कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करणे गरजेची : ना. तनपुरे

33

🔺गडचांदूर येथे कोरोना विषयक आढावा बैठक

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.7जुलै): कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनीच उत्तम काम केलेले आहे. पुढच्या काळामध्ये देखील असेच काम ठेवून कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाचा उद्रेक होणार नाही यासाठी नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गडचांदूर येथे दिल्यात. काल ते चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गडचांदूर नगर परिषदेत कोरोना विषयक आढावा बैठक घेतली.

गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळके यांनी नगरपरिषद अंतर्गत आतापर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना विषयक सविस्तर माहिती सादर केली. तसेच घनकचरा व्यवस्थापन करणे व घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध करणे, याविषयीची मागणी देखील त्यांनी ना.प्राजक्त तनपुरे यांना केली.

दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बोलताना घरकुल योजना तसेच इतरही विकासात्मक योजना रखडू देऊ नये, घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी,अशा सूचना केल्या.

आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना तालुक्यात तसेच नगर परिषद अंतर्गत स्थापन केलेले कोविड केअर सेंटर सर्व सुविधा युक्त असावे, अशा सूचना तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना यावेळी केल्या.

कोरपना तालुक्यात कोविड केअर सेंटर, बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी व नोंदणी, आरोग्य संदर्भातील सर्वेक्षण, कोरोना विषयक जनजागृती याविषयीची केलेली कार्यवाही तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी विषद केली.

आरोग्य विभागाने बाधितांवर करण्यात येणारे उपचार तसेच उपाययोजनांची माहिती दिली. आरोग्य विभागाने आणखी सक्षमपणे आरोग्य सर्वेक्षण करून बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नोंद करावी तसेच त्यांना अलगीकरणात ठेवण्याची सूचना ना.तनपुरे यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिल्यात.

यावेळी राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्षा सविता टेकाम, नगर परीषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, उपविभागीय अधिकारी जे.पी लोंढे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळके, राजेंद्र वैद्य तसेच नगरपरिषद, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी , कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते