नियमबाह्य दारू दुकानाविरोधात जनविकास सेना आक्रमक

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.12जुलै):-जिल्ह्यातील दारु दुकानांचे स्थालांतरण व मंजुरीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. सोमवारी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी भर पावसात शेकडो महिला व पुरुषांच्या उपस्थितीत दारु दुकान स्थालांतर व मंजुरीमध्ये झालेल्या आर्थिक देवाण-घेवाण संदर्भात रिक्षा भरुन जिल्हाधिकाऱ्यांना पुरावे सादर केले. त्यामुळे आता जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील दारूबंदी हटल्यानंतर दारू दुकानांचे स्थलांतरण व नवीन दारू दुकानाला मंजुरी तसेच जुनी दारू दुकाने व बियर शॉपींना पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देताना १८ ते २० कोटींची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष देशमुख यांनी केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारची कोणतीही देवाण-घेवान झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच ज्या नागरिकांना तक्रारी असतील त्यांनी पुरावासह निवेदन द्यावे, असे आवाहनही केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत जनविकास सेनेने रिक्षात भरून पुरावे देण्याची घोषणा केली होती. सोमवारी भर पावसात दुपारी एक वाजताच्या दरम्यान जनविकास सेनेच्या शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी येथील महात्मा गांधी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. तसेच एका रिक्षामध्ये पुरावे भरून एका तक्रारीसह सर्व पुरावे उपनिवासी जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केले.

यावेळी जनविकास सेनेच्या मनीषा बोबडे, निर्मला नगराळे, आकाश लोडे, राहुल दडमल, गितेश शेंडे, अजित दखने, प्रफुल बैरम, इमदाद शेख, अक्षय येरगुडे, अजय महाडोळे, सतीश ददगाड, किशोर महाजन, देवराव हटवार, अनिल कोयचाळे, जलदीप येरमे, देवराव हटवार, मनिष आसुटकर, दिनेश कंम्पू, प्रफुल्ल बजाईत, प्रवीण अतेरकर, बेबी राठोड, प्रतिभा तेलतुमडे, प्रतिमा भोपारे, मेघा दखणे, निलिमा वणकर, भाग्यश्री मुधोळकर, बबिता लोडेलीवार, दर्शना झाडे, गीता दैवलकर इत्यादींनी सहभाग घेतला.

जनविकास सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना ओपन चॅलेंज

लोकवस्ती मधील नियमबाह्य दारू दुकानाचे विरोधात आक्रमक झालेल्या जनविकास सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्षात नेऊन पुरावे दिल्यानंतर उपनिवासी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी यांना ओपन चॅलेंज केले आहे. आपण दिलेले पुरावे खोटे असल्याचे जिल्हा प्रशासनाने सात दिवसात सिद्ध केल्यास संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांची जाहीरपणे लेखी माफी मागण्यात येईल. असे न केल्यास सात दिवसानंतर दारू दुकानांच्या स्थलांतरण व नवीन दारू दुकानांना मंजुरी देण्याच्या प्रकरणात १८ ते २० कोटीची देवाण-घेवाण झाल्याचे मान्य करावे, असे थेट आवाहन देशमुख यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केले आहे.