ऐतिहासिक आय एन एस खुकरीवर उभारणार वस्तुसंग्रहालय

28

भारतीय नौदलाची शान समजली जाणारी आणि अत्यंत सक्षम व परिणामकारक असणारी भारताची युद्धनौका आयएनएस खुकरी २३ डिसेंबर रोजी नौदलातून निवृत्त झाली. निवृत्त होण्यापूर्वी ही युद्धनौका विशाखापट्टणम येथे होती. १४ जानेवारीला तिला दीव प्रशासनाकडे सोपविण्यात आले. दीव प्रशासनाकडे तिचे प्रत्यर्पण करतानाच निवृत्तीनंतर तिचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय नौदलाने घेतला होता त्यानुसार २६ जानेवारी रोजी खास समारंभात वस्तुसंग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली. आयएनएस खुकरी युद्धनौकेचा इतिहास मोठा रंजक आहे. आयएनएस खुकरी नावाची भारताची पाणबुडी १९७१ च्या लढाईत पाकिस्तानने बुडवली होती. १९७१ च्या युद्धात या पाणबुडीने पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडले होते. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून या पाणबुडीने पाकिस्तानच्याअनेक युद्धनौकांना जलसमाधी दिली होती. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून मोहीम फत्ते करून परत येत असताना या पाणबुडीला पाकिस्तानी नौदलाने बुडवले. आतापर्यंतच्या इतिहासात शत्रू राष्ट्राकडून जलसमाधी मिळालेली ती भारताची एकमेव पाणबुडी आहे.

या पाणबुडीची आठवण म्हणून विद्यमान आयएनएस खुकरी या युद्धनौकेची २७ सप्टेंबर १९८५ रोजी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये पायाभरणी करण्यात आली. ३ डिसेंबर १९८६ रोजी तिचे जलार्पण झाले व २३ ऑगस्ट १९८९ रोजी ती अधिकृतपणे नौदलाच्या सेवेत दाखल झाली. गेली ३२ वर्ष या युद्धनौकेने नौदलाची पर्यायाने देशाची मोठी सेवा केली. ३२ वर्षाच्या प्रदीर्घ काळात तिने ३२ कमांडिंग ऑफिसर पाहिले. ६, ४४, ८९७ नॉटिकल मैल अंतर या युद्धनौकेने या पार केले. ३० वेळा जगाची प्रदक्षिणा पूर्ण होईल एवढे हे अंतर आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर पाहता ते तीनपट अधिक आहे. आयएनएस खुकरी ही भारतीय नौदलाची शान समजली जायची. भारतीय नौदलाची ताकद म्हणूनच तीची ओळख होती. आयएनएस खुकरी ही अतिशय सक्षम आणि परिणामकारक युद्धनौका होती. हेलिकॉप्टर आणि विमान वाहून नेण्याची सुविधा तिच्यावर होती. अटीतटीच्या प्रसंगी तिला मोहिमेवर पाठवले जायचे. तिची लांबी ९१ मीटर तर उंची ९४ एवढी आहे. तिच्यात सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा होत्या.

दीव प्रशासनाने ही युद्धनौका निवृत्त होण्यापूर्वीच म्हणजे २०१९ सालीच या युद्धनौकेची मागणी नौदलाकडे केली होती. निवृत्तीनंतर या युद्धनौकेवर वस्तुसंग्रहालय उभारण्याचा मनोदय दीव प्रशासनाने नौदलकडे व्यक्त केला होता. नौदलाने दीव प्रशासनाची मागणी मान्य केल्याने आता तिच्यावर वस्तुसंग्रहालय उभारले जाणार आहे. दीव येथे १९७१ साली बुडालेल्या आयएनएस खुकरी पाणबुडीचे मेमोरियल आहे त्याच ठिकाणी आता आयएनएस खुकरी युद्धनौका वस्तुसंग्रहालयाच्या रुपात ठेवली जाणार आहे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५