आम्ही कुणामुळे मागासवर्गीय झालो?

33

सद्या ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाचा निर्णय आल्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसिंचे गेलेले राजकीय आरक्षण आम्हीच दिले. हे छाती ठोकून सांगण्याचे काम मागील महाविकास आघाडीतील,शिवसेना उद्धवजी ठाकरे, कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस यातील मराठा नेते आणि भाजपा नेते मोठ मोठ्याने सांगत आहेत. बाठिया आयोगाचा सर्व्हे आणि त्यामुळे मिळालेले आरक्षण ही धूळफेक आहे. हे माहीत असूनही ओबीसी नेते फडणवीस एकनाथ शिंदे सरकारचे अभिनंदन करताना त्यांना जबरदस्तीने पेढे भरवीत आहेत.

यात सर्वात जास्त लाचार,गुलाम ओबीसीं नेत्यांना हे कोण सांगणार? आम्ही आमच्याच बांधवांची फसवणूक करीत आहोत.महाराष्ट्रातील कोणताच नेता त्याच्या जातीतील पाच माणसांना समजावू शकलेला नाही की आपण ओबीसी म्हणजे “मागासवर्गीय” आहोत. लोकांचे जाऊद्या जे स्वतःस ओबीसी नेते म्हणतात त्यांनी आम्ही मागास आहोत हे मनापासून जाणले आहे का? भारतात जुन्या मनुस्मृतीच्या गुलामगिरीस लाथाडून मानवी स्वातंत्र्याची नवी झेप घेणारी आंबेडकरी विचारांची नवी मागासवर्गीय विचारप्रणाली नव्या भारताच्या स्वातंत्र्य समता बंधुता न्याय तत्वाची मांडणी आहे.यात आमच्यातून एखादी क्रांती ज्योती सावित्री माई फुले,एखादा शेतकऱ्यांची गुलामगिरी शिक्षणाच्या विद्येच्या अभावामुळे आहे हे सांगणारा महात्मा जोतिबा फुले व्हावा? आणि साऱ्या जगास मानवी मुक्तीचा नवा विज्ञानवादी धम्म समजविणारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व्हावा! की जो कधीच लाजत नाही उच्चवर्णीयासमोर ताठ उभा राहून सांगायला होय मी मागासवर्गीय हिंदू आहे. परंतु मी असा मरणार नाही.माझ्या मागासवर्गीय बांधवाना कायमचे मानसिक स्वातंत्र्य मुक्ती देऊनच मरेन.

मागास असण्यामागचे हे वास्तव जाणले असेल? तर ते इतर मागासवर्गीय असलेल्या अतिशूद्र जातींच्या भावा बहिणींशी “शूद्र” म्हणून बंधुतेचे नाते जोडतात का?. आम्ही मागास आहोत हा न्यूनगंड असण्याचा विषय नाही. अर्थात सारे मागासवर्गीय हे मूलतः प्रामाणिक आहेत. त्यांचा इतिहास पराक्रमाचा आहे.लाज बाळगायची असेल? तर उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी बाळगावी.या देशातील समस्त स्त्रिया या शूद्र आहेत.ओबीसी एससी एसटी हे शूद्र आणि अतिशूद्र आहेत.ही लिखित मांडणी उच्चवर्णीयांचा धार्मिक ग्रंथ मनुस्मृतीच्या माद्यमातून, इतर हजारो कथा पुराणे रामायण महाभारता सारखी महाकाव्ये लिहून देशभर, मागासवर्गीय मना मनात बिबविण्यात आले आहे.या लिखित गोष्टी सर्व ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीयांना माहीत असून त्याप्रमाणे ते आम्हा मागासवर्गीय लोकांशी तसे विकृत आचरण करीत असतात. अत्यन्त हुशार तल्लख बुद्धीचे, संघर्षशील स्वाभिमानी व्यक्तिमत्व लाभलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्रीय पद्धतीने भारतातील उच्चवर्णीयाची ही लबाडी जगासमोर आणली आहे.या अगोदर ओबीसी माळी जातीतील महात्मा जोतिबा फुले यांनी ब्राह्मणांकडून झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आपण शूद्र आहोत हे प्रामाणिकपणे कबूल केले. या महात्मा जोतिबा फुले याना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरू मानले त्याचे कारणंच हे असावे?

कोणत्याही स्वतन्त्र मनाच्या माणसाचा जेव्हा असा, विनाकारण अपमान होतो. तेव्हा आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला जे सत्य दिसते. जाणवते त्यानुसार जो आपल्या जीवनाची योग्य दिशा ठरवतो, तोच माझा गुरू. हे मानवी मनाला,मानवी अस्तित्वाचे कारण मानणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समजले असावे.जन्माधारित वंशश्रेष्टत्व मानणाऱ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या त्रिवर्णिकानी स्त्रिशूद्रातिशूद्र यांचा जन्म होण्या आधीपासूनच, जाहीर अपमान करण्याचे मनुस्मृतीच्या शास्त्रानुसार घोषित केले आहे.याचे सर्वाना समजेल असे उदाहरण म्हणजे, स्वतःच्या पोटी जन्माला येणारे अपत्य “स्त्री “असेल तर गर्भजल चिकित्सा करून तिला आधुनिक विज्ञान आणि वैद्यक शास्त्राचा उपयोग करून ठार करण्यात आताही उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे कुख्यात आहेत.अर्थात मुलींना लग्नात हुंडा ध्यावा लागतो.पित्याच्या संपत्तीत वाटा दयावा लागतो. हे खरे व्यावहारिक कारण त्या पाठीमागे आहे.याच पद्धतीने पती निधनानंतर आपल्या पतीची संपत्ती तिने विधवा म्हणून मागू नये. म्हणून स्त्रियांना धार्मिक पावित्र विधी,म्हणून पतीच्या चितेवर जाळणारा महान वैदिक हिंदू धर्म, वर्तमान काळात देशात अभिमानाचा, सत्ता संपादन करण्याचा मार्ग ठरावा? यासारखा आमच्या आई बहिणींचा दुसरा मोठा अपमान नाही.

स्त्रियांना आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक अधिकार नाकारणारा,हिंदू वैदिक मनुस्मृती धर्म हा आम्हा मागासवर्गीय ओबीसींचा धर्म असूच शकत नाही. कारण तो आमच्या जन्मदात्या आईच्या विरोधात आहे.या पुरुषसत्ताक धर्माचे समर्थन करताना आपल्या जन्मदात्या आईला ठार करणारा परशुराम हा आमचा देव आहे.आदर्श आहे.हे ब्राह्मण सांगतात. याच परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रियांना ठार केले असे धादांत खोटे सांगूनही मागासवर्गीय लोकांच्या विरोधात ब्राह्मण क्षत्रिय यांची युती वर्तमान महाराष्ट्राच्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये होऊ शकते. अर्थात कोणतीही मानवी न्याय समता बंधुता ही आधुनिक जीवनमूल्ये नाकारणारी, वैदिक मनुस्मृतीच्या नीतीला महान वैदिक संस्कृती म्हणून मिरविणारी मंडळी, आणि आपल्या या धर्म तत्वांचा जगभर डंका पिटणारे आंधळे हिंदुत्ववादी आम्ही रोज पहातोय. म्हणूनच जन्मदात्या आईशी प्रामाणिक राहण्याचा,लग्नात हुंडा नाकारण्याचा संस्कार हाच आमचा एकविरा मातृसत्ताक विचार,हा मनुस्मृतीच्या विरोधातला मानवी मूल्यांचा विचार आहे.

कोकणातल्या आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसी जातीत हे मांडायला मी सुरुवात केली. ज्याप्रमाणे महात्मा जोतिबा फुले यांना छत्रपती शिवाजी टर्मिनस मुबंई जवळील मांडवी कोळीवाडा येथे,आमच्या आगरी कोळी भंडारी कराडी बांधवांनी “महात्मा” ही पदवी दिली. अर्थात येथील रेल्वे स्टेशन बांधीत असताना विस्थापित होणाऱ्या आमच्या ओबीसी वस्तीला इंग्रज सरकारकडून पुनर्वसन प्राप्त करणारे नेतृत्व हे महात्मा जोतिबा फुले यांचे होते.इंग्रज काळात जुने व्हिटी स्टेशन बांधणारे प्रथम बिल्डर हे महात्मा फुले होते. अर्थात मुंबईचे प्रथम बिल्डर हे आगरी कोळी भंडारी कराडी माळी हेच होते हे समस्त मागासवर्गीय बिल्डर लॉबीने समजून घ्यावे.तत्कालीन समाज रचनेत सत्कार मूर्ती शूद्र ओबीसी महात्मा फुले यांचा सन्मान होत असला तरीही आगरी कोळी समाजाची नावे लिहिण्याचा प्रामाणिक पणा पत्रकार लेखक यांच्यात नसावा?त्यामुळे मराठा बांधवांचा उल्लेख दिसतोअर्थात त्यांनी त्याकाळात शूद्र महात्मा फुले यांच्या सत्कारात भाग घ्यावा ही आजच्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ठ ठरावी.कारण महात्मा फुले यांना आपले गुरू मानणाऱ्या लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाला पहिला विरोध आजचे मराठा क्षत्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन केला.या प्रस्तावाला मराठा नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि फडणवीस मोदी या साऱ्यांनीच विरोध केला. हा इतिहास ओबीसींना कधीही विसरता येणार नाही.

कोरोना काळात अंगावर पोलीस केस घेऊन लाखोंची आंदोलने करूनच इथल्या आगरी कोळी ओबीसींनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या आरक्षण विरोधकाचे नाव पुसून टाकले.आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालेले दि बा पाटील यांचे नाव हा ओबीसी जातींच्या संघर्षाचा विजय आहे. त्याचे श्रेय महाविकास आघाडी किंवा शिंदे फडणवीस सरकारला देताच येणार नाही.अर्थात हे ओबीसींचे शत्रूच आहेत.राजकारणात कुणी कुणाचे शत्रू नसते हे वाक्य फक्त मराठा ब्राह्मण वैश्य यांनाच लागू पडते.ठाकरे सरकार पाडण्यात मोठी भूमिका घेणाऱ्या मोदी शहा यांच्या ईडी आणि फडनवीशी कारस्थानाला अयोध्येच्या कारसेवेचे पवित्र स्वरूप देणाऱ्या,एकनाथ शिंदे, अजित पवार,फडणवीस यांच्या विधिमंडळातील अभिनंदनाचा जो ठराव झाला.त्या भाषणात महाराष्ट्राने पाहिले आहे.या निर्लज्ज गद्दार राजकारणाचा महाराष्ट्राच्या तरुण पिढीवर अत्यन्त विकृत परिणाम झाला आहे.मुख्यमंत्री मराठा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार या निर्णयात ओबीसी राजकीय आरक्षण देण्याचा हेतू साध्य न होता, महाराष्ट्र सरकार हे मनुस्मृतीच्या ब्राह्मण मराठा वैश्य या उच्चवर्णीय नीतीने चालते.ही कटू सत्य, स्वाभिमानी प्रतिक्रिया देणारा खरा मागासवर्गीय ओबीसी आमदार विधानसभा किंवा विधानपरिषदेत नाही. हे वास्तव ओबीसींना स्वीकारावेच लागेल.

महाराष्ट्रातल्या उच्चवर्णीय सत्तेचा महोत्सव अजून किती दिवस साजरा करणार आहोत आम्ही?.महात्मा फुले याना लिखित स्वरूपात आपले गुरू माननारे,अलिबागच्या खोती विरोधी आंदोलनाचे नेते नारायण नागु पाटील होते.त्याच प्रमाणे ऍड दत्ता पाटील,दि बा पाटील होते. तरीही महात्मा फुले यांचा आगरी कोळी समाजाशी काहीएक समंध नाही, असे सांगणारे आगरी मोरेश्वर पाटील, हे कट्टर हिंदू चित्रकार ठाण्यात आहेत.त्याचप्रमाणे सुरेंन कोळी,चेंदणी कोळीवाड्यातील कोळी नेते हे,महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी आम्ही मच्छीमार सागरपुत्रओबीसींनीच दिली हे अभिमानाने सांगणारे मागासवर्गीय आरमारी लोकही आहेत.आज फुले शाहू आबेडकरं यांना आदर्श मानणे, हे शुद्रत्वाचे लक्षण मानले जात आहे.तर आमच्यावर वैचारिक हिंदुत्व ब्राह्मण्य गुलामी लादण्यात पुढे असणारे हेडगेवार, सावरकर, गोळवलकर, बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष ओबीसींच्या डोक्यात घुसवले जात आहेत.आम्ही मागासवर्गीय का आहोत? हे अतिशय चागल्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे.या देशातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 15 टक्के लोकांकडे देशातील एकूण मालमत्ता जमिनी जंगले पाणी, शेती, उद्योग, व्यापार शिक्षण आणि मानवी प्रतिष्ठा, धार्मिक अधिकार एकवटले आहेत.अर्थात मनुस्मृतीच्या कायद्याने त्यांना हा सम्पती बाळगण्याचा अधिकार हिंदू वैदिक पुढारी म्हणून मिळाला आहे. विविध आंदोलने करून ते विषमतावादी उच्चवर्णीय धोरण उदाहरणा सहित, देशासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणले आहे.त्याच प्रमाणे 85 टक्के ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांना हे अधिकार नाकारणे म्हणजेच ते शुद्रतिशूद्र मागास असणे होय.यात ओबीसी कुठे बसतात? हे कुणीही सांगू शकतो. सामाजिक दृष्टीने उच्चवर्णीय जातींनी आम्हाला, कमी लेखणे हे आम्ही मागास वर्गीय असण्याचे प्रमुख लक्षण आहे.

हेच वर्तमान आरक्षणाचा म्हणजेच मागासवर्गीय आरक्षणाचा निकष असताना.आरक्षणामुळे नाकारलेली संधी मागासवर्गीय ओबीसी लोकांना का मिळते ?हा उच्चवर्णीय जमीनदार जातींच्या चिंतेचा विषय झाला.मागासवर्गीय असूयेतून आम्ही मराठा जाट पटेल गुर्जर हे पुढारलेले उच्चजातीय सरंजामी जमीनदार असूनही, आरक्षणाच्या फायद्यासाठी मागासवर्गीय व्हायला,”उच्चवर्णीय चड्डी” काढून तयार झाले. ब्राह्मणही आपले उच्चवर्णीय धोतर सोडून दहा टक्के आर्थिक आरक्षणासाठी उतावीळ झाले. देशातील विषमतेची झळ लागून पोळलेले ओबीसी एससी एसटी यांना उच्चवर्णीय जातीबरोबर येण्यासाठी, सामाजिक समतेच्या संविधानिक तत्वाने आरक्षणाची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे.अर्थात “आरक्षण मुक्त भारत” हे तत्व घेऊन सत्तेच्या मैदानात केवळ भाजप उतरलेला नाही.तर सर्वच राजकीय पक्षातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे महायुती करून उतरलेले आहेत. म्हणूनच केंद्र राज्य स्तरावर ओबीसी जातनिहाय जनगणना कुणी करायला तयार नाही.देशावर परक्या इंग्रजांचे सरकार असताना अशी जनगणना झाली होती. 2011साली अशी जनगणना होऊनही मोदी सरकार ती कधी प्रसिद्ध करणारच नाही .

सर्व राज्यात आणि केंद्रात असलेले उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे मागासवर्गीय आरक्षणाच्या विरोधातच आहेत. आरक्षणाच्या म्हणजेच समतेच्या न्याय तत्वाला विरोध करणारी मंडळी संसदेला वेढा घालून बसली आहेत.ओबीसींच्या हातचा गोड पेढा खाऊन ती बदलणार नाहीत.त्यासाठी देशांतर्गत संविधानिक समतेचे प्रबोधन युद्ध अहिंसक निवडणुका लढवून आम्हाला देशाची सत्ता हाती घ्यावी लागेल.
एकविरापुत्र भगवान बुद्ध म्हणतात की “आपणच स्वतः आपले मार्गदर्शक असतो.”आपल्या जीवनाच्या प्रगतीत स्पर्धा ही आपली स्वतःशीच असते.हे सिद्ध करण्यासाठी प्रचंड कष्ठ हालअपेष्टा सोसून जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊन आपल्या शेवटच्या मागासवर्गीय भाऊ बहिणी यांच्याशी प्रामाणिक राहण्याचा आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जगण्यातून,आम्हाला दिला.सारे संविधानिक कायदेशीर मार्ग मागासवर्गीय लोकांसाठी सविधांन सभेतील, मनुसमर्थक हिंदू विरोधात, राष्ट्रीय वैचारिक संघर्ष करून,आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. अंतिमतः रोज हिंदुत्व ब्राह्मण्य मनुस्मृती यांना बामसेफी शिव्या देण्याचे कर्मकांड करण्यापेक्षा खऱ्या मानवी समतेची संधी, मानवी मुक्ती देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा, मागासवर्गीयांच्या सामूहिक प्रयत्नांनी व्हावी. ओबीसी मधल्या शेकडो जातीत स्वतःस मागास घोषित करून बंड करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आम्ही जन्माला घातले पाहीजेत.हे सांगायला जगातल्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या धर्माचा तौलनिक अभ्यास आमच्या समोर ठेऊन, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म 1956 साली स्वीकारला.

आज आमची 52 टक्के असलेली ओबीसी लोकसंख्या,सत्तेच्या जोरावर 37 टक्के करून,उरलेली नाकारणारे लोक, म्हणजेच जिवंत ओबीसींना मेलेले दाखविणारे?उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आमचे शत्रू आहेत. हे कुणी सांगण्याची गरजच नाही.शत्रू हे शत्रू सारखेच वागणार. परंतु आम्ही माणूस असू? तर आम्ही या उच्चवर्णीय नितीनेच मागास राहिलोय. हे वास्तव स्वीकारू शकलो नाही.कोणते ओबीसी हे आम्ही मागासवर्गीय आहोत.हे वास्तव स्वीकारतात?.ते ज्या दिवशी हे सत्य स्वीकारतील,तेव्हा त्यांचे व्यक्तिगत आणि सार्वजनिक जगणे यात आमूलाग्र बदल होईल.मनुसमर्थक देव देवळे आणि धर्म हे ओस पडतील. मानवी न्यायाची कायदे निर्मितीची मंदिरे म्हणजेच विधानसभा विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा, केंद्र राज्य प्रशासकीय कार्यालये, शिक्षण, उद्योग, व्यापा केंद्रे ओबीसी 52 टक्के लोकसंख्या आणि एससी एसटी यांच्या एकूण 85 टक्के गर्दीने फुलून जातील. अर्थात जेव्हा आम्ही मागासवर्गीय आहोत हे स्वतः स्वीकारू आणि प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी आबेडकरी आदर्श जीवन आम्ही स्वीकारू. मागासवर्गीय लोकांच्या कष्ठावर शोषणावर जगणे, हे उच्चवर्णीय जातींचे लक्षण म्हणजे हरामाचे जगणे होय.तर स्वतःचे श्रम कष्ठ यावर जगणे हे मागासवर्गीय प्रामाणिक जगणे होय.भगवान महावीर आणि एकविरापुत्र बुद्ध यांनी यास श्रमण जीवन,जगणे म्हटले.तर श्रम न करता जगणे. यास ब्राह्मण्य म्हटले.काय निवडायचे? आणि कशाचा अभिमान बाळगायचा? हे आमच्या हातात आहे.अर्थात दूध आणि गटाराचे पाणी एकत्र करण्याचा प्रकार मागासवर्गीय आरक्षणात उच्चवर्णीय क्षत्रिय ब्राह्मण आरक्षणाच्या गटाराचे पाणी घुसळून, सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य बंधुता सांगणाऱ्या संविधानाचा घात करण्याचा हेतू स्पष्ठ दिसतोय. मानवी विषमते विरुद्धच्या, जागतिक आदर्श संविधानाचा गाभा, बदलण्याचा हेतू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा आहे.

संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी 52 टक्के ओबीसी आणि स्त्रिया एससी एसटी यांनी एकत्र येऊन लढणाऱ्या लोकांची आहे.जे आजही हिंदुत्व ब्राह्मण्य मनुस्मृती यांच्या प्रचार प्रसारात अडकून “गर्व से कहो हंम हिंदू है” असे म्हणताहेत.त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हा हिंदू ब्राह्मणी धर्म का सोडला? त्याची कारणे अभ्यासावीत.(टीप-दोनच दिवसापूर्वी वेसावे कोळीवाडा येथील रितेश नाखवा यांच्या घराला कोणतीही नोटीस न देता घरातील स्त्रियांचा प्रचंड अपमान करीत घर तोडणारे मुबई पोलीस आणि मुंबई मनपाचे क्रूर अधिकारी ज्या पद्धतीने ओबीसी कोळीवाड्यावर तुटून पडले आहेत.त्यावरून हेच सिद्ध होते. क्षत्रिय ब्राह्मण या मनुवादी लोकांचे हे महाराष्ट्र सरकार यवनी मुस्लिम इंग्रज पोतुर्गीज या परक्या लोकांपेक्षा आमच्या साठी अत्यन्त धोकादायक आहे. या घटनेची निंदा करीत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचा तीव्र निषेध करीत आहे.आमच्या मातृसत्ताक कोळी महिलांचा घोर अपमान करणाऱ्या कायदा तोडणार्या या सरकारी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.अन्यथा ओबीसी समाज सरकार विरोधी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार आहे.)

जय एकविराआई! जय ओबीसी! जय भीम!

✒️सुलोचनापुत्र:-राजाराम पाटील(केगाव उरण,जिल्हा रायगड)मो:-8286031463