प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

  49

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर(दि.30जून): राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

  नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ ही हेतू साध्य होण्यास मदत होईल हे या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

  शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रबी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला.

  पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ,पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबी मुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ,नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्‍चात नुकसान या प्रमुख बाबींचा मोबदला देण्याचा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.

  योजनेत समाविष्ट पिके:

  तृणधान्य व कडधान्य पिके यामध्ये खरीप हंगामात घेतले जाणारे भात (धान),खरीप ज्वारी,बाजरी, नाचणी(रागी), मूग, उडीद, तूर, मका या 8 पिकांचा समावेश होतो. तर रबी हंगामात घेतले जाणारे गहू (बागायत), रबी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात या पिकांचा समावेश होतो.

  गळीत धान्य पिके यामध्ये खरीप हंगामात घेतले जाणारे भुईमूग,कारळे,तीळ, सूर्यफूल, सोयाबीन या पाच पिकांचा समावेश होतो.तर रबी हंगामात घेण्यात येणारे उन्हाळी भुईमूग या पिकाचा समावेश होतो.

  नगदी पिकांमध्ये खरीप हंगामात घेतले जाणारे कापूस, खरीप कांदा तर रबी हंगामात घेतला जाणारा कांदा या पिकाचा समावेश होतो.

  लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे:

  अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड किंवा आधार नोंदणीची प्रत,सातबारा उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकर्‍यांचा करारनामा, सहमतीपत्र, पेरणी घोषणापत्र आणि बँक पासबुकची प्रत सादर करून प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय पिक विमा योजना पोर्टलला महाभुलेख संकेतस्थळांचे एकत्रिकरण कार्यान्वित झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या जमीन धारणेची पडताळणी होणार असल्याने पुन्हा अर्जासोबत सातबारा उतारा अपलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही.आपले सरकार सेवा केंद्राद्वारे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रस्तावासोबत मोबाईल क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाची स्वयंसाक्षांकन करणे बंधनकारक आहे.

  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी व माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.