🔺बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाची मागणी

✒️चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर (४ जुलै) : पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ख्याती असणा-या महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासुन अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांवर जातीय कारणातून होण्या-या अत्याचारांच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे आढळून येत आहे. ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत निंदनीय बाब आहे. पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड इत्यादी ठिकाणी अश्या घटनामधून हत्याकांड देखील झालेले आहे. या सर्व प्रकारामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांमध्ये सरकारबद्दलचा असंतोष बळावत आहे. तसेच सरकारी पातळीवर जातीय अत्याचारांच्या घटनाकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशी भावना निर्माण झाली आहे. संपूर्ण देशात कोरोना रोगाच्या पाश्वभूमीवर टाळेबंदी, संचारबंदी लागू असलेल्या काळात जातीय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.

मृतक अरविंद बन्सोड वय ३२, रा. पिंपळगाव, ता. नरखेड, जि. नागपुर येथील उच्च शिक्षित व फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते होते. या तरुणाला या चळवळीचा कार्यकर्ता बनणार काय? असे बोलून बेदम मारहाण करून त्याला कीटकनाशक औषध देऊन खून केल्याची घटना समोर आली आहे. तसेच मृतक विराज जगताप वय 20, रा. पिंपळे सौदागर, ता. पिंपरी चिंचवड, जि. पुणे या तरुणाला उच्च वर्णीय जातीय मुलीशी प्रेमसंबंध असल्याने मुलीच्या नातेवाईकानी मृतक विराज जगतापच्या दुचाकीला त्यांचे वाहनांनी धडक देऊन त्याला जखमी केले. त्यानंतर धारदार हत्याराने वार करून अत्यंत निर्दयपणे हत्या केली. ही बाब आपल्या सर्वासाठी निंदाजनक आहे.

या दोन्ही प्रकरणात स्थानिक तपास अधिका-याकडून गुन्हाचा तपास करताना आरोपींना सुटण्यासाठी पळवाटा शोधल्याचे दिसतात. करिता दोन्ही घटनांची सीबीआय मार्फत चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत देण्यात आले.

शिष्टमंडळात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सल्लागार सुभाष मेश्राम, सहसचिव मुन्ना आवळे, चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश शंभरकर, चंद्रपूर जिल्हा सल्लागार नवनाथ देरकर, चंद्रपूर जिल्हा सचिव नितीन गेडाम, चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश नवाडे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED