महामार्ग कामासाठी रास्ता रोको करणार-डॉ. जाधव; कामे दहा जूनपर्यंत सुरू न झाल्यास आंदोलन

27

✒️नितीन राजे(खटाव प्रतिनिधी)

खटाव(ता.4जून):- सातारा ते टेंभुर्णी राज्य महामार्गाच्या पुसेगावमधून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत कमालीची दिरंगाई होत असून, ही रखडलेली कामे १० जूनपूर्वी सुरू न झाल्यास पुसेगाव ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिला.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठवण्यात आले आहे, असे नमूद करून डॉ. जाधव यांनी सांगितले, पुसेगावमधून जाणाऱ्या सातारा ते म्हसवड ते टेंभुर्णी या राज्य महामार्ग क्रमांक ५४८ या रस्त्याचे पुसेगावमधील शासकीय विद्यानिकेतन ते डॉ. सुरेश जाधव यांच्या दवाखान्यापर्यंत फक्त रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, तयार झालेल्या रस्त्याची उंची जास्त झाली असून, त्यामुळे लगतची दुकाने खाली गेली आहेत. शिवाय काम पूर्ण झालेल्या

रस्त्याच्या दुतर्फा बांधावयाच्या गटारांचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडलेले आहे. सध्या पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा गटारांचे बांधकाम सुरू झाले नाही, तर रस्त्यावरील पावसाचे सर्व पाणी लगतच्या घरांत व दुकानांत शिरून ग्रामस्थांचे व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. जिल्हाधिकारी व प्रशासनाने याबाबतीत सतर्क होऊन लवकरात लवकर लक्ष घालावे व रस्त्याच्या दोन्ही बाजूंची गटारे पूर्ण होण्यासाठी तसेच पुसेगाव ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाने संबंधितांना तातडीने आदेश द्यावेत. याशिवाय छत्रपती शिवाजी चौकातील सुशोभीकरणाचे काम व रस्त्यालगतच्या विजेचे खांब आणि त्याअनुषंगाने इतर सर्व कामे लवकर पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे डॉ. जाधव यांनी म्हटले आहे.