समाज उपयोगी विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी जेष्ठ नागरिकांची भूमिका महत्वाची – सचिन अडसूळ

31

🔹सामजिक समता सप्ताह निमित्त जेष्ठ नागरीक जनजागृती व मार्गदर्शन शिबिर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.10एप्रिल):-समाज उपयोगी विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी जेष्ठ नागरिकांची भूमिका महत्वाची असून आपली संस्कृती, रूढी व परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी त्यांची आज समाजाला नितात गरज असल्याचे मत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी व्यक्त केले. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त सामजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी ते बोलत होते. सदर उपक्रम सहाय्यक आयुक्त कार्यालय गडचिरोली, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली, जिल्हा समाजकल्याण गडचिरोली व बार्टी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. आज जेष्ठ नागरीक जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ नागरिक यांच्या समस्या व त्यांना येणाऱ्या अडचणी व शासनाच्या योजना विषयी या कार्यशाळेत विविध मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात आले.

पुस्तक हेच आपले मित्र आहेत, खरी आणि शाश्वत माहिती पाहिजे असल्यास पुस्तक वाचन हेच महत्वाचे साधन आहे. पण आजकालची पिढी हे फेसबुक, हॉट्स अँपच्या जगात गुंतली असून त्याद्वारे अपुरी आणि चुकीची माहिती घेत आहेत, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सचिन अडसूळ जिल्हा माहिती अधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित विद्यार्थी मित्रांसाठी व्यक्त केले. कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुन पी.एस.घोटेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून एस.के. बावणे, प्रभाकरराव वासेकर, देवाजी सोनटक्के तसेच राहुल गोविंदलवार समाज कल्याण निरीक्षक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त कार्यालय गडचिरोली, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली, जिल्हा समाजकल्याण गडचिरोली व बार्टी कार्यालय गडचिरोली येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष गणवीर प्रकल्प अधिकारी बार्टी यांनी केले तर आभार श्रीमती रुपाली अपराजित यांनी केले , कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.