बीड जिल्ह्यात बाल विवाहाच्या संख्येत वाढ, बाल हक्क समितीला दोन बालविवाह रोखण्यात यश..!

31

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.25एप्रिल):-बीडमध्ये बाल हक्क संरक्षण समितीला गेल्या तीन दिवसांत दोन बाल विवाह रोखण्यात यश आले आहे. धारूर तालुक्यातील दोन्ही बाल विवाहाबाबत लग्नापूर्वीच कल्पना मिळाल्याने योग्य दक्षता घेत चाईल्ड लाईन व सामाजिक संस्थांच्या मदतीने हे बालविवाह समितीने रोखले. दरम्यान, टाळेबंदीच्या काळात अनेक बालविवाह झाल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आल्यानंतर आता जिल्ह्यातील सामाजिक संघटना देखील सतर्क झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील अंजनडोह (ता. धारुर) येथे रविवार (२४ एप्रिल) एक बालविवाह रोखण्यात आला. करोना विषयक सर्व निर्बंध मागे घेतल्यानंतर सध्या विवाह समारंभाची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लग्नसराईच्या काळात कालावधीत मोठ्या प्रमाणात बाल विवाह उरकले जातात हे चाईल्ड लाईनच्या कारवाईतून समोर आले. दोन दिवसापूर्वी धारूर शहरात एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच धारूर पोलीस, बाल कल्याण संरक्षण समिती व सामाजिक संस्थाच्या मदतीने तो बालविवाह रोखला होता. संबंधितांना बाल हक्क संरक्षण समिती समोर हजर करून रितसर कार्यवाही करण्यात आली होती. सदरील प्रकार घडून काही दिवस होत नाही तोच अंजनडोह (ता. धारुर) येथे २४ एप्रिल रोजी बाल विवाह होणार असल्याची माहिती एक दिवस आधीच चाईल्ड लाईन संस्थेला मिळाली. काही सामाजिक संघटनांनाही त्यांनी सोबत घेतले. या संस्थानी धारुर पोलीस, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय व ग्रामसेवक यांच्या मदतीने या दोन्ही कुंटूंबास भेटून सर्व बाजू समजून सांगितल्या.

या घटनेत मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यावर या दोन्ही कुंटूंबास बालहक्क संरक्षण समिती समोर रविवारी हजर करण्यात आले. सर्व कायदेशीर कारवाई करून हा बालविवाह थांबवण्यात यश आले. निर्धार स्वयंसेवी संस्थेने यात महत्वाची भूमिका पार पाडली. शासन पातळीवर अल्पवयीन मुली व मुलांची लग्न होवू नयेत म्हणून मोठे प्रयत्न होत असताना धारुर तालुक्यात मात्र अल्पवयीन विवाहाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे अशा प्रकारावरून समोर येते. गावंदरा, चोरांबा, धारुर शहरानंतर आता अंजनडोह येथे प्रकार उघडकीस आला आहे