जंगलालगत असलेल्या जि.प.प्राथमिक शाळा व आंगणवाडी ईमारतींना संरक्षण भिंतीचे बांधकाम करा – संजय गजपुरे

30

🔸वन्यप्राण्यांच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपुर(दि.14मे):- जिल्ह्यातील बहुतांश भाग हा जंगलव्याप्त आहे . जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प , नागभीड- घोडाझरी अभयारण्य असुन दिवसेंदिवस यांतील हिंस्त्र व वन्यप्राणी जंगलालगत असलेल्या गावात येऊ लागलेले आहेत . वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे . चंद्रपुर व ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत असलेल्या जंगलालगतच्या अनेक गावांना याचा त्रास वारंवार सहन करावा लागत आहे. आता तर या वन्यप्राण्यांनी थेट गावातच धडक मारणे सुरु केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

जिल्ह्यातील जंगलालगतच्या अनेक गावातील जि.प.प्राथमिक शाळा व आंगणवाड्या ह्या गावांच्या वेशीवरच स्थित असुन या ईमारतींच्या परीसरात वाघ व तत्सम वन्यप्राण्यांचे दर्शन सुरु झाले आहेत . यामुळे विद्यार्थी , पालक व कर्मचाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे . यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.जि.प.प्राथमिक शाळा व आंगणवाडी यांना अनेक ठिकाणी संरक्षण भिंत नसल्याने आगामी काळात वन्यप्राण्यांकडुन हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही . यासाठी जिल्ह्यातील जंगलालगत असलेल्या शाळा व आंगणवाडींना तातडीने संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी जि.प.चे माजी सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी केली आहे.

सध्या चंद्रपुर जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरु असुन जि.प. चंद्रपुरच्या प्रशासक व मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती मिताली सेठी मॅडम यांना याबाबतचे निवेदन माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी दिले व यासाठी निधीची तरतुद करुन शक्य तितक्या लवकर संरक्षण भिंतीच्या बांधकामांना मंजुरी द्यावी अशी मागणी व विनंती केली आहे. निवेदन देतांना नागभीड तालुक्यातील गिरगाव चे रमेश पाटील बोरकर , मौशीचे अरविंद भुते , कोसंबी गवळीचे गुरुदेव नागापुरे , वासाळामेंढ्याचे नितेश कुर्झेकर उपस्थित होते.