जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर मार्फत मोफत विधी सेवा ‘ उपलब्ध

156

✒️अंबादस पवार(विशेष प्रतिनिधी)

नागपुर(दि.12फेब्रुवारी):– “ न्याय हा सर्वांसाठी “ हे घोषवाक्य घेऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर हे काम करीत आहे . भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहाय्य देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपुर करीत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बारा तालुका विधी सेवा समिती मार्फत सदर सुविधा उपलब्ध आहे. सदर मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र / हक्कदार व्यक्ति, संपर्क साधनेसाठी कार्यालय आणि सदर सुविधा ही मोफत असून यासाठी कुणी पैशे मागितल्यास संपर्क करनेसाठी प्रक्रिया व हेल्पलाइन क्रमांक विषयी जिल्हा न्यायालय नागपुरचे दीवानी व फौजदारी न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण नागपुरचे जिल्हा सचिव अभिजीत देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली.

*मोफत विधि सेवासाठी पात्र व्यक्ति -*

महिला , 18 वर्षापर्यंतची मुले , अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील व्यक्ती , विविध प्रकारची आपत्ती , जातीय हिंसा, पूर , भूकंप पिडीत व्यक्ती , तुरुंगात /ताब्यात असलेल्या व्यक्ती , मानवी तस्करी , शोषण किंवा वेठबिगारीचे बळी, औद्योगिक कामगार , मानसिक दृष्ट्या दुर्बल किंवा दिव्यांग व्यक्ती , आर्थिक उत्पन्न रुपये तीन लाखापर्यंत असलेल्या व्यक्ती अश्या हक़्क़दार लोकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर यांचेकडून मोफत विधि सेवाची मदत केली जाते.

*अशी असते मोफत विधी सेवा -*

विनामूल्य कायदेशीर सल्ला , कायदेशीर प्रक्रियेत वकीला द्वारे प्रतिनिधित्व , खटल्यासाठी मसुदा तयार करणे आणि मसुदा लेखन खर्च , इतर प्रकारचे प्रासंगिक खर्च , सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात अपील किंवा जामीन अर्ज करण्यास पेपर बुक आणि दस्तावेजाच्या अनुवादाचा खर्च , कायदेशीर कार्यवाही मध्ये निर्णय , आदेश आणि इतर कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळवण्यासाठी मदत अश्याप्रकारचे मोफत विधि सेवा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि तालुका विधि सेवा समिति द्वारे पुरविन्यात येते .

*गरजु व्यक्तिने इथे करावे संपर्क -*

सदर मोफत सेवा उपलब्ध होणे करिता जिल्हा व तालुका न्यायालयाच्या आवारात स्थित विधी सेवा प्राधिकरण /समिती , पोर्टल www.nalsa.gov.in/Isms , नालसा हेल्पलाइन – १५१०० , मालसा हेल्पलाइन – १८००२२२३२४ , सोबतच नालसा मोबाईल ॲप गूगल प्लेस्टोर वरून डाऊनलोड करून त्यावर सुद्धा गरजु व्यक्तिने संपर्क केल्यास त्यानां यथाशीघ्र मदत केली जाते .

*कुणी पैशे मागितल्यास इथे संपर्क करा -*

मोफत विधी सेवा प्रदान करणेकरीता नागपूर जिल्ह्यामध्ये १५६ पैनल विधिज्ञ कार्यरत आहेत . तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर व तालुका विधी सेवा समिती येथे येणाऱ्या पक्षकारांना मोफत सल्ला देणे कामी रिटेनर विधिज्ञ उपलब्ध असतात. कारागृहामध्ये बंदी असलेल्या आरोपीकरिता वेळोवेळी कारागृह भेटी देऊन ज्या आरोपींना विधिज्ञ नाही , अशा आरोपींना मोफत विधिज्ञ पुरवला जातो . सदर सर्व काम हे मोफत व विनामोबदला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती यांचे मार्फत केले जाते. मोफत कायदेशीर सहाय्य पुरविलेल्या व्यक्तीस कोणत्या कार्यासाठी खर्च अथवा पैसे देण्याची आवश्यकता नसते. सदर कामासाठी विधिज्ञाना योग्य मोबदला हा नियमितपणे व नियमाप्रमाणे अदा केला जातो . सदर सर्व सुविधा मोफत असल्याने सदर कामासाठी कोणी पैसे मागणी करत असेल तर खालील ठिकाणी संपर्क साधता येईल.
1) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , 105 मा. उच्च न्यायालय , फोर्ट मुंबई – ४०००३२ , टोल फ्री क्रमांक- १८००२२२३२४ , ईमेल आईडी- mslsa-bhc@nic.in , legalservices@maharashtra.gov.in

2) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , जिल्हा न्यायालय , नागपूर दूरध्वनी क्रमांक – ०७१२ २५४१०६२ , मो नं- ८५९१९०३९३१

*- अभिजीत देशमुख*
*सचिव- जिल्हा विधि सेवा प्राधिकरण तथा*
*दीवानी न्यायाधीश (वरिस्ठ स्तर ), नागपुर*