कार्यक्षम मंत्री आणि यशस्वी संसदपटू!

30

(यशवंतराव चव्हाण जयंती विशेष)

कार्यक्षम मंत्री, यशस्वी संसदपटू आणि जनसामान्यात ज्याची मुळे रुजली आहेत, असा उदारमतवादी नेता असे यशवंतरावांचे थोडक्यात वर्णन करता येईल. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ ते राजकारणात होते आणि पंचवीसपेक्षा अधिक काळ अधिकार पदावर त्यांनी काढला. ते उत्तम वक्ते आणि लेखक होते. त्यांची विचारप्रवर्तक भाषणे सह्याद्रीचे वारे व युगांतर या ग्रंथांतून संगृहीत केलेली आहेत. अशा महाराष्ट्र राज्याच्या शिल्पकाराविषयी श्री कृ. गो. निकोडे- ‘केजीएन’ यांनी दिलेली ही रोचक माहिती. सन १९४६ साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव चव्हाण हे दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले. सन १९४८ साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीस पदावर नियुक्ती झाली व १९५२च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले. द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दि.१ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. सन १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले व त्यांत ते पहिले मुख्यमंत्री निवडले गेले. पुढे १९६२-६६ या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, १९६६-७० या कालावधित गृहमंत्री, १९७०-७४ पर्यंत अर्थमंत्री आणि १९७४पासून परराष्ट्रमंत्री बनले होते.

यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक राष्ट्रीय नेते होते. देवराष्ट्रे- सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात दि.१२ मार्च १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण कराड येथे घेऊन उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले. ते बीए नंतर एल्‌एल्‌बी झाले. इ.स.१९३० साली महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी भाग घेतल्याने त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवाद व मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला. त्यामुळे काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले. दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या वेळी यशवंतरावांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली. ते काँग्रेसमध्येच राहून १९४२च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात सामील झाले. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार स्थापन झाले, परंतु त्यावेळी ते तुरुंगात होते. त्यामुळे प्रतिसरकारशी त्यांचा तसा फारसा संबंध राहिला नव्हता. यशवंतराव हे मानवेंद्रनाथ रॉय यांची विचारसरणी व महात्मा गांधींची आंदोलने यांकडे आकर्षित झाले, तरी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आचारविचारांचा त्यांच्यावर खोल ठसा उमटला होता.

नेहरूंप्रमाणे ‘डावीकडे झुकलेला मध्यममार्गी नेता’ असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांच्या शासकीय तसेच प्रशासकीय कौशल्याचा व लोकनेतृत्वाचा प्रत्यय आला, जेव्हा द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आले. त्यांनी अल्पसंख्य बिगरमराठी समाजाचा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास आपल्या कर्तबगारीने तथा कार्यक्षम कारभाराने संपादन केला. मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याने काहीही उलथापालथ होणार नाही, याची खात्री त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पटवून दिली.यशवंतरावांनी चिनी आक्रमणानंतर संरक्षण खात्यात चैतन्य आणण्याची जबाबदारी पार पाडली. सन १९६७च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा अनेक राज्यांत पराभव झाला. त्यामुळे देशात जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या परिस्थितीत त्यांनी गृहखाते खंबीरपणे पण कौशल्याने सांभाळले. अर्थखाते त्यांच्याकडे आले, तेही बांगला देशाचे युद्ध, दुष्काळ वगैरेंमुळे खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत. माजी संस्थानिकांचे तनखे रद्द करणे आदी उपाययोजना त्यांच्या कारकीर्दीत झाल्या. चलनवाढीला आळा घालण्याचे कडक उपाय योजण्याच्या धोरणाचा प्रारंभही यशवंतरावांच्या कारकीर्दीतच झाला. कार्यक्षम मंत्री, यशस्वी संसदपटू आणि जनसामान्यात ज्याची मुळे रुजली आहेत, असा उदारमतवादी नेता असे यशवंतरावांचे थोडक्यात वर्णन करता येईल. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ ते राजकारणात होते आणि पंचवीसपेक्षा अधिक काळ अधिकार पदावर त्यांनी काढला. ते उत्तम वक्ते आणि लेखक होते.

त्यांची विचारप्रवर्तक भाषणे सह्याद्रीचे वारे व युगांतर या ग्रंथांतून संगृहीत केलेली आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रांत अनेक नव्या उपक्रमांना चालना दिली. हे उपक्रम जसे सहकारी साखर कारखानदारीचे आहेत तसेच जिल्हा परिषदा, भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ आदी प्रकारचेही आहेत. त्यांच्याबद्दल परप्रांतीयांना आशा वाटत होती, तर महाराष्ट्रीयांना ते एक विश्वासाचे ठिकाण होते.सन १९६९ साली काँग्रेसमध्ये फूट पडली असता ती सावरण्याच्या कामी यशवंतरावांनी आटोकाट प्रयत्न केले. देशात यादवीचे वातावरण न ठेवता समन्वयाचे असावे; कारण भारतासारख्या प्रचंड, भिन्न भिन्न जातिधर्मांच्या देशात त्याखेरीज आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होणार नाही, अशी त्यांची धारणा होती. पुरोगामी विचारांचा ते पाठपुरावा करत असर, ते पोथीनिष्ठ कधीच नव्हते. नीतिमूल्यांचा पुरस्कार व्यवहारात व्हावा, अशी त्यांची इच्छा व प्रयत्नही असत. झगमगाटापेक्षा ‘संथपणा व सातत्य’ हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते आणि तेच त्यांचे शक्तिस्थानही! लोकप्रिय नेते यशवंतराव चव्हाण यांनी दि.२५ नोव्हेंबर १९८४ रोजी जगाचा निरोप घेतला.

!! पुरोगामी एकता परिवारातर्फे जयंती दिनी त्यांच्या अनेक प्रेरक आठवणींना व कार्यकुशलतेला विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृ. गो. निकोडे- ‘केजीएन’ (से. नि. अध्यापक)मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.ता. आरमोरी, जि. गडचिरोली.व्हा. नं. ७४१४९८३३३९.