासाठी.कोणी स्वागतासाठी.कोणी फक्त भेटण्यासाठी.कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड.कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत घेत यावं लागायचं.कारण ते कोणालाच नाराज करायचे नाही.त्यामुळंच त्यांना अनेकदा कार्यक्रमस्थळी पोहोचायला दीड,दोन,अडीच तासही उशीर व्हायचा.पण त्याची फिकीर मुंडे यांनी कधीच बाळगली नाही. ‘मी लोकनेता आहे.लोकं मला भेटतात आणि त्यामुळं मला उशीर होतो,’ असा किस्सा ते बरेचदा ऐकवायचे.
मुंडे साहेब कार्यकर्त्यांसाठी भांडायचे.कार्यकर्त्याला न्याय मिळावा,म्हणून ते कोणत्याही टोकाला जायचे.अनेकदा अनेक नेते स्वार्थापोटी किंवा तडजोडीसाठी कार्यकर्त्याचा बळी देतात.मात्र,मुंडे कार्यकर्त्यासाठी काहीही करायला तयार असायचे.अनेकदा नेते मोठे झाल्यानंतर कार्यकर्त्यांना विसरतात.काही जण कार्यकर्त्यांना वापरूनही घेतात.पण मुंडे तसे नव्हते.त्यांनी कार्यकर्त्यांना कधीच अंतर दिलं नाही.म्हणूनच मुंडे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत होते.शिवसेना – भारतीय जनता पार्टी सत्तेवर असतानाची मुंडे यांच्या दोन वक्तव्यांची माध्यमे आणि विरोधक अनेकदा चर्चा करतात.चर्चा काय थट्टाच उडवितात.एक म्हणजे ‘एन्रॉन समुद्रात बुडविन’ आणि दुसरे म्हणजे ‘दाऊदला मुसक्या बांधून पडकून आणीन.’ मात्र,हीच माध्यमे आणि विरोधक मुंडे यांनी गृहमंत्री म्हणून बजाविलेल्या कामाकडे साफ दुर्लक्ष करतात.मुंडे यांच्या कार्यकाळातच मुंबईतील गँगवॉरला खऱ्या अर्थाने आळा बसला.

अनेक नामचीन गुंडांचे एन्काउंटर झाले नि बहुतांश गैरधंद्यांना आळा बसला. ‘सर्वोत्तम गृहमंत्री’ म्हणून आजही पोलिस दलातील अनेक अधिकारी किंवा त्यावेळी सेवेत असेलेले निवृत्त अधिकारी गोपीनाथ मुंडे यांचेच नाव घेतात.

नियतीचे कधी उलटते आणि नशिबाचे पारडे कधी फिरते,हे कोणीही सांगू शकत नाहीत.गोपीनाथरावजी मुंडे यांनी त्याचा पुरता अनुभव घेतला.कधी काळी महाराष्ट्र भाजपामध्ये एकहाती सत्ता राबविणाऱ्या मुंडे यांच्या वर्चस्वाला प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने शह बसायला सुरुवात झाली.म्हणजे मुंडे खऱ्या अर्थाने एकटे पडले होते.एकाकी मुंडे यांची भाजपामध्ये इतकी कोंडी झाली,की दोनवेळा त्यांनी बंडाचा झेंडा फडकाविला.एकदा तर काँग्रेसच्या दारातही जाऊन आले म्हणे.पण सुदैवाने येडियुरप्पा,उमा भारती आणि कल्याणसिंह यांनी केलेली चूक त्यांनी केली नाही.मुंडे पक्षातच राहिले पण त्यांचे पूर्वीचे पक्षातील वैभव आणि महत्त्व तेव्हापासून कमी होत गेले.पण त्या परिस्थितीही मुंडे न डगमगता उभे राहिले आणि स्वतःचे वेगळेपण कायम दाखवून दिले.

फक्त पक्षातील नेत्यांनीच त्यांची कोंडी केली,असे नाही.तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही केली.पण ते दुःखही मुंडे यांनी हसतहसत पचविले आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये घट्ट पाय रोवून उभे राहिले.पण मग नियतीने आणखी भयानक क्रौर्य दाखविले.तीन जून रोजी नियतीने जो खेळ खेळला,त्यापुढे मुंडे यांचे काहीच चालले नाही.अनपेक्षितपणे सारे संपले.मुंडे गेले.कार्यकर्त्यांचे मुंडेसाहेब गेले.भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली.स्वबळावर आली,तरी त्याला मुंडे यांच्या निधनाची दुःखद किनार होती.आपल्या लाडक्या मुंडेसाहेबां कडेच तो कार्यकर्ता भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत होता.पण आता तसे होणार नाही,अशी सल कार्यकर्त्यांच्या मनातकायम होती.कदाचित विजयाच्या जल्लोषात ती कोणी बोलून दाखविली नसेलही.पण ती होती,आहे आणि यापुढेही राहील.कदाचित मनातून हे कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते.म्हणत होते.‘साहेब,आज तुम्ही हवे होतात…!!!’
साहेब,आज तुम्ही हवे होतात…
माणूस माणसांशी जोडला,
देव त्यांनी माणसात पाहिला,
सलाम माझा मुंडे साहेबाला,
साहेब,आज तुम्ही हवे होतात…
रक्तात होता त्यांच्या ठसा,
संघर्षाचा होता त्यांना वारसा,
स्वाभिमानाचा होता तो आरसा,
साहेब,आज तुम्ही हवे होतात…
लढा असे त्यांचा सत्याचा,
समाजासाठी समाजकार्य करण्याचा,
विडा उचलला होता नेतृत्वाचा,
साहेब,आज तुम्ही हवे होतात…
उत्तम त्यांच्या वाणीने,
भारदस्त अशा आवाजाने,
जिंकली सर्वांचीच मने,
साहेब,आज तुम्ही हवे होतात…
साहेब भारताचा अभिमान,
महाराष्ट्र राज्याची शान,
दीन दुबळ्यांचे आशास्थान,
साहेब,आज तुम्ही हवे होतात…
येता त्यांची आठवण,
करावे त्यांचे स्मरण,
तेच आमचे प्रेरणास्थान,
साहेब,आज तुम्ही हवे होतात…

✒️राजेंद्र लाड(आष्टी)तालुकाध्यक्ष – म.रा.वंजारी कर्मचारी सेवा संघ,आष्टी(मो.९४२३१७०८८५)