पूर्वतयारी करावीच लागेल

44

मिळवणे सहज सोपे नाही आणि कठिणही नाही . पूर्वतयारी हीच यशाची सुरुवात आहे . पकडलेल्या मार्गात चालत राहतात तेच यशस्वी होतात . मनाला तयार करून पाण्यात पडल्यावर हातपाय हलविल्याशिवाय पोहता येत नाही . जे साध्य करायचे त्यासाठी आधीच तसे वागता आले पाहिजे . अंमलबजावणीसाठी पूर्वतयारी आवश्यक आहे . वेळ आली की बघता येईल , ही वृत्ती तोंडघशी पाडल्याशिवाय राहत नाही . वेळ निघून गेल्यावर मला का मिळाले नाही , याचा पश्चाताप करत बसण्यापेक्षा वेळेबरोबर तयार होत जाणे श्रेयस्कर ठरते . कोणत्याही कार्याची फलश्रुती तयारीवर अवलंबून असते . लोखंड जितका गरम कराल तितका आकार द्यायला वेळ लागत नाही . हाती घेतले त्याच कामात वाहून घेतले की , लाथ मारला तिथून पाणी काढता येते . त्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल . साऱ्या बारीकसारीक तपशिलाचा सराव करावा लागेल.

लग्नाच्या वरातीसमोर एक बारा एक वर्षाचा मुलगा पट्टा फिरवत नाचत असतो . त्याची चपळाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेत भरते . त्याला बोलावून स्वराज्यात काम करण्याची ऑफर देतात . बदल्यात त्याला वेतन आणि दोन वेळचे जेवण द्यायचे कबूल करतात . पोट भरण्यासाठी वरातीत पट्टा नाचवत भटकण्यापेक्षा , तो मुलगा ही नोकरी आनंदाने स्वीकारतो . महाराज त्याला काम कोणता देतात ; तर पट्टा चालविण्याचा सराव करायचा . दुसरा कोणताच काम करायचा नाही . असे एक नाही तर तब्बल बारा वर्षे त्याचा पट्टा चालवण्याचा सराव सुरू असतो . फक्त सराव करण्याचा मेहनताना . बारा वर्षानंतर एक दिवस त्याच्यावर कामगिरी सोपविण्यात येते . अफझलखानाच्या भेटीच्यावेळी महाराज त्याला आपल्या सोबत घेऊन जातात . आज त्याच्या सरावाची परीक्षा होणार असते . शेवटी तो प्रसंग येते . सय्यद बंडा जसा महाराजांवर चालून येतो , तसा एका चुटकीसरशी तो मुलगा सय्यद बंडाला यमसदनी धाडतो . जिवाजी महालांच्या हातून हे एका दिवशी घडले नाही . बारा वर्षाचा सराव कामी आला . आठ फूट उडी मारून पट्टा चालवणाऱ्या सय्यद बंडाला प्रतिपाड म्हणून दहा फूट उडी मारून पट्टा चालवणारा जिवाजी महाला असल्यामुळे बिनदिक्कत आत्मविश्वासाने महाराज अफझलखानाला सामोरे गेले . ही ताकत आहे सरावाची , पूर्वतयारीची.

ज्या दिवशी आपण तयारीला लागतो , सरावाचा ध्यास घेतो त्या दिवसापासून यश आपल्या अधिक जवळ येत जाते . ध्येय गाठण्यासाठी आवश्यक तयारी परीक्षा देण्यापूर्वी यशाची वाटचाल करते . सराव यशाची गुरुकिल्ली आहे . लोकांना उपदेश करण्यापूर्वी कर्मयोगी गाडगेबाबा स्वतःसाठी बारा वर्षे परिश्रम घेत राहिले . मनात आणले आणि साध्य झाले , असे कधी होत नाही . आंबा खायचा तर आधी बी रोवावे लागेल . पाणी टाकून खत-फवारणी करावीच लागेल . सारे सोपस्कार करून काही काळ लोटल्यानंतर आंब्याचे फळ हाती पडेल . यशासाठी सरावाची परंपरा कोणीच नाकारू शकत नाही .
एक प्रसिध्द कथा आहे . राजाला वाघाचे चित्र असलेली राजमुद्रा बनवायची असते . दवंडीनुसार राज्यभरातील उत्कृष्ट चित्रकारांनी काढलेल्या चित्रांपैकी योग्य चित्र निवडण्याची जबाबदारी , राज्याच्या कलागुरुवर सोपविण्यात येते . त्याला एकही चित्र पसंत पडत नाही . उत्तमातील उत्तम चित्रातून एकही चित्र पसंत न पडल्याचे पाहून राजाला आश्चर्य वाटते . कलागुरुने ते सर्व चित्र एका बंद खोलीत ठेवून त्यासमोर एक जिवंत वाघ सोडलेला असतो . तेव्हा कोणताही चित्र पाहून वाघ थबकला नाही की डरकाळी फोडली नाही.

त्यामुळे कोणत्याही चित्रात हुबेहूब वाघाचा जिवंतपणा नसल्याने राजमुद्रेसाठी अपात्र ठरली . तेव्हा राजा चित्र काढण्याची कामगिरी कलागुरूवर सोपवतो . कलागुरु तीन वर्षांची मुदत मागतो व चित्र काढण्यासाठी जंगलात निघून जातो . सहा महिन्यानंतर कलागुरु काय करीत आहे म्हणून बघायला राजा शिपायांना पाठवतो . कलागुरु जंगलात वाघांबरोबर फिरत असतो . एक वर्षांनी वाघांसारखा चालत हालचाली करतो . दोन वर्षांनी त्यांच्याशी वाघ बनून खेळत असतो . तिसऱ्या वर्षी तो पूर्ण वाघच बनून अशी काही डरकाळी फोडतो सारे शिपाही घाबरून पळ काढतात . राजा पूर्ण वाघ बनलेल्या कलागुरुला पकडून आणण्याचा आदेश देतात . राजासमोर हजर कलागुरुला पाहून सारे घाबरतात . वाघाचे चित्र कोठे आहे ? असे विचारल्यावर , आता काढून देतो , म्हणून कलागुरु दोन मिनिटात वाघाचा चित्र काढतो . त्याची परीक्षा घेतली जाते . चित्रासमोर जिवंत वाघ सोडल्यानंतर , चित्र पाहून वाघ डरकाळी फोडायला लागतो . चित्र राजमुद्रेसाठी पात्र होते . वाघाचे चित्र काढण्यासाठी आधी वाघ बनावे लागते , तेव्हाच जिवंत वाघ साकारता येते .

कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी आधी बनावे लागते . आधीच सराव , तयारी असेल तर परिक्षेआधी पास झालेले असू . रक्ताच्या प्रत्येक प्रवाहात घामाचे थेंब आटले पाहिजे . तरच यशाची गरुडझेप घेता येते . देखल्याची गोडी चाखल्याशिवाय येत नाही . साखर गोड आहे हे पाहून समजत नसते , त्यासाठी चव घ्यावीच लागते . जगात कोणी केले नाही ते करायचे असेल तर खूप मेहनत घ्यावी लागते , कष्ट उपसावे लागतात असे म्हणून विक्रम होत नसतात , तर मेहनतीला कष्टाला सुरुवात करावी लागते . काही मिळवायचे असेल तर आधी पूर्वतयारी , सराव करावा लागतो . तेव्हाच यशाची माळ गळ्यात पडते .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१