साऱ्या विश्वात वंदनीय: छत्रपती शिवराय!

75

(छ.शिवाजी महाराज स्मृतिदिन विशेष)

छ.शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया- भारताचा शोध या ग्रंथात म्हणतात, “छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले. त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली, की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८०मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला.” रयतेच्या या जाणत्या छत्रपतींच्या प्रेरक स्मृती जागविणारा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- ‘अलककार’ यांचा हा लेख… संपादक. छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्य यांच्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य त्यांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छ.शिवरायांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भौगोलिक ज्ञानाचा उपयोग करून आश्चर्यजनक वेगवान हालचालीने बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खचविले. नेमके हल्ले यांचा वापर करून गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.

आपल्या वडिलांकडून मिळालेल्या दोन हजार सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपतींनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्य कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. अख्ख्या महाराष्ट्रात ते शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख ‘शिवशंभू’ असा होतो. सर्वच इतिहासकार सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म वर्ष १६३० ते औरंगजेबाचा मृत्यू वर्ष १७०७ यादरम्यानच्या ७७ वर्षांच्या काळास ‘शिवकाल’ असे म्हणतात.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर दि.१९ फेब्रुवारी १६३०मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजामातेंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा, अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. शिवबांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता ही विजापूर, अहमदनगर व गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागली होती.

शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली व स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली होती. इ.स.१६४७मध्ये सतरा वर्षांच्या शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हेच स्वराज्याचे तोरण ठरले. त्याच साली त्यांनी कोंढाणा- सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली. त्याचे नवे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. राजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. तिचा मराठी अर्थ- “ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.”

होतही गेले तसेच! एकेक किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स.१६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह तो मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला, तेव्हा शिवाजीराजांनी सद्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे, असा खानचा आग्रह होता. पण राजेंचे वकिल- पंताजी गोपीनाथ बोकील यांनी खानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील, दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले. शिवाजीराजांना खानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले. सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता, तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसत नव्हती. महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता, तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रताप गडावरील एका छावणीत भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड खानाने छत्रपतींना मिठी मारली.

राजांचे प्राण कंठाशी आले, त्याच वेळी खानने कट्यारीचा वार महाराजांवर केला, परंतु चिलखतामुळे राजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. त्याचबरोबर खानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे गुंजली. सय्यद बंडाने तत्क्षणी राजांवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला, जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलून शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण प्रचलित झाली. आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले. खानाच्या छावणी जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले. खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने केले. त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. अफजलखानाच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकण पट्टीतील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

आधुनिक काळात अफझलखानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.प्रकृती खालावत गेल्याने रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी दि.३ एप्रिल १६८० रोजी छ.शिवाजी महाराज मृत्युमुखी पडले. त्यांच्याबरोबर त्यांच्या चौथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई सती गेल्या. एक उत्तम प्रशासक, उत्तम रयतेचे वाली, हिंदवी स्वराज्य संस्थापक, मराठा साम्राज्य संस्था विस्तारक, शक्तिशाली, निष्ठावान, शूरवीर, मावळ्यांची प्रेरणाशक्ती, जाज्वल्य पराक्रमाने इतिहास रचणारे राजे दृष्टीआड झाले होते. छ.शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येक भारतीयांच्या हृदयमंदिरात असे सुवर्णाक्षरांनी कोरले गेले, की ते आजतागायत अधिकच झळाळून चमकू लागले आहे, हे सांगणे न लगेच!

!! छत्रपती शिवरायांच्या अनेक अविस्मरणीय स्मृतींना पुरोगामी एकता परिवारातर्फे मानाचा लवून मुजरा !!

✒️संकलन व लेखन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- ‘अलककार'(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हा. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com