शिवरायांचे महिला विषयक धोरण आणि आजची स्थिती

32

रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केल्याचे समजताच त्याचे हातपाय तोडून चौरंग केला. हिंगणघाटचा नराधम मात्र अजूनही न्यायालयाच्या छत्राखाली स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतोय ! म्हणून आजही शिवरायांच्या स्वराज्याची छाप प्रत्येकाच्या श्वासाश्वासात आहे.
हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका असलेल्या तरुणीला एका नराधमाने जिवंत जाळण्याच्या घटनेला दोन वर्ष उलटले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. दोन वर्ष उलटूनही हिंगणघाटच्या या निर्भयाला न्याय मिळालेला नाही. या नराधमाला फाशी होईल अशी अपेक्षा असताना त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. ही शिक्षाही रद्द व्हावी यासाठी हिंगणघाटचा हा नराधम आजही न्यायालयाच्या छत्राखाली स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतोय. या शिक्षेविरुद्ध तो आता वरच्या न्यायालयात अपील करेल.हिंगणघाटची घटना स्त्री अत्याचाराची ही महाराष्ट्रातील पहिली घटना नव्हती. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. दररोजचे वर्तमानपत्र चाळलं तर त्यात विनयभंग, छेडछाड, बलात्काराची एकतरी बातमी दिसतेच.

आजूबाजूला घडणाऱ्या महिलांविरोधी गुन्ह्यांच्या घटना पाहिल्या की शिवरायांच्या विचारांची, शिवरायांच्या धोरणाची कधी नव्हे इतकी गरज आज असल्याचे जाणवते. कारण शिवरायांच्या शिवशाहित महिला जितक्या सुरक्षित होत्या तितक्या त्या कोणत्याच काळात नव्हत्या. कारण शिवरायांचे महिला विषयक धोरण. मध्ययुगीन काळात शिवरायांचा जन्म झाला. या काळात महाराष्ट्र परकीयांच्या गुलामगिरीत होता. शिवरायांनी महाराष्ट्राला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला. मराठी माणसांच्या मनात अस्मिता निर्माण केली. अठरापगड जातींना एकत्र करून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यात सर्वात मोठे कार्य म्हणजे महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेले कठोर पावले. त्यांचे हे पाऊल म्हणजे महिला मुक्तीसाठी केलेली क्रांतीच होती. हजारो वर्षांपासून चालू असलेल्या अनिष्ठ चालीरीती बदलण्याची धमक कोणत्याच राजाने दाखवली नाही, ती धमक शिवरायांनी दाखवली. त्यांनी स्वतःच्या आईला सती जाण्यापासून परावृत्त केले ही त्याकाळातील सामाजिक क्रांतीच होती.

त्याकाळी महिलांना गुलामीची वागणूक दिली जात होती. महिलांची खरेदी – विक्री केली जात होती. महिलांना गुलाम म्हणून वागवले जात होते. शिवरायांनी या सर्व गोष्टींवर बंदी आणली. शिवरायांचे महिलाविषयक धोरण अत्यंत आदराचे होते. जिजामाता या शिवरायांच्या गुरू होत्या. जिजामातेनेच त्यांना स्त्री जातीच्या सन्मानाचे बाळकडू पाजले म्हणूनच पर स्त्री मातेसमान मानणारा व शत्रूच्या स्त्रियांना सन्मान देणारा युगपुरुष म्हणून शिवरायांची इतिहासात नोंद झाली. शिवराय खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. रक्षणकर्ते होते. सैन्याला राजांचे सक्त आदेश होते. स्त्रियांना मोहिमेवर आणू नये, त्यांना युद्धात पकडू नये. स्त्री संबंधी गुन्ह्याला क्षमा नव्हतीच उलट कठोर शिक्षा होती, मग तो कोणीही असो. साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार, कुणालाही माफी नव्हती. हातपाय तोडणे, देहदंड अशा कठोर शिक्षा दिल्या जात.

रांझ्याच्या पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरुण मुलीला उचलून नेऊन भोगली. त्या तरुण मुलीने आत्महत्या केली. जेंव्हा ही गोष्ट शिवरायांना समजली तेंव्हा शिवरायांनी त्याच्या मुसक्या बांधून त्याला पुण्याला आणले. त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. जी गोष्ट रांझ्याच्या पाटलाची तीच गोष्ट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची. तीच गोष्ट सकूजी गायकवाड या सेनापतीची. महिलांसबंधी गुन्ह्याला त्यांच्याकडे क्षमा नव्हती उलट कडक शिक्षाच होती. शिवरायांच्या या महिलाविषयक धोरणामुळेच महिला सुरक्षित होत्या. आजची परिस्थिती मात्र पूर्ण भिन्न आहे. महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिलांना सुरक्षा पुरवण्यात सरकार अपयशी ठरत आहे. कायदे असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही. राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या महिलाविषयक धोरणांचा अभ्यास करुन ते राबवण्याचा प्रयत्न केल्यास देशात शिवशाही अवतरल्याशिवाय राहणार नाही.

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५