“प्रथम आंतरराष्ट्रीय भालाफेक दिन ” धरणगाव तालुका क्रीडा संघातर्फे उत्साहात साजरा

102

✒️पी.डी. पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगांव(दि.6ऑगस्ट):- – धरणगाव तालुका क्रीडा संघातर्फे ” ७ ऑगष्ट – प्रथम आंतरराष्ट्रीय भालाफेक दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन धरणगाव तालुका अँथलेटिक असोसिएशन तर्फे दिनांक ६ ऑगष्ट,२०२२ शनिवारी रोजी सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव याठिकाणी सकाळी १० वाजता घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले हायस्कूलचे पर्यवेक्षक एम.बी.मोरे हे होते. याप्रसंगी धरणगाव तालुक्याचे क्रिडा समन्वयक एस.एल.सूर्यवंशी यांनी भालाफेक या क्रिडा प्रकाराविषयीचे नियम व मैदान तसेच ‘आंतरराष्ट्रीय भालाफेक दिन ‘ तसेच या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना जळगाव जिल्हा अँथलेटिक असोसिएशन तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रम प्रसंगी श्री गुरुदेव सेवा समिती जळगाव च्या वतीने देण्यात येणारा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुडशेफर्ड शाळेचे शिक्षक व व्याख्याते लक्ष्मण पाटील, तसेच महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांचा धरणगाव तालुका क्रिडा संघातर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.बी.मोरे यांनी सर्व क्रीडा शिक्षकांचे शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत केले. खेळाडूंना भालाफेक खेळाबद्दल माहिती सांगून आपणही नीरज चोप्रा सारखी उंच व भरीव कामगिरी करावी व आपल्या देशाचे नाव उज्वल करावे यासाठी पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पी.आर. हायस्कूलचे क्रिडाशिक्षक एम.डी.परदेशी, अनोरे विद्यालयाचे आर.बी.महाले, बा.च.भाटीया विद्यालयाचे के.एस.पाटील गुडशेफर्ड हायस्कूलचे अमोल सोनार यांनी सहकार्य केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूलचे क्रिडाशिक्षक एच.डी.माळी यांनी केले