टू द पॉईंट! …….आमदाराची चीड येत नाही काय?

27

ही बातमी नाही. ही आहे वस्तुस्थिती. मी बातमीदार नाही.मी पत्रकार नाही. मी आहे जळगाव चा नागरिक.त्यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था पाहाता आमदार मामा, संकटमोचक महाजन किंवा जळगाव चे शांघाय बनवणारे मोदींचा कोणताही मुलाहिजा नाही. मला त्यांचेकडे वाढदिवसाची पुरवणी छापायची नाही. मताचे पैसे मागायचे नाहीत. तर मी का म्हणून त्यांचे पाप झाकायचे?

जळगाव शहरातील आमदार निवडून द्यायचे होते तेंव्हा उमेदवार सुरेश भोळे म्हणाले होते, “तुम्हाला या खड्ड्यांची चीड येत नाही काय? ” मला वाटले,आमचे उमेदवार किती सेन्सेटिव्ह आहेत. आपण या माणसाला मतदान केले तर हा माणूस शहरातील खड्डे भरून टाकील.पुर्ण जळगाव चकचकीत करून टाकतील. ते स्वतः खूपच संवेदनशील आहेत. म्हणून शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची चीड प्रथम त्यांनाच आली. त्यांनी तसे पत्रके छापून इतर बधीर लोकांना माहिती करून दिली. “तुम्हाला खड्ड्यांची चीड येत नाही काय? ” मतदार प्रेरीत झाले.भरगोस मतांनी निवडून दिले. पण आमदार भोळेंनी एकही खड्डा भरला नाही. हे पाहाता, चीड मतदारांना आली पाहिजे. आपण पत्रक छापले पाहिजे,” तुम्हाला अशा आमदाराची चीड येत नाही काय?”

ते खड्डे पाहून आमदारांना पुन्हा भयंकर चीड आली.म्हणे,”या खड्ड्यांची तुम्हाला चीड येत नाही काय?” जर २०१४ पेक्षा २०१९ मधे मतदारांना जास्त चीड येत असेल तर, मला निवडून द्या. मतदारांनी खड्ड्याची दिडपट चीड मानून दिडपट मतांनी निवडून दिले.पण मागील आठ वर्षात आमदारांनी एकही खड्डा भरला नाही. एकही रस्ता बनवला नाही.हे आमदाराचे धडधडीत फेल्युयर आहे.

तरीही हेच आमदार तिसऱ्यांदा दुप्पट मतांनी निवडून येतील.का? आता इतक्या वर्षात इतके खड्डे वाढलेत, नागरिकांचे मणके तुटलेत, मज्जारज्जू, नर्व्हस सिस्टिम इतकी बधीर झाली कि, आमदार कडे तक्रार करण्याचे सुद्धा बळ उरले नाही. आमदार स्वतः हाडकांची मोडतोड झालेल्या पेशंटला भेटून दोन पैसे देऊन मदत करतात.तेंव्हा पेशंट म्हणतो,” मामा ,बरे वाटले.तुम्ही मला भेटायला आलेत.”तेंव्हा आमदार प्रतिसाद देतात,” बरे झाले तुम्ही लवकर अडमीट झालेत.”जळगाव मनपाची निवडणूकीत संकटमोचक गिरीश महाजन यांनी प्रतिज्ञा केली होती कि,केंद्रात आमचे सरकार आहे, राज्यात आमचे सरकार आहे. तर एकवेळ आम्हाला मनपात सत्ता द्या. जळगांवचे रस्ते चकचकीत करुन दाखवू. लोकांनी विश्वास ठेवला. शहरातील हिस्ट्रीसीटर उमेदवारांना सुद्धा मतदारांनी भरभरून मतदान केले. नगरसेवक गुंड असले तरी चालतील पण महाजन साहेब शब्द देत आहेत. करतील ते रस्ते. पण गिरीश महाजन यांनी राज्यात आणि केंद्रात वजन असूनही, जळगाव शहरातील एकही रस्ता बनवला नाही. उलट ५७ पैकी ३२ नगरसेवक त्यांना सोडून शिवसेनेत गेले.एकनाथ शिंदेंनी पळवले. आता शिंदे आणि महाजन एकाच बाकावर आहेत.दोघांनी एकही रस्ता बनवला नाही. महाजन येथे फेल झाले.

नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये कायापालट केला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत जळगांव येथे सभेत बोलले,”जहांसे रस्ता अच्छा आया तो समजो यहांसे गुजरात शुरू हुआ.जहांसे बिजली चमकी ,समजो यहांसे गुजरात शुरू हुआ. अगर हमे चुनकर सत्ता सौपी तो महाराष्ट्रको गुजरात बना दूंगा.जलगांव शहर को शांघाय बना दूंगा.जलगांवको स्मार्ट सिटी बना दुंगा.”

मोदींना सत्तेवर येऊन आठ वर्षे झालीत पण जळगाव शहरातील एकही रस्ता बनवला नाही.शांघाय तर सोडाच पण जळगाव साधे नंदुरबार सारखे सुद्धा बनवले नाही. नरेंद्र मोदी फेल झाले.कि आम्ही समजू,ते आमच्याशी खोटे बोलले ?कारणे काहीही असोत,पण मागील दहा वर्षांपासून जळगाव शहरातील एकही रस्ता बनवला नाही. चालण्यासाठी धड राहिला नाही. राजकिय पक्षाचे नेते निवडणुकीत काहीही आश्वासन देतात. विकासाचे गाजर दाखवतात.पण सत्तेवर येताच दुर्लक्ष करतात. मामा, महाजन, मोदी चंद्र व मंगळावरील स्वप्न दाखवत असतील.पण आम्हाला ते नको.आम्हाला पाहिजे शहरातील रस्ते.मला वाटते जळगाव शहरातील लोकांनी या नेत्यांचा अनुभव पाहाता, किमान प्रामाणिक, उच्चशिक्षित लोकांना नगरपालिका, विधानसभा, लोकसभेसाठी निवडून दिले पाहिजे.मोदीकडे पाहून लोकसभेला मतदान केले.महाजन कडे पाहून विधानसभेला मतदान केले. मामाकडे पाहून नगरपालिकेत मतदान केले.ते करणे चुकीचे ठरले आहे.उमेदवाराकडे पाहून मतदान केले पाहिजे.त्याच्या पक्षाकडे किंवा पैशाकडे पाहून मतदान करू नये. जळगांव शहराचा दैनंदिन गाडा जळगावच्याच लोकांनी हाकलायचा आहे.आपणच आपला नगरसेवक,आपला आमदार निवडायचा आहे.लोकांनी लोकहितासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे.दिल्लीमे सरकार बनानेके लिये नही.महाराष्ट्रामे सरकार बनानेके लिये नही. कोणत्याही राजकीय पक्षांसाठी तर नकोच.

केंद्रात भाजपचे सरकार आहे म्हणून राज्यात भाजपचे सरकार निवडून दिले पाहिजे का?राज्यात भाजपचे सरकार आहे म्हणून महानगरपालिकेत भाजपला सत्ता दिली पाहिजे का?तरच आम्ही निधी देऊ.तरच आम्ही शहराचा विकास करू.असे सांगणारा माणूस लोकशाहीचा शत्रू असतो.तसे असते तर राज्यात आणि महानगरपालिकेत निवडणूक घेण्याची गरज काय? जर राज्यात अन्य पक्षाचे सरकार असेल तर केंद्राने राज्याची अडवणूक करावी का?जर महानगरपालिकेत अन्य पक्षाची सत्ता असेल तर राज्याने अडवणूक करावी का?असे सांगणे ,असे करणे हे लोकशाही विरोधी आहे.येथेच भारतीय लोकशाहीचे अपयश आहे.हे कळत नसेल,वळत नसेल तर विकासाची अपेक्षा करू नका.रस्त्यांची अपेक्षा करू नका.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव