डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील माता रमाई ते माई साहेब आंबेडकर

52

प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका महिलेचा हात असतो तसाच एका अयशस्वी पुरुषा मागे एका महिलेचा हात असतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिगत जीवनात दोन स्रियांचा मोठा हात होता. त्यात एकीची दखल “नांदन नांदन होत रमाच नांदन, भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण” या गीतातून घेतला गेला. दुसरीची फारशी नोंद घेतल्या गेली नाही. प्रत्येक माणसांच्या शेवटच्या जीवन संघर्षात आरोग्याच्या दुष्टीने जी साथ असते. त्यात पत्नी चे योगदान खूप मोठे असते. सर्व सामान्य माणूस अन अति महत्वाचा लोकप्रिय नेता यांच्या संपर्कात चोवीस तास सार्वजनिक कामासाठी लोक असतात. त्यांना व्यक्तिगत जीवन आहे किंवा असते हे लोक विसरतात. याच धावपळीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रथम जबाबदारी कुटुंबातील लोकांची असते त्यात पत्नीची जबाबदारी खूपच महत्वाची असते. २७ मी १९३५ ला रमाई गेल्या नंतर डॉ बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेण्यास कोणी नव्हते. बोलणे सोपी असते पण सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्याच्या भेटीसाठी लोक वेळेचे भान ठेवत नाही. आपले काम घेऊन किंवा त्यांनी आपल्या गावी कार्यक्रमाला येणे किती महत्वाचे आहे यांचे प्रत्येकाला खूप महत्वाचे असते. त्यात प्रत्येकाची एकच दिवसाची मागणी असते. माता रमाई आणि माता सविता आंबेडकर यांच्या जीवन कार्याला जगात तोड नाही. या मातांनी आपले सर्वस्व ऐका व्यक्तीच्या कार्यासाठी अर्पण केले. माता रमाई यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. आणि डॉ बाबासाहेब परदेशी असतांना संसाराचा गाडा पेलला. आपले आयुष्य पणाला लावले. माता डॉ सविता या आजारपणात बाबासाहेब यांच्या सहवासात आल्या.18 ते 20 तास उपाशी पोटी अभ्यास करणारे बाबासाहेब यांना आजारानी ग्रासले होते. डॉ सविता माईनी त्यांना साथ दिली. म्हणून बाबासाहेब भारतीय संविधान लिहू शकले, बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहला, बुद्ध धम्म स्वीकारला. दोन कॉलेज उभारले याचे श्रेय माई आंबेडकर यांना काही अर्थाने द्यावेच लागेल. डॉ बाबासाहेबांच्या जीवनातील माता रमाई ते माई साहेब आंबेडकर अश्या या दोन महान मातांचा स्मृतिदिनी आपण नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण केली पाहिजे. त्यांच्या त्याग व कष्टाची दखल घेतली पाहिजे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा मुंबईला येत तेव्हा ते डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर प्रकृतीच्या तपासणीसाठी जात असत. मालवणकरांनी बाबासाहेबांना अनेक पथ्ये आणि औषधांबाबत सूचना दिल्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना या गोष्टी जमण्या सारख्या नसल्याने डॉ.कबीर यांनी ‘एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्याकडे काही दिवस राहून बाईंना (सौ. आंबेडकरांना ) सर्व समजावून सांगेन’, असा सल्ला दिला. डॉ.शारदा कबीर यांना तेव्हा रमाबाईंच्या निधनाबाबत माहिती नव्हती. पुढे बाबासाहेब आंबेडकर एकदा डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर आले असताना डॉ. कबीर त्यांना पथ्यपाण्याबाबत सांगू लागल्या. अखेर त्यांना बाबासाहेब म्हणाले, अहो पण माझ्या घरात बाईमाणूस नाही, मी अगदी एकटा आहे, हे सर्व कोणाला सांगू? त्यावेळी डॉ.शारदा कबीर यांना आंबेडकरांच्या एकाकीपणाबाबत समजले. त्यानंतर दोघांची पुन्हापुन्हा भेट होऊ लागली. डॉक्टर आणि पेशंट म्हणून डॉ.आंबेडकरांशी त्यांचे नाते घट्ट झाले होते. रमाबाई ह्या बाबासाहेब याच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही. १९४७ नंतर डॉ शारदा कबीर ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वच कामात तन, मन, धनाने सहभागी होत्या, हा इतिहास कोणीच नाकारू शकत नाही. पण त्यांच्या बाबत समाजात प्रचंड अप्रचार करण्यात आला. समाजाने त्यांना एकप्रकारे आरोपीच ठरविले होते. त्यांचा त्रास त्यांनी शेवट पर्यंत भोगला.

कोण होत्या डॉ सविता भिमराव आंबेडकर? कोकणातील मुकाम पोस्ट दोरला तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील कृष्णराव कबीर यांची कन्या शारदा कृष्णराव कबीर हिचा जन्म २७ जानेवारी १९०९ रोजी मुंबईत झाला होता. त्या मराठी सारस्वत ब्राम्हण कुटुंबातील होत्या. त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. कृष्णरावांना पाच मुली व तीन मुले होती. या एकूण आठ मुलांपैकी ६ भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला होता. त्यांच्या त्या काळातही पुरोगामी विचारांचा डॉ.शारदा कबीर यांना मोठा अभिमान वाटे. शारदा ह्या विद्यार्थिदशेत अत्यंत हुशार होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर मुंबईच्या ग्रांट मेडिकल कॉलेज मधून डॉक्टरीसाठीची एम. बी.बी.एस ही पदवी मिळवली होती. त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात असतांना अभ्यास नी आपण एवढीच त्यांची दिनचर्या होती. या वसतिगृहासमोरच असलेल्या ‘मणिभवन’ येथे १४ ऑगस्ट १९३१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा गांधी यांच्याशी मोठी खडाजंगी झाली होती. पण त्या भेटीसंबंधी त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहिती नव्हती. त्यांचे एम.डी च्या परीक्षेचे पेपर्स चांगले गेले होते. पण ऐन प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्यांना टायफाॅईड, डिहायड्रेशन, बॉईल्स असे आजार झाले व त्यांचे एम.डी. होणे राहून गेले. याच काळाच त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले.

शारदा कबीर यांनी गुजरातमध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केले, नंतर त्या मुंबईत आल्या आणि निष्णात फिजिओथेरपिस्ट, नामवंत सल्लागार व तज्ज्ञ डॉक्टर अशा डॉ. मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. तेथे १९४७ साली त्यांची आणि रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. त्यापूर्वी डॉ.राव यांच्या घरी त्यांची भेट झाली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाबाई आंबेडकर यांचे २७ मी १९३५ रोजी निधन झाले होते. त्यानंतर डॉ बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांचेकडून वैद्यकीय सेवा घेतली.

एकदा १९४७ च्या डिसेंबरमध्ये डॉ बाबासाहेब डॉ.मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर गेले असताना बाबासाहेबांनी शारदा यांना म्हणाले, ‘चला, मी तुम्हाला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचे आहे. त्यापूर्वीही अनेकदा बाबासाहेब आणि शारदा कबीर एकत्र बसून बोलायचे. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा व्हायच्या. या भेटींमुळे बाबासाहेबांबद्दल शारदा कबीर यांना बरीच सखोल माहिती मिळाली होती. त्यातून त्यांच्या मनातील आदर अधिकच वाढला होता. एक दिवस आंबेडकर डॉ.शारदा कबीर यांना म्हणाले. माझे सहकारी मला पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करत आहेत. पण मला माझ्या आवडीची, योग्यतेची स्त्री मिळणे फार कठीण आहे. तरीही माझ्या कोट्यवधी बांधवांसाठी मला जगायला हवे. त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवे. त्यामुळे माझ्यासाठी सुयोग्य स्त्रीचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो. अशा प्रकारे डॉ बाबासाहेबांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. पण त्यावर तेव्हा काय उत्तर द्यायचे हे न समजल्याने डॉ. शारदा कबीर गप्पच राहिल्या. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला निघून गेले आणि शारदाही त्यांच्या कामात गुंतल्या. त्या दिवसाबाबतही त्या विसरून गेल्या. पण एक दिवस अचानक शारदा यांना एक पार्सल मिळाले. पार्सलसोबतच्या पत्रात डॉ बाबासाहेबांनी डॉ. शारदा यांना मागणी घातली होती. पत्रात लिहिले होते, “अर्थात तू तयार असशील तरच. तरी तू विचार करून मला कळव. तुझ्या आणि माझ्या वयांतील फरक आणि माझी प्रकृती या कारणांनी तू मला नकार दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही”. पत्र वाचल्यानंतर मात्र डॉ.शारदा कबीर यांना बाबासाहेबांच्या मनातील भावना समजल्या. त्या डॉ बाबासाहेबांच्या मोठेपणाने दिपून गेल्या. त्यांच्याबाबत आदर असला तरी त्यांची जीवन साथी होण्याचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. त्यामुळे या विषयावर त्यांच्या मनात बराच खल झाला. एवढ्या मोठ्या महापुरुषाला नकार कसा द्यायचा आणि होकार तरी कसा द्यायचा असे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू होते.

अखेर डॉक्टर मालवणकरांचा सल्ला घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी डॉ.शारदा कबीर डॉ. मालवणकरांशी या विषयावर बोलण्यासाठी गेल्या. धैर्य एकवटून त्यांनी मालवणकरांना डॉ बाबासाहेबांनी लिहिलेले ते पत्र दाखवले. त्यावर क्षणभर विचार करत मालवणकर म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी काही जबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि योग्य काय तो निर्णय तुम्हीच घ्या. डॉ. मालवणकरांच्या सल्ल्यानंतर डॉ.शारदा कबीर अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या. त्यांनी त्यांच्या मोठ्या भावांना विश्वासात घेऊन काय करावे असे विचारले. त्यांना मोठा भाऊ म्हणाला म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार. अजिबात नकार देऊ नकोस. एक भाऊ तर त्यांना चिडवू लागला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आंबेडकरांवर जीवापाड प्रेम करतात. ही डॉक्टरीणबाई नकार देते आहे हे कळलं तर तुझी खैर नाही, असे तो गमतीत बोलला. अखेर रात्रभर विचार करून डॉ.शारदा कबीर यांनीही होकारच द्यायचा निर्णय घेतला. त्यामागे दोन कारणे होती, एक तर डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे व सेवा करण्यासाठी त्या प्रवृत्त झाल्या आणि शिवाय त्यांच्या भावनांनीही होकार दिलेला होता. एवढ्या मोठ्या माणसाला त्यांना नकार देताच आला नाही. त्यांनी पत्र लिहून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना होकार कळवला. कोणत्याही परिस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती सुधरवायची म्हणजे त्यांना देशाची राज्यघटना लिहिण्याचे ऐतिहासिक काम करता येईल असे त्यांनी ठरवले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.शारदा कबीर यांच्या लग्नासाठी १५ एप्रिल १९४८ ही तारीख ठरली. दिल्लीला विवाह उरकणार होता. त्यानंतर मधल्या काळात बाबासाहेब आणि शारदा कबीर यांच्यात बराच पत्रव्यव्हार झाला. त्यातून त्यांचे नाते अधिकच खुलत गेले. बाबासाहेबांनी विवाहासाठी डॉ.मालवणकरांसह अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित केले होते. कारण तेव्हा देशात दंगली, तणावाचे वातावरण होते. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर दिल्लीच्या १ हार्डिंग्ज ॲव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत होते. १५ एप्रिलला विमानतळावरून डॉ.शारदा कुटुंबीयांसह बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेल्या. बंगल्यावर जाताच बाबासाहेबांनी सर्वांची विचारपूस केली. सर्वांच्या ओळख भेटीचा कार्यक्रमही झाला. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या श्री.चित्रे यांच्या सूनबाई शारदा यांना आत घेऊन गेल्या. त्यांनी शारदा यांना साजशृंगार करण्यास मदत केली. रजिस्ट्रार ऑफ मेरेजेसचे अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित होते. मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आणि डॉ. शारदा यांच्या वतीने त्यांचा भाऊ वसंत कबीर आणि कमलाकांत चित्रे यांनी तर डॉक्टर साहेबांच्या वतीने नागपूरचे रावसाहेब मेश्राम यांच्यासह आणखी एकाने सही केली. १५ एप्रिल १९४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होऊन त्या डॉ.शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनी यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तेव्हा पासून नागपूरच्या त्या ठिकाणाला दिक्षाभूमी हे नांव जगप्रसिद्ध झाले. म्यानमार देशाचे बौद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ.बाबासाहेब व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः आपल्या पाच लाख अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि विशेष बनविलेल्या बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. माईसाहेब या धर्मांतर आंदोलनातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

धर्मांतर सोहळ्यानंतर काही आठवड्यातच ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब महापरिनिर्वाण झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या काही अनुयायांनी सविताबाईंवर त्या ब्राह्मण असल्यामुळे, आंबेडकरांची दुखण्यामध्ये योग्य काळजी घेतली नसल्याचे आणि त्यांनी आंबेडकरांना विष प्रयोगाने मारल्याचे आरोप केले. माई आंबेडकर त्यांच्या आत्मकथेत लिहितात, “संपूर्ण समाजात माझ्याविरुद्ध वातावरण तयार व्हावे म्हणून साहेबांच्या मृत्यूबद्दल जाणूनबुजून संशय निर्माण केला गेला. समाजात माझ्याविरोधात जाणीवपूर्वक विष पेरले गेले”. माईं साहेबांचं विरोधात वातावरण अत्यंत चिंताजनक आणि भीतिदायक होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची चौकशीची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यावेळी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमली होती. त्या समितीने माईसाहेब आंबेडकरांना सर्व आरोपांतून मुक्त केले होते.

डॉ बाबासाहेबांच्या निधनानंतर संपत्तीवरूनही यशवंत आंबेडकर (बाबासाहेबांचे पुत्र) आणि माईसाहेब यांच्यामध्ये वाद झाला. प्रकरण कोर्टात गेले. कोर्टात यशवंत आंबेडकरांनी सांगितलं की, “माझ्या वडिलांचे दुसरे लग्न झालेच नाही आणि मी एकुलता एक मुलगा नी एकमेव वारस आहे, तेव्हा त्यांची सारी इस्टेट मलाच मिळाली पाहिजे.” हे ऐकून न्यायाधीश सी. बी. कपूर अस्वस्थ झाले आणि ते संतापून यशवंत आंबेडकरांना म्हणाले, “डॉ. आंबेडकरांचे विवाहबाह्य संबंध होते, असं तुम्ही मला सांगत आहात का? मी त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि मला त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे”. नंतर न्यायमूर्तीनी आपापसात समेट घडवून आणण्यावर भर दिला आणि संपत्तीचा वाद मिटवला.

डॉ बाबासाहेबांच्या निधनानंतर माईंना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला होता. परंतु काँग्रेसच्या पाठींब्यावर आपण राज्यसभेचे सदस्य होणं हे बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारं ठरणार होतं, म्हणू तीनही वेळा नम्रपणे त्यांनी त्याला नकार दिला. बाबासाहेबांच्या काही सहकाऱ्यांनी आणि जवळच्या अनुयायांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. पण दलित पॅथरच्या चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांनी माईंना आदरानं वागवलं, सन्मान दिला. बाबासाहेबांच्या निधनानंतर डॉ. माईसोबत आंबेडकर दिल्लीत मेहरोलीच्या फार्म हाऊसमध्ये राहू लागल्या. रामदास आठवले, गंगाधर गाडे यांच्यासारख्या काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तरुण सदस्यांच्या आग्रहाने माईसाहेब मागासवर्गीय समाजाच्या मुख्य चळवळीतील प्रवाहात येत होत्या. मात्र वाढत्या वयामुळे व ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांना ते फार काळ जमले नाही.

डॉ.माईसाहेब आंबेडकरांनी “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात” हे आत्मचरित्र लिहिले, जे प्रत्येक भारतीय स्त्रीने आणि प्रत्येक बौद्ध व्यक्तींनी वाचावे असे आहे. पुस्तकात बाबासाहेबांप्रती माईसाहेबांचे निस्सीम प्रेम, त्यांचा असीम त्याग, डॉ.बाबासाहेबांना त्यांचे कार्य पूर्ण करता यावे यासाठी त्यांनी डॉ बाबासाहेबांच्या आरोग्याची घेतलेली काळजी, हिंदू कोड बिलाच्या मसुद्याकरिता बाबासाहेबांना आवश्यक नोट्स तयार करून देण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, पाली शब्दकोशाचे लेखन करण्यासाठी बाबासाहेबांना नोट्स लिहून देणे अशा अनेक बाबीं नमूद केल्या आहेत. बाबासाहेबांच्या जीवनात माईसाहेबांचे योगदान अनमोल आहे. निवडणुकीतील पराभवाने खचून गेलेल्या डॉ बाबासाहेबांना सावरण्यासाठी पत्‍नी म्हणून केलेली धडपड म्हणजे त्यांच्या निस्सीम प्रेमाचे उदाहरण आहे. एवढे सर्व करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आणि आरोपच आले. तरीही मृत्यूपर्यंत त्यांनी याबाबत कधी त्या काही बौद्ध जनतेविरुद्ध तक्रार केली नाही. कोणताही राग मनांत ठेवला नाही. माईसाहेब आंबेडकरांचे बाबासाहेबांच्या जीवनातील स्थान आणि योगदान अतुलनीय आहे. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे दीर्घ आजाराने जे.जे.रुग्णालयात २९ मे २००३ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. असा माई साहेब आंबेडकरांच्या १९ व्या स्मृतीदिना निमित्याने त्यांच्या प्रेम, त्याग आणि कष्टाला विनम्र अभिवादन!

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९