आर्वी येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

✒️आर्वी प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

आर्वी(दि.2ऑगस्ट):-अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून
वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर, साहित्य सम्राट
लेखक समाजसुधारक अण्णाभाऊ साठे होते असे प्रतिपादन आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी केले यांच्या जयंती निमित्त सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार दादाराव केचे यांनी केले तर अध्यक्ष प्रा डॉ प्रवीण काळे अध्यक्ष सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी होते या प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त फोटोला पुष्पमाला घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार दादाराव केचे म्हणाले की, आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले, शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत.

सोबतच सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. प्रा डॉ प्रवीण काळे यांनी लोकमान्य टिळक यांचे स्मृतीदिन व लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जयंती निमित्त विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाप्रसंगी वर्षावास निमित्त आमदार दादाराव केचे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी गणेश पाटील, रामदासजी नाखले, निलेश देशमुख, राऊत शुभांगी भिवगडे व अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED