चंद्रपूर जिल्‍हयातील २३६० कोटी रु. किंमतीच्‍या राष्‍ट्रीय महामार्गांच्‍या चौपदरीकरणाच्‍या दोन कामांना सडक परिवहन मंत्रालयाची मंजुरी

33

🔸आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित

🔹आ. मुनगंटीवार यांनी मानले केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे आभार

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)मो:-9545026974

चंद्रपूर(दि.18एप्रिल): – महाराष्‍ट्र-तेलंगना सिमा गोविंदपुर ते राजुरा या राष्‍ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी च्‍या चौपदरीकरणाच्‍या १२०० कोटी रु. किंमतीच्‍या तसेच बामणी ते महाराष्‍ट्र- तेलंगना सिमा लक्‍कडकोट राष्‍ट्रीय महामार्ग क्र. ९३० डी च्‍या चौपदरीकरणाच्‍या १११६ कोटी रु. किंमतीच्‍या विकासकामांना भारत सरकारच्‍या सडक परिवहन तथा राजमार्ग मंत्रालयाच्‍या माध्‍यमातुन एनएचएआय द्वारे मंजुरी देण्‍यात आली आहे. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भूपृष्‍ठ परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्‍या स्‍तरावर केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे.

महाराष्‍ट्र-तेलंगना सिमा गोविंदपुर ते राजुरा या राष्‍ट्रीय महामार्गाचे गोविंदपूर ते राजुरा या भागाचे चौपदरीकरण करण्‍याची मागणी तसेच बामणी ते महाराष्‍ट्र- तेलंगना सिमा गोविंदपूर ते राजुरा या महामार्गाचे चौपदरीकरण करण्‍याची मागणी या परिसरातील नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीच्‍या पुर्ततेसाठी भारत सरकारचे भूपृष्‍ठ परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्‍याशी सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. नवी दिल्‍लीत श्री. नितीन गडकरी यांची भेट घेत ही मागणी सतत रेटली. श्री. नितीन गडकरी यांनी आ. मुनगंटीवार यांना दिलेल्‍या आश्‍वासनानुसार सदर दोन्‍ही राष्‍ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्‍याची मागणी पुर्ण केली. दोन्‍ही विकासकामांच्‍या निविदांना दि. ३० मार्च २०२२ रोजी स्विकृती पत्र देण्‍यात आले असुन एन.एच.ए.आय. द्वारे या कामांना मंजुरी प्रदान करण्‍यात आली आहे.

चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासात मोलाची भर घालणा-या तसेच महाराष्‍ट्र व तेलंगना या दोन राज्‍यातील वाहतुकीच्‍या प्रश्‍नांवर उपाययोजना करणा-या या दोन राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या चौपदरीकरणाची कामे मंजुर केल्‍याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे. चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासासाठी जेव्‍हाही नितीनजींना निधीची मागणी केली असता त्‍यांनी ती तत्‍परतेने पुर्ण केली आहे. त्‍यांचा या जिल्‍हयावर व आमच्‍यावर विशेष स्‍नेह आहे. या पुढील काळातही त्‍यांच्‍या मंत्रालयाच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयाच्‍या विकासात भर घातली जाईल असा आ. मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे.