“… तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा, जनतेचे प्रश्न मार्गी लावेन”; शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.25जून):-शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळं सध्या राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. गुवाहाटीत शिंदे गटासह शिवसेनेचे जवळपास 35 आमदार उपस्थित असून हा आकडा वाढत चालला आहे. असं असतानाच राज्यातील सत्तानाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला नियुक्ती द्यावी, जनतेचे प्रश्न मार्गी लावेन, अशी मागणी एका शेतकऱ्यानं राज्यपालांकडे केली असल्याने या मागणीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. तर सोशल मिडियावर देखील हे पत्र व्हायरल होत आहे. पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. सध्या राज्यात सत्तेचं महानाट्य सुरू असून सध्याचे महाविकास आघाडी सरकार पडणार का? येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री दिसणार का?

याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. त्यातच बीडच्या एका शेतकऱ्यानं आपल्यालाच महाराष्ट्राचा प्रभारी मुख्यमंत्री बनवावे, जनतेचे प्रश्न मार्गी लावेन, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांना पाठवलं आहे. बीड जिल्ह्यातील या शेतकऱ्याच श्रीकांत गदळे असे नाव असून त्यांनी पाठवलेल्या पत्रामुळं ते सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत.

पत्रात काय म्हंटलय “उपरोक्त विषयानुसार विनंती अर्ज करतो की, मी शेतकरी पुत्र श्रीकांत विष्णू गदळे राहता दहिफळ (वडमाऊली) तालुका केज, जिल्हा बीडचा रहिवाशी आहे.

मी 10 ते 12 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

अशावेळी सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. परंतु ती मिळाली नाही. तरी आज मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभावी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी. मी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावेन. बेरोजगारी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊतोड कामगार या सर्वांना न्याय देण्याचं काम मी करेन. विवाध प्रश्न सोडवण्यासाठी आपण तात्काळ माझी नियुक्ती करावी ही विनंती.” असे या पत्रात लिहीले आहे. श्रीकांत गदळे या शेतकऱ्यानं थेट राज्यपालांना पत्र लिहून प्रभारी मुख्यमंत्री पदी नियुक्ती करण्याची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED