पाकिस्तानची पुन्हा नाचक्की!

60

वित्तीय कारवाई कृती दलाची ( एफएटीएफ ) तीन दिवसीय बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत पाकिस्तानचे नाव पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्यात आले. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे. कारण यावेळी पाकिस्तानचे नाव ग्रे लिस्टमधून हटवण्यात येईल अशी अपेक्षा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना होती. या लिस्टमध्ये आपले नाव समाविष्ट होऊ नये, यासाठी पाकिस्तानने एफएटीएफ च्या ३४ पैकी २८ अटी पूर्ण केल्या होत्या तरी देखील त्यांना या लिस्टमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानने सर्व अटी पूर्ण केल्या नाहीत म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून पाकिस्तान या लिस्टमध्ये आहे. या लिस्टमध्ये सलग दहा वर्ष पाकिस्तानचे नाव असल्याने पाकिस्तानची जगात नाचक्की झाली आहे. दहशतवादी देशांची आर्थिक मदत रोखण्यासाठी जी 7 गटाने एफएटीएफ या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था जगातून दहशतवादाचा नायनाट व्हावा यासाठी प्रयत्न करते. जे देश दहशतवादाला प्रोत्साहन देतात अशा देशांची यादी करून त्यांना मिळणारी आर्थिक रसद रोखण्याचे काम ही संस्था करते.

पाकिस्तान या लिस्टमध्ये असल्यामुळे पाकिस्तानला जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून कोणताही निधी मिळणार नाही. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला या निर्णयामुळे जबर धक्का बसला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी खालावणार आहे. अर्थात याला पाकिस्तानच जबाबदार आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणारा निधी पाकिस्तानने जनतेच्या कल्याणासाठी न वापरता तो दहशतवादासाठी वापरला. जनतेसाठी मिळणारा निधी त्यांनी दहशतवादी संघटनांना पुरवला. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय आणि पाकिस्तान लष्कर अतिरेक्यांचे उघड समर्थन करत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना करत असलेल्या मदतीमुळेच एफएटीएफ ने ही कारवाई केली आहे. समोरासमोरच्या लढाईत आपला भारतासमोर निभाव लागणार नाही हे माहीत असल्यामुळेच भारताला रोखण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन दिले.

एफएटीएफ ने पाकिस्तानला स्पष्ट बजावले आहे की, पाकिस्तानने अतिरेक्यांना मदत करणे थांबवावे. जोवर पाकिस्तान अतिरेक्यांना मदत करणे थांबवणार नाही तोवर त्यांना कोणताही निधी मिळणार नाही. वास्तविक पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अशी मागणी भारत आणि अमेरिकेने केली होती मात्र चीनने नेहमीप्रमाणे पाकिस्तानची बाजू घेतली त्यामुळेच त्यांचा समावेश ब्लॅक लिस्टमध्ये होऊ शकला नाही. मात्र ग्रे लिस्टमध्ये सलग दहा वर्ष राहिल्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा जगभर नाचक्की झाली हे मात्र नक्की.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५