विविधतेत एकता’ जोपासणारी हिंदी भाषा -प्रा. डॉ. विश्वनाथ सुतार

28

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.23सप्टेंबर):-” हिंदी ही भाषा जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकाची भाषा आहे. भारत देशाची हिंदी ही राजभाषा असून ती राष्ट्र भाषा होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. जोपर्यंत हिंदी राष्ट्रभाषा होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होण्याचे स्वप्न हे स्वप्न राहील. मानवी जीवनात हिंदी भाषेचे महत्व खूपच आहे. हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारा माणूस जगावर राज्य करतो.” असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या सिनिअर विभागाच्या ‘हिंदी दिवस’ समारंभात प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. विश्वनाथ सुतार सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास प्रमुख व जिमखाना उपाध्यक्ष प्रा.डॉ. सौ एस. आर. सरोदे मॅडम होत्या.

प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, “प्रत्येक स्वतंत्र देशाची अस्मिता त्याचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगान व राष्ट्रभाषा असते. भारतासारख्या बहुभाषिक देशात भाषा, उपभाषा, बोली यांची प्रचंड संख्या आहे. आपली प्रांत रचना भाषावार प्रांत रचना आहे. त्यामुळे प्रत्येक प्रांताची भाषा ही वेगळी आहे. या सर्व बहुभाषी प्रांतांना एकतेच्या सूत्रात बांधण्याचे काम हिंदी भाषा करते. भारताचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या ‘विविधतेत एकता’ याचे प्रतिनिधित्व हिंदी भाषा करते.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाविद्यालयाच्या जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सौ. एस. आर. सरोदे म्हणाल्या की, “वाचनाने माणूस वाचतो. हिंदी भाषेतील साहित्य वाचल्यामुळे माणूस परिपुष्ट होतो. अनेक साहित्यिकांनी हिंदी भाषेत साहित्य लेखन करून भाषेला समृद्ध केले. भाषा हे आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम असून हिंदीतून आपणास अर्थार्जनासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.”

हिंदी दिवस समारंभाच्या निमित्ताने कु. अनिशा चव्हाण, आल्फीया मुल्ला, कु. तपस्या काशीद, साक्षी पिसाळ-पाटील , जैनब शिकलगार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक जाधव यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. आयेशा संदे यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. मनिषा चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम कु. आश्लेषा चव्हाण यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रा. एस. एस. बोंगाळे, प्रा. एस. एम. मुल्ला, प्रा. एम. एम. बागवान, प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.