बिबट्याने केली कुत्र्याची शिकार-महिनाभरात दुसरी घटना, बेलखेडमध्ये भीतीचे वातावरण

29

🔹वनविभाग काय बिबटाने एखाद्या नागरिकावर हल्ला करण्याची वाट बघणार का…?

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.25जुलै):-उमरखेड शहराला लागून असलेल्या बेलखेड शिवारात बिबटाने एका कुत्र्याची शिकार केली. घटनास्थळी बिबट्याच्या पंजाचे निशाणही आढळून आले आहे.यापूर्वी एका वासराची शिकारही बिबटाने याच परिसरात केली होती. त्यामुळे अल्पावधित ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बेलखेड शिवारात गेल्या आठ दिवसांपासून एका बिबटाची भ्रमंती सुरू आहे.अनेक शेतकरी, शेतमजूरांना या उमद्या बिबटाचे दर्शनही झाले आहे. शिवाय, अनेकांनी त्याच्या डरकाळी फोडण्याचा आवाजही ऐकला आहे.

त्यातच महिनाभरापूर्वी शिवाजी साहेबराव पाटील रा. बेलखेड यांच्या मालकीच्या वासराची शिकार बिबटाने केल्याचे पुढे आले होते. त्यापाठोपाठ आता एका भटक्या कुत्र्याची शिकार बिबटाने केल्याचे उघड झाले.गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, तेथील माती ओली असल्याने बिबटाच्या पंजाचे निशाणही आढळून आले आहे.त्यामुळे आता या बिबटाची चांगलीच भीती बेलखेड शिवारातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे या बिबटाचा बंदोबस्त करावा…!अशी मागणी बेलखेडवासीयांकडून केली जात आहे.

बेलखेड शिवारात बिबटाचा वावर असल्याचे पुढे आल्यानंतर गावकऱ्यांनी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना तोंडी माहिती दिली शिवाय, या बिबटाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.तेव्हा वनविभागाकडून त्या बिबटाने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याशिवाय काहीच करता येत नसल्याची अडचण बोलून दाखविली.त्यावर आता वनविभाग बिबटाने एखाद्या नागरिकावर हल्ला करण्याची वाट बघणार का…?असा प्रश्न नागरिक करीत आहे.