अपंग : कल्याण व शिक्षण

53

(शारीरिक किंवा मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपली दैनंदिन कामे करणे ज्यांना दुष्कर किंवा अशक्यप्राय आहे, अशा व्यक्तींना ‘अपंग व्यक्ती’ म्हणतात. *मुख्यत: आनुवंशिक वारसा, अपघात किंवा रोग या तीन कारणांनी अपंगता निर्माण होऊ शकते.* अपंगांमध्ये, आंधळे, मुके—बहिरे आणि हातापायाने लुळे असलेले किंवा हातपायच नसलेले पांगळे-थोटे आणि मनाने दुर्बल असणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश होतो. ह्रदय, फुप्फुस, डोळे इ. महत्वाच्या अवयवांच्या चिरकारी व्याधींमुळे अकार्यक्षम झालेले स्त्रीपुरुष व शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असणारी मुले यांचाही अपंग व्यक्तींत समावेश करण्यात येतो.

डॉ. हेन्री कीसलर यांच्या मतानुसार दुष्काळ, रोगराई, युद्ध इ. कारणांमुळे अपंगता प्राप्त झालेल्यांची संख्या जगातील एकंदर लोकसंख्येच्या पंचवीस टक्के आहे. दुसऱ्या महायुद्धापासून अपंगांच्या प्रश्नास असाधारण महत्व प्राप्त झाले. हेन्री व्हिकारडो यांनी १९५२ मध्ये अमेरिकेत ‘अंबिलिटीस इंर्पोरेटेस’ नावाची अपंगांच्या पुवर्वसनासाठी एक संस्था काढली. भारतात १९५७ मध्ये श्रीमती फातिमा इस्माईल यांनी मुंबईत एक संस्था स्थापून भारतातील अपंगांच्या पुनर्वसनाच्या समस्येस तोंड देण्याच्या प्रयत्नास चालना दिली.

*अपंगाचे प्रकार*

*जन्मजात अपंग व जन्मानंतर झालेले अपंग, असे अपंगाचे दोन मूलभूत प्रकार आहेत.* अपंगांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. निरनिराळ्या साधनांचा वापर करून पूर्णत: स्वावलंबी होण्यासारखे, केवळ संरक्षित वातावरणात कार्य करू शकणारे आणि अर्थोत्पादनास अयोग्य, असे अपंगांचे तीन वर्ग आहेत.

जन्मास किंवा बालपणात आलेली अपंगता व प्रौढपणी प्राप्त झालेली अपंगता यांमध्ये फरक असा, की पहिल्या प्रकारात पुनर्वसनाची आवश्यकता असली तरी निकड नसते; कारण अर्थोत्पादन करू लागण्यास त्यांना अवधी असतो. दुसऱ्या प्रकारात अर्थोत्पादनात एकाएकी खंड पडल्याने पुनर्वसन शक्य तितक्या लवकर होणे आवश्यक असते. हे न झाल्यास परावलंबित्व उद्भवण्याची शक्यता असेत. एकाहून अधिक उणिवा असल्याची ही पुनर्वसना प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होतो. लहान मुलात अपंगतेचे अस्तित्व ओळखणे अवघड असले तरी महत्त्वाचे असते. अपंगता आहे असे निश्चित झाले, की मुलाची शारीरिक, मानसिक व भावनात्मक तपासणी करून अपंगतेची व्याप्ती ठरविली जाते व त्यानुसार कोणते उपचार करावे लागतील याचा अंदाज घेता येतो. मूल ज्या कुटुंबात असेल, त्या कुटुंबातील व्यक्तींची मनोभूमिका व आर्थिक स्थैर्य लक्षात घेणेही आवश्यक असते. मुलाला व त्याच्या कुटुंबीयाना वास्तव दृष्टीने वागणूक देणे महत्त्वाचे असते. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यास जास्तीत जास्त संधी देणे, हे त्याच्या पुनर्वसनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. तरीदेखील अशक्य गोष्टी साध्य होतील या भ्रमात त्याने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी राहणे अनिष्ट असते. पुस्तके, रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट इत्यादींच्या साहाय्याने अपंग मुलांच्या पालकांना शिक्षण देऊन अपंग मुलाचे संगोपन कसे करावे याविषयी योग्य ती माहिती देण्यात येते. सर्वसाधारण शिक्षणपद्धती व खास शिक्षणपद्धती यांचा वापर करून मुलाची अपंगता जास्तीत जास्त दूर करून त्यास स्वालंबन साध्य झाले, तरच पुर्वसनाचा मूलभूत उद्देश साध्य होतो.

एके काळी असे मानले जात हेते, की वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीबरोबर जगातील रोगराई आणि अपंगता नष्ट होईल. परंतु आज तरी अशी स्थिती आहे, की मृत्युमान कमी झाले असले, तरी अपंगता त्या प्रमाणात कमी झालेली नाही. इथेच असमर्थता आणि अपंगता यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवा. असमर्थता ही प्राथमिक स्वरूपाची असते आणि तिच्यामधून अपंगता निर्माण होते. डोळे नसल्यामुळे योणारी असमर्थता फक्त डोळ्यांच्या जगातच अपंगता ठरते. एखादा अंध मुलगा सभोवतालच्या वातावरणात कुतूहलाचा आणि दयेचा विषय होतो. परंतु अंधशाळेमध्ये त्या मुलाविषयी कोणालाच कृत्रिम सहानुभूती अथवा दया नसते. त्यामुळे अंधशाळेमध्ये हा मुलगा मनाने सुरक्षित असतो. अर्थातच त्याचे हे समाधान खोटे आणि कृत्रिम असते. या अंध मुलाला केव्हा ना केंव्हा तरी डोळसांच्या समाजात परत जावयाचे आहे, हीच दृष्टी योग्य आणि शास्त्रीय आहे. सारांश, अपंगता आणि अपंगांचे पुनर्वसन हे प्रश्न सामाजिक आहेत.

अपंग मुलाबाबतचा दृष्टिकोन त्याचे जीवन घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे अगत्याचे आहे. परंतु त्याआधी शरीरचना आणि मनोरचना ह्यांचा अपंगतेच्या संदर्भात परस्परांशी काय संबंध आहे हे पाहणे आवश्यक आहे. काही विशिष्ट तऱ्हेच्या शरीररचनेमुळे वागण्यामध्ये काही वेगळेपणा येण्याचा संभव आहे किंवा काय, याचा विचार पूर्वीपासून केला जात आहे. ह्या शास्त्राला ‘सोमॅटोसायकॉलॉजी’ असे म्हणतात. याबाबत स्थूल मानाने काही सूत्रे अशी सांगता येतील :
(१) अपंग मुलाच्या शरीररचनेचा मनोरचनेशी प्रत्यक्षत: संबंध नसतो. केवळ अपंग आहे म्हणून मुलाच्या मनात विकृती आहे असे; किंवा शरीराने तो चांगला आहे म्हणून त्याचा मनोविकासही उत्तम झाला आहे असे मानणे चुकीचे होईल.
(२) मनुष्य म्हणजे केवळ हाडामांसाचा पुतळा नाही; त्याच्या शरीरात अनेक अंत:स्रावी ग्रंथी कार्य करीत असतात. या ग्रंथींतील स्रावांचा माणसाच्या शरीरातील वाढीप्रमाणे वर्तुणुकीवरही परिणाम होतो.
(३) माणसाची वाढ आणि वर्तणूक ही केवळ परस्परांवर अवलंबून नसून सामाजिक घटनांचा दोहोंवरही परिणाम होत असतो.

*अपंगांचे शिक्षण*

अपंगतेच्या विविध प्रकारांमुळे अपंगांना शिकविणाऱ्‍या शिक्षकांच्या, शैक्षणिक प्रशासकांच्या आणि नियोजकां- च्या पुढे नवे नवे प्रश्न उभे राहत आहेत. अपंगतेमुळे व शाळेच्या वातावरणाशी समरस न झाल्यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक गरजांनुसार शिक्षणाचेच वळण बदलावे लागते; काही वेळा मुलाची अपंगता तीव्र असल्यामुळे त्याला शाळेत येता येत नाही, अशा वेळी त्यास घरीच शिकवावे लागते. काही मुलांना त्यांच्या दुर्बलतेनुसार विशेष वैद्यकीय आणि शैक्षणिक उपचार करावे लागतात. काही *अपंग मुले सामान्य शाळेच्या चौकटीत बसत नाहीत, म्हणून त्यांच्याकरिता वेगळ्या शाळा काढव्या लागतात.* अंपंगांच्या शिक्षणाचे हे सारे प्रश्न अभ्यासून त्यांच्या शैक्षणिक प्रमेयांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न अलीकडे होत आहे. शिक्षकांची श्रेणी, शालेय व्यवस्था आणि शैक्षणिक नियोजन अशा साकल्यात्मक दृष्टिकोनातून अपंगांचे शिक्षण वा पुनर्शिक्षण यांचा विचार करावयास हवा, अशी जाणीव निर्माण होऊ लागली आहे.

गेल्या शतकात शिक्षणविषयक तत्त्वज्ञानात सर्वांत मोठा बदल मुलांविषयींच्या दृष्टिकोनात झाला आहे. एके काळी सामूहिक शिक्षण हा परवलीचा शब्द होता आता प्रत्येक मुलाचे वैयक्तिक विकसन हा शिक्षणपद्धतीचा पाया मानला गेला आहे. प्रत्येक मुलाचा विकास अनिर्बंधपणे व्हावा, प्रत्येक मुलाची बुद्धी, प्रवृत्ती आणि शैक्षणिक पात्रता ह्यांच्यानुसार त्याला जीवनविकासाची संधी मिळावी, असे मानले जाते. हा द्‍ृष्टिकोन अपंग मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत अधिकच महत्त्वाचा आहे.

*अपंगतेचा प्रकार कोणताही असो, शिक्षणाचे तंत्र वा साधन कोणतेही असो, अपंगाचे शिक्षण हा एक स्वतंत्र शिक्षणसंप्रदाय आहे.* जेथे शक्य असेल तेथे वैद्यकीय उपचार, शिक्षण व पुनर्वसन ह्यांच्या द्वारा अपंग अवयवांची अथवा इंद्रियांची शक्ती पुन्हा वाढीला लावली पाहिजे. ते शक्य नसेल, तर त्या शक्तीची जागा भरून काढण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. हे शिक्षण मुलांच्या गरजेनुसार आणि अशा मानसशास्त्रीय पद्धतीने दिले गेले पाहिजे, की मुलाच्या मनातील सारे गंड आणि विकृती निघून जाव्यात. मुलाला समाजात पुन्हा अर्थार्जन करणारा स्वावलंबी घटक म्हणून परत जाता यावे, ह्यासाठी शैक्षणिक द्‍ृष्ट्या करण्यात आलेले प्रयत्न जरी संख्येने थोडे असले, तरी सामाजिक प्रतीक म्हणून त्यांना महत्त्व आहे.

प्रत्येक अपंग मुलाची रोगमुक्त, स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्याची इच्छा असते. अपंग मुलांची हळुवार देखरेख, शारीरिक स्वास्थ, मनोरंजन, सुंदर वातावरण सारे एकत्र केले, तरी अशा मानसिक स्वातंत्र्याची सर त्यांना येणार नाही. अपंगतेमुळे येणारे वैफल्य, निराशा, आलस्य ह्यांच्या जखडबंदीतून अपंग मुलांची मुक्तता करण्याचे कार्य शिक्षकाला करावे लागते. अनुभव हा एक शिक्षक असतोच, तथापि मुलाची अनुभव घेण्याची तयारी आणि त्यासाठी शिक्षकाने उपलब्ध करून दिलेली संधी ह्यांचा मेळ बसावा लागतो. शिक्षक मुलासाठी अनुभवांचे प्रचंड विश्व उभे करू शकतो. हे विश्व उभे करण्यासाठी वेगवेगळे मनोरंजक, आकर्षक आणि कल्पक खेळ, शिक्षणसाधने, नाट्य, हस्तकला, वनविहार इत्यादींचा उपयोग शिक्षक करतो. ह्या छोट्याछोट्या अनुभवांतून मुलाच्या मनातील पारतंत्र्य आणि परावलंबन नाहीसे होते आणि मूल स्वतंत्र- पणे व आत्मविश्वासाने जीवन जगू शकते.

अपंग मुलांचा अभ्यासक्रम ठरविताना, त्यांना काय शिकवावे हा प्रश्न उभा राहण्याचे कारण नाही. समाजातील इतर सर्व मुलांना जे ज्ञान, जे शिक्षण व जे अनुभव आवश्यक आहेत, तेच अपंगांना दिले गेले पाहिजेत. फरक होईल तो केवळ देण्याच्या पद्धतीमध्ये व साधनांमध्ये. अशा शिक्षणामुळे पुढे योग्य संधी मिळाल्यावर ही मुले इतरांसारखीच यशस्वी होतात, हे शास्त्रीय द्‍ृष्ट्या सिद्धही झाले आहे.

*अंधत्व*

जागतिक आरोग्य-संघटनेच्या १९५३ च्या पाहणीत साडेसहा कोटी लोक अंधत्वामुळे अपंग असलेले आढळले. जगातील कित्येक अविकासित देशांतील नोंदीमधील उणिवा लक्षात घेता ही संख्या चौदा कोटी इतकी असावी, असा अंदाज आहे. *मध्यपूर्व व अतिपूर्व देशांत अंधांची संख्या सर्वांत जास्त आहे.*

सर्वमान्य अशी अंधत्वाची व्याख्या अजूनही निश्चित नसल्यामुळे अंधांची नक्की संख्या किती ह्याचा अंदाज करणे कठीण आहे. संपूर्ण अंध व्यक्ती व सर्वसाधारण द‍ृष्टीच्या एकदंशांश इतकीच द्‍ृष्टी असलेल्या व्यक्ती यांची अंध व्यक्तींत गणना करण्यात येते. डोळ्यात फूल पडणे, तसेच डोळ्यातील तंत्रिका, द्‍ृक्पटल, कनीनिका या भागांच्या विकारांमुळे अंधत्व आलेल्या व्यक्तींची संख्या विकसित देशांत अधिक आढळते. अविकसित देशांत मुख्यतः देवी, खुपऱ्‍या व स्वच्छमंडलाची मृदुता या विकारांमुळे अंधत्व प्राप्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.

*अंध-शिक्षण*

समकालीन जीवनातील विविध प्रवाहांत अंध मुलांना सहभागी करणे, हे अंधांच्या शिक्षणातील महत्त्वाचे तत्त्व समजले जाते. कारण ह्या प्रवाहात मिसळण्याच्या सौख्याला अंध मुले पारखी झालेली असतात. डोळस मुलांचे शिक्षण व अंध मुलांचे शिक्षण ह्यांत फारसे भिन्नत्व नाही. परंतु शिक्षणात वापरण्यात येणारी साधने व पद्धती ह्यांत स्पष्टपणे भिन्नत्व दिसून येते.

अंधांच्या बाबतीत या शिक्षणसाधनांचा उपयोग करावा तितका थोडाच असतो. *ब्रेल पद्धतीच्या द्वारा अंधांच्या शिक्षणाचे वेगळे तंत्र वाढत आहे.* तथापि आपण द्‍ृष्टिच्या द्वारा इतक्या प्रचंड प्रमाणावर शिकत असतो, की द्‍ृष्टी नसलेल्या मुलांना तो अभाव भरून काढण्यासाठी स्पर्श, गंध, रूची व श्रवण ह्या तोकड्या माध्यामांच्या द्वारा शिकवावे लागते. त्यामुळे ह्या मुलांचे विश्व किती मर्यादित आहे हे कळून येते.

✒️समीर पटेल:-एम.ए, बि.एड् ( समाज शास्त्र) बि.सी.ए, सर्व्हेर ( भुमापक )दिव्यांग विकास संघर्ष समिती संस्थापक