कोरची शहरातील मुख्यालया समोरच झाले मोठ-मोठे जीवघेणे खड्डे- हर घर तिरंगा म्हणजेच आजादी का अमृत महोत्सव का? नागरिकांचा संतप्त सवाल

28

✒️वशीम शेख(विशेष प्रतिनिधी,कोरची)मो:-9404925488

कोरची(दि.18ऑगस्ट):-भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे संपूर्ण देशाने आजादी का अमृत महोत्सव साजरा केला आहे. परंतु कोरची येथील तहसील कार्यालय कडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरच मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले असल्यामुळे तालुका खरच आजादी का अमृत महोत्सव साजरा केला आहे का? असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कोरची बोटेकसा मार्ग हा राज्यमार्ग असून सदर मार्ग छत्तीसगडला जोडला गेला असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी जड व हलक्या वाहनांची ये-जा सुरू असते.

दरवर्षी याच रस्त्यावर देखभाल दुरुस्तीच्या नावावर प्रशासनाचे लाखो रुपये वाया घालविले जात असल्याचे बघितले जात असून याकडे संबंधित विभाग सर्रासपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी भरून राहत असून यामुळे खड्ड्यांचा अंदाज लोकांना कळत नसून त्यामुळे कित्येक दुचाकीस्वार घसरून पडून गंभीर रित्या जखमी सुद्धा झालेले आहेत. काही दिवसापूर्वी सोहले येथील पोलीस पाटील जुमेनसिंग काटेंगे यांचा याच मार्गावर घसरून पडून मृत्यू झाला होता.
राज्यमार्ग असल्याकारणाने या मार्गावर नेहमी जड व हलक्या वाहनांची ये-जा सुरू असते. काही दिवसांपासून या मार्गावर दररोज जड वाहने नादुरुस्त होत असल्याचे दिसून येत आहे.

याच मार्गावर बोटेकसा येथे भव्य असे प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथे रुग्णांना जाण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोरची हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आपल्या कार्यालयीन कामाकरिता लोकांना मार्गक्रमण करणे खूप अवघड झाले असून यामुळेच शासकीय कामे करण्यास नागरिकांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे सुद्धा शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

सदर मार्गावर तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, बँक ऑफ इंडिया, नगरपंचायत, भूमि अभिलेख, कृषी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती अशी महत्त्वाची कार्यालय असून सुद्धा संबंधित विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असून 13 से 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात आला आहे. तर मग फक्त घरोघरी ध्वज फडकवणे म्हणजेच आजादी का अमृत महोत्सव का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.