ग्राहकांची जागरूकता काळाची गरज – गोपाळ मंत्री

67

✒️अनिल  साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25डिसेंबर):-प्रत्येक ग्राहकाने जागरूक राहून वस्तूंची खरेदी करावी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, कारण ग्राहकांची जागरूकता ही आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शहराध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी केले. शहरातील तहसील कार्यालयात दिनांक 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तहसीलदार गोविंद येरमे तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शहराध्यक्ष गोपाळ मंत्री, सचिव मुंजाजी लांडे, ग्राहक मंचचे उत्तम आवंके, केशव देशमुख ,महिला आघाडी च्या सीमाताई घनवटे, सखाराम बोबडे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष फड, तालुकाध्यक्ष शुद्धोधन सावंत, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार मंदार इंदुरकर , अव्वल कारकून गिनगिने आदींची उपस्थिती होती. तर पुढे बोलताना आजचा दिवस हा ग्राहकांच्या हक्कांना समर्पित दिवस आहे ,ज्यामध्ये ग्राहकांचे मूलभूत हक्क जपणे, ग्राहकांच्या सुरक्षिततेचा हक्क, वस्तू किंवा सेवेची माहिती जाणून घेण्याचा हक्क ,ग्राहकांच्या समस्या ऐकून घेण्याचा हक्क, त्या समस्यांचे निवारण करण्याचा हक्क, ग्राहकांना वस्तू व सेवेशी निगडित शिक्षण देण्याचा हक्क, ग्राहक व विक्रेता यांच्यात खेळीमेळीचे संबंध ठेवण्याचा हक्क या सर्व हक्कांचा समावेश होतो. तसेच ग्राहकांनी बाजारपेठेतून वस्तू खरेदी करताना आयएसआय, ऍगमार्क यासारखे शासनाने प्रमाणित केलेले चिन्ह पाहूनच वस्तूंची खरेदी करावी .

प्रत्येक वस्तूची खरेदी करताना त्याच्या उत्पादनाची तारीख व समाप्ती ची तारीख अवश्य पहावी. ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा जागरूकता बाळगूनच खरेदी करावी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. एवढे करूनही फसवणूक झाल्याचे लक्षात आले तर तात्काळ अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ग्राहक मंच, राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण परिषद यांच्याशी संपर्क साधावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदाराची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.