प्रशासनाला पदोन्नतीचा मुहूर्त सापडेल का ?

26

🔹जिल्ह्यातील अनेक शाळेत मुख्याध्यापक नाहीत

पदावन्नत केलेल्या मुख्याध्यापकांना वेतनश्रेणी संरक्षण दिल्या गेले आहे. जिल्ह्यात कित्येक शाळेत मुख्याध्यापकाचा प्रभार सहाय्यक शिक्षकांना सांभाळावा लागत असून , त्यांना कोणताही अतिरिक्त मोबदला दिल्या जात नाही . मुख्याध्यापकांची कामे सांभाळताना अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे . त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर पडून नागरिकांत शिक्षकांबद्दल दुराग्रह निर्माण होत आहे – किशोर आनंदवार , अध्यक्ष पुरोगामी संघटना
————————————–

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.8सप्टेंबर):-शालेय प्रशासनाचा डोलारा सुरळीत चालविण्यासाठी मुख्याध्यापकांची गरज असते. पण चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शाळेत मुख्याध्यापकांची पदे रिक्त असून तेथील प्रशासन चालविताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत . काही शाळेत इच्छा नसताना मुख्याध्यापकाचा प्रभार घेण्यासाठी कार्यालयाकडून दबाव आणून शिक्षकांना मानसिक ताण दिल्या जात असल्याने शिक्षक मानसिक दडपणात सुट्ट्यांवर जात आहेत . ज्या शाळेत प्रभार घेतला त्या शिक्षकांच्या विषय अध्यापनाकडे दुर्लक्ष होऊन शैक्षणिक गुणवत्ता घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे . त्यामुळे नागरिकांत शिक्षकांबद्दल दुराग्रह निर्माण होऊन शाळांवर अविश्वास वाढत आहे.

याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने प्रशासनाला जाणीव करून देत अनेकदा निवेदने व चर्चा केली . परंतु निगरगट्ट प्रशासन याकडे कानाडोळा करीत गेल्या वर्षभरापासून त्रुटींची मालिका चालवत पदोन्नतीसाठी अनुत्साही असल्याचे दाखवून दिले . म्हणूनच शिक्षकदिनी धरणे आंदोलन करून संघटनेने प्रशासनापर्यंत आवाज पोहचवला . आश्वासनाची खैरात वाटणारे प्रशासन प्रत्यक्ष कधी कार्यवाही करेल , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

सन २०१८ मध्ये जिल्हा परिषदेने अनेक मुख्याध्यापकांना पदावन्नत करून त्यांना वेतनश्रेणीचे सरंक्षण दिले आहे . त्यांना पदोन्नती देताना कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नाही . पण प्रशासन एकीकडे वेतनश्रेणी देऊन दुसरीकडे जबरदस्तीने प्रभार सोपवून कोणताही अतिरिक्त मोबदला देत नाही . हा सावळागोंधळ दूर सारत प्रशासनाने लवकरात लवकर मुख्याध्यापकांच्या पदोन्नती करावी . या मागणीसह १८ मागण्यांचे निवेदन पुरोगामी शिक्षक समितीने जिल्हा प्रशासनाला दिले असून , प्रशासनाने पंधरा दिवसात कार्यवाही न केल्यास संघटना साखळी उपोषण करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार यांनी कळविले आहे .