वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क कमी करावे

67

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्या नंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली ऑपरेशन गंगा मोहीम यशस्वी झाली. ऑपरेशन गंगा मोहिमेत भारताने युक्रेन मध्ये अडकलेल्या अठरा हजार भारतीयांची मुक्तता केली. या अठरा हजार भारतीयांपैकी बहुतांश भारतीय हे वैद्यकीय शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी होते. हे विद्यार्थी एम बी बी एस चे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले होते. युक्रेन आणि रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क कमी असल्याने भारतीय विद्यार्थी मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी तिकडे जातात. तिथे मेडिकल प्रवेशासाठी भारतासारखी स्थिती नाही. आपल्याकडे वैद्यकीय प्रवेशासाठी मोठे दिव्य पार पाडावे लागते. नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. मात्र आपल्याकडे मुळातच मेडिकलच्या जागा कमी आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. दरवर्षी ७ ते ८ लाख विद्यार्थी नीट पास करतात. जागा म्हणाल तर ९० हजार. सरकारी कॉलेजमध्ये खूप चांगल्या गुणांनी नीट पास केली तरच प्रवेश मिळतो. खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याइतकी आर्थिक ऐपत सर्वांची नसती. खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचे म्हटले की ५० लाख ते एक कोटी रुपये मोजावे लागतात.

अगदी थोड्या गुणांवरून नीट मेडिकल प्रवेश हुकलेले आणि खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याइतकी ऐपत नसलेले विद्यार्थी मग युक्रेन आणि रशियाची वाट धरतात. युक्रेनमधील मेडिकल शिक्षणाला डब्लू एच ओ आणि युरोपीय महासंघाची मान्यता आहे सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील शिक्षणाचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा आहे. आता रशिया युक्रेन युद्धानंतर सरकारला समजले की मेडीकलचे शिक्षण स्वस्त होणे गरजेचे आहे. सरकारने यासाठी आता पुढाकार घेतला असून एका स्टडी कमिटीचे गठन केले आहे. ही कमिटी युक्रेन आणि रशियाच्या मेडिकल शुल्काचा अभ्यास करेल आणि सरकारला एक अहवाल सादर करेल. सरकारने स्टडी कमिटी स्थापन करण्याची घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.

सरकारने राज्यातील मेडिकलचे शुल्क तर कमी करावेच त्यासोबत मेडिकलच्या जागाही वाढवाव्यात कारण आपल्या देशात डॉक्टरांची संख्या खूप कमी आहे. डब्ल्यू एच ए च्या सूचनेनुसार एक हजार लोकांच्या पाठीमागे एक डॉक्टराची गरज असताना भारतात मात्र दीड हजार लोकांमागे एक डॉक्टर अशी स्थिती आहे. अलोपॅथी डॉक्टरांची भारतात कमतरता आहे. अलोपॅथी प्रमाणेच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांची संख्याही वाढवावी म्हणजे एम बी बी एस ला प्रवेश मिळवू न शकणारे विद्यार्थी या शाखेत प्रवेश घेतील. जर आपल्याच देशात परवडणाऱ्या शुल्कात मेडिकलचे शिक्षण पूर्ण होत असेल तर विद्यार्थी बाहेर देशात जाणार नाही आणि देशालाही लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर उपलब्ध होतील.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५