हीटरच्या उकळत्या पाण्यामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू- धक्कादायक आणि दुदैवी घटना

18

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.26सप्टेंबर):-पाणी तापवण्यासाठी कुठे गिझरचा उपयोग केला जातो, तर कुठे हीटर चा उपयोग करतात. बीड जिल्ह्यातल्या पिंपळगावामध्ये मात्र हीटरमुळे दुर्दैवी घटना घडली आणि एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. उशा रणजीत सुरवसे असं या मृत महिलेचं नाव असून त्या 31 वर्षाच्या होत्या.

उषा आणि त्यांचे पती नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत झोपले होते. झोपण्यापूर्वी त्यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास याच खोलीत बाजूला असलेलं हे हिटर चालू केलं. पाणी गरम झाल्यानंतर त्या हीटर बंद करायला विसरल्या आणि रात्री दोनच्या सुमारास या टाकीतलं पाणी एवढं गरम झालं की टाकी फुटून पाणी उषा आणि त्यांच्या पतीच्या अंगाखाली आलं. गरम पाण्यामुळे उषा यांच्या शरीराचा अर्धा भाग पूर्णपणे भाजून गेला.

उकळतं पाणी अंगाखाली आल्याने उषा यांचं अर्ध शरीर तर भाजलंच, मात्र त्यांच्या पतीच्या पायालाही मोठी इजा झाली. सुदैवाने त्यांची तीन मुले दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. म्हणून त्यांना काही झालं नाही. भाजलेल्या अवस्थेत उषा आणि त्यांच्या पतीला अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांची तब्येत खालावत असल्याने त्यांना लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आणि तिथेच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

उषा आणि त्यांचे पती ऊस तोडणीचं काम करतात. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. मात्र पाणी तापवण्यासाठी आणलेल्या हीटरमुळे घात झाला आणि उषा यांना आपला जीव गमवावा लागला.

या घटनेनंतर आपल्या घरात असलेलं हीटर किती सुरक्षित आहे आणि त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे एक्सपर्ट रनसिंग यांच्याकडून या बाबत महिती जाणून घेतली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात उपलब्ध होणारे हीटर हे दोन प्रकारचे असतात. एक लोकल हीटर आणि दुसरं सबमर्सिबल हीटर. हे पाण्यामध्ये अर्ध्यापर्यंतच बुडवून ठेवावे लागतं आणि या हीटरमुळे पाण्यात हात घातल्यास शॉक लागण्याची शक्यता असते. तर सबमर्सिबल हीटर हे पाण्यात पूर्णपणे बुडवलं तरी शॉक लागत नाही आणि हे वापरासाठी सुरक्षित असतं. हीटर लावताना पाण्याची बकेट पूर्णपणे भरलेली असावी आणि लोकल हीटरवर मार्किंग केल्याप्रमाणेच हीटर पाण्यात बुडवावं.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बहुतेक उपकरणांचा वापर करतो. मात्र याच उपकरणांचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर छोट्याशा चुकीमुळे मोठा अनर्थ होऊ शकतो.