मुक्तछंद– राजे, पुन्हा या महाराष्ट्रात जन्माला नका येऊ !

37

राजे पुन्हा या महाराष्ट्रात जन्माला नका येऊ !आलाच जन्माला तर
रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ नका घेऊ.स्वराज्यासाठी बलिदान देणारे तानाजी, बाजी आता इथे भेटणार नाहीत.जीवाला जीव देणारे आता इथे भेटणार नाहीत.पावलोपावली इथे गद्दारांची गर्दी आहे.निष्ठा कोलणारांची आणि शब्द फिरवणारांचीच वर्दी आहे.राजे, शब्दासाठी जीव द्यायचा काळ तुमच्यासोबतच गेला.ध्येयासाठी बलिदान द्यायचा काळ इतिहास जमा झाला.

राजे, लोक तुमच्यासोबत येतील. सरदारकीसाठी गुपचूप आदिलशहा आणि औरंगजेबाकडे जातील.पैशासाठी, पदासाठी फितुर स्वराज्यावरच चाल करतील.राजे, हे आत्ताचे मावळे अफझलखानाला सामिल होत तुमचाच कोथळा काढतील.खानाच्या दावणीला जात निष्ठेचे मुजरे झोडतील.सत्तेच्या लोभापायी शाहिस्तेखानाशी हातमिळवणी करत तुमचीच बोटे तोडतील.दिवसभर तुम्हाला मुजरे अन रात्रीच्या अंधारात वेष बदलून औरंगजेबाला भेटतील.राजे, पुन्हा या महाराष्ट्रात जन्माला नका येऊ.रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ नका घेऊ.आता तुमची रयतसुध्दा दारूच्या बाटलीवर आणि पाचशेच्या नोटेवर विकते.दोन हजार खात्यावर पाठवले की औरंगजेबासमोर झुकते.राजे, छत्रपतीपदाची वस्त्रे घ्यायला आता अनाजीकडे हात पसरावा लागेल.

स्वाभिमानाचा ताठ कणा ठेचून त्यालाच मुजरा करावा लागेल.राजे, आता काळजी घ्या,तुमचाच तानाजी, बाजी तुमच्यावर दबा धरून आहे.राखायचेच असेल तख्त तुम्हाला,तर सुरतेवर स्वारी नव्हे सुरतेची वारी करावी लागेल.राजे, पुन्हा या महाराष्ट्रात आलाच जन्माला तर झुकल्या-वाकल्या माना, गनिमाला फितुर, लाचार-लाजिरवाना सह्याद्री पहावा लागेल.

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006